Home > Top News > औरंगजेब हा तुमचा नक्की कोण लागतो ?

औरंगजेब हा तुमचा नक्की कोण लागतो ?

औरंगजेब हा आपला आदर्श असू शकत नाही. जसे यजीद आदर्श असू शकत नाही अगदी तसेच. आम्ही शिवरायांच्या भूमीत राहतो त्यांनाच आदर्श मानतो.

औरंगजेब हा तुमचा नक्की कोण लागतो ?
X

प्रति अबू आझमी,

कुठलंही वक्त्यव्य करताना आधी मराठी शिका. गेली ३ दशके तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहात तरीही तुम्हाला या महाराष्ट्राची भाषा येत नाही याची थोडी तरी लाज बाळगा. राज्याची प्रादेशिक भाषा न शिकता इतर कुठल्या राज्याचे तुम्ही आमदार होऊ शकता का ? याचाही थोडा सारासारपणे विचार करा.

मुळातच महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा तुमच्यामुळे बदनाम होतोय हा माझा स्पष्ट आरोप आहे. तुमची वेगवेगळी धार्मिक ध्रुवीकरणाला बळ देणारी विधानं मी याआधी देखील झोडून काढलेली आहेत. आणि पुढेही झोडत राहील. तुम्ही स्वतः देखील भाजप प्रमाणेच धर्मांध विचारधारेच्या आधारावर निवडून येता त्यामुळे तुम्हाला समर्थन देण्याचा काही संबंधच येत नाही.

औरंगजेब हा एक मोगल शासक होता. तो क्रूर आणि धूर्त होता याच्या कित्येक घटना साक्षीदार आहेत. औरंगजेब हा सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारा व्यक्ती होता. औरंगजेबाला त्याच्या सत्तेचा कोणीही वाटेकरी असलेला खपत न्हवता. तो या गोष्टीची भीती कायम बाळगायचा. त्याची तुलना सद्य परिस्थितीत एकाच नेत्याशी होऊ शकते ज्याचे नाव मला सांगण्याची आवश्यकता नाही. औरंगजेब हा एवढा क्रूर होता की त्याच्या शेवटच्या काळात त्याला स्वतःलाच त्याचा पश्चाताप झाला होता. त्याने त्याच्या ज्ञानी आणि विद्वान असलेल्या भावाला म्हणजेच दारा शुकोह ला कसे संपवले या इतिहासाचा थोडा अभ्यास करा. म्हणजे औरंगजेब किती क्रूर होता हे तुम्हाला समजेल.

औरंगजेब हा तुमचा नक्की कोण लागतो ? त्याला आदर्श मानून त्याच्या पश्चात आणि त्याच्या हयातीत या देशात काहीतरी उभे राहू शकले आहे का ? याचा विचार करा म्हणजे औरंगजेब हा कसा होता हे तुम्हाला समजेल. अगदी तो जिथे जन्मला त्या गुजरात मध्ये आणि तो जिथे मेला त्या महाराष्ट्रात त्याच्या नावाखेरीज आणि कबरी खेरीज त्याचे म्हणावे असे काहीही उरलेले नाही. त्याच्यापेक्षा इतर मोगल सम्राटाच्या कार्यकाळाच्या खुणा तुम्हाला देशभर विविध ठिकाणी अजूनही दिसून येतील.

आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या तिन्ही शाह्यांचा मराठे शाही सोबत लढा होता हे वास्तव आहे. आणि हा लढा धार्मिक न्हवता हे देखील वास्तव आहे. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या तिन्ही शाह्यांचे एकमेकांशी हाडाचे वैर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर कुतुबशाहीला संरक्षण देणारे छत्रपती शिवाजी महाराजच होते ज्यांच्यामुळे औरंगजेब कुतुबशाहीकडे पुन्हा वाकड्या नजरेने पाहू शकला नाही. हा इतिहास आहे.

तुम्ही ज्या महाराष्ट्रात राहताय तेथील मराठे शाहीला औरंजेबाने पर्सनली घेतलेले होते. ते एवढे की ती संपवायला हा गडी दिल्लीतुन महाराष्ट्रात आला होता. इथे येऊन त्याने स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांना मारण्याचे आदेश दिले. हे खरे आहे की यात धर्म कुठेच न्हवता. पण आपल्या छत्रपतींची हत्या करण्याचे आदेश देणाऱ्या माणसाचा उदो उदो आम्ही आमच्याच महाराष्ट्रात कसा सहन करायचा ? जे लोक औरंगजेबाचे स्टेट्स ठेवतात त्यांनाही याची अक्कल आहे की नाही ? ती नसेल तर त्यांना ती द्यायला हवी. तुम्हाला इमाम हुसेन यांची हत्या करणाऱ्या यजीदचा उदो उदो केलेला चालेल का ? अर्थातच नाही. मग औरंगजेबाचे उदात्तीकरण का करावे ? जे या गोष्टी करत आहेत तेही जाणीवपूर्वक करत आहेत आणि त्यांना तुम्ही खतपाणी घालत आहात असा माझा स्पष्ट आरोप आहे.

काही डिल वगैरे झाली आहे का तुमची आणि भाजपची ? तसे असेल तर कृपया सांगा. कारण सध्या महाराष्ट्र भर शिवप्रेमींचा रोष हा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामी प्रकरणाकडे आहे. तो रोष कमी करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत का ? त्याची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे का ?

औरंगजेब हा आपला आदर्श असू शकत नाही. जसे यजीद आदर्श असू शकत नाही अगदी तसेच. आम्ही शिवरायांच्या भूमीत राहतो त्यांनाच आदर्श मानतो. शिवरायांनी आयुष्यभर ज्याच्याशी संघर्ष केला, ज्याने स्वराज्याचे दुसरे छत्रपती कपटाने संपवले, तो आमचा आदर्श कधीही असू शकत नाही आणि त्याचे उदात्तीकरण करणारे देखील आमचे असू शकत नाहीत. #समजलंतरठीक

जय जिजाऊ, जय शिवराय

- पैगंबर शेख

पुणे, महाराष्ट्र

९९७००७०७०५

Updated : 4 March 2025 6:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top