Home > Uncategorized > गणपती बसवण्यावरून बहिष्कारास्त्र?

गणपती बसवण्यावरून बहिष्कारास्त्र?

गणपती बसवण्यावरून बहिष्कारास्त्र?
X

बौद्ध कुटुंबाने घरात गणपती बसवला तर त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याच्या फतव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दैनिक 'वृत्तरत्न सम्राट' या वृत्तपत्रात यासंबधीचे आवाहन छापून आले आहे. तर 'चला हवा येऊ दे फेम' भाऊ कदमने घरात गणपती बसवल्याने त्याच्यावर भावकीनं बहिष्कार टाकल्याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. संविधानावर प्रखर निष्ठा असलेल्या आंबेडकरी विचारधारेत अशा बहिष्काराला कितपत थारा आहे असा प्रश्न यानिमित्तानं सोशल मीडियावर विचारला जात आहे. फेसबुकवर यावर ब-याच मंडळींनी आपली भूमिका मांडली आहे. पत्रकार कीर्तीकुमार शिंदे यांनी 'सम्राट'च्या बातमीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. व्होटबँक राजकारणापेक्षा हा प्रकार वाईट नाही का? असा सवाल कीर्तीकुमार यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया फेसबुकवर व्यक्त केली आहे. आपल्याच धम्म बांधवांप्रती बौद्ध धम्म असहिष्णु बनत चालला आहे का, असा सवाल जगताप यांनी केला आहे. भाऊ कदमला त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य असून त्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कवी आणि स्तंभलेखक वैभव छायानेही या बहिष्कार प्रकरणाला आक्षेप घेतला आहे. गणपती बसवण्याचा अधिकार ज्याला-त्याला संविधानाने बहाल केलेला आहे अशी प्रतिक्रिया वैभव छाया यांनी दिली आहे.

एकूणच बहिष्काराची भाषा करणा-यांना पुनर्विचार करावा लागणारी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसते आहे.

Updated : 28 Aug 2017 8:58 PM IST
Next Story
Share it
Top