"तुमच्या अजेंड्यासाठी माझा वापर करु नका" नीरज चोप्राचा निशाणा कुणावर?
X
ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये नीरज चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला प्रयत्न करण्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूकडून आपला भाला घेत असल्याचे दिसते आहे. पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम हा नीरजचा भाला घेत असताना रंगेहात सापडला, पण नीरजने ऐनवेळी तो भाला त्याच्याकडून घेतला, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधी नीरज चोप्राने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ,"अंतिम फेरीत भाला फेकण्याआधी आपण भाला शोधत होतो, तेव्हा तो भाला पाकिस्तानी खेळाडूच्या हातात दिसला. मी तो भाला त्याच्याकडून मागून घेतला, म्हणून मला तेव्हा जरा घाई झाली" असे नीरज चोप्रा याने म्हटले होते. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पण आता या व्हायरल व्हिडिओवर नीरज चोप्रा याने स्पष्टीकरण दिले आहे. एवढेच नाही तर घाणेरडा अजेंडा राबवण्यासाठी माझा आणि माझ्या कॉमेंट्सचा वापर करु नका असा टोलाही त्याने लगावला आहे.
मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021
नीरज चोप्राने व्टिटरवर आपला व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये त्याने सांगितले आहे की, "भाला फेकण्याआधी मी पाकिस्तानी खेळाडूकडून भाला घेतला, असा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्याच्यावरुन वाद सुरू झाला आहे. पण काही खूप मोठी बाब नाही. एक अगदी साधी गोष्ट आहे की भाला वैयक्तिक असला तरी सर्व खेळाडू तो वापरु शकतात असा नियम आहे. तो सराव करत होता आणि मी माझ्या अंतिम फेरीसाठी तो मागून घेतला. यात काही चुकीचे नाही. माझ्या नावाचा वापर करुन यावर वाद निर्माण केला जात असल्याबद्दल मला वाईट वाटले. खेळात सगळ्यांनी सोबत येऊन काम करायचे असते. क्रिडा क्षेत्राकडून हेच शिकायचे असते. आम्ही सर्व खेळाडू एकमेकांशी बोलतो, सोबत असतो. त्यामुळे कुणी दुखावेल असे काही करु नका." असे आवाहन नीरजने केले आहे.