Home > गोष्ट पैशांची > म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड
X

आज आपण चर्चा करणार आहोत म्युच्युअल फंड बद्दल. शेअर बाजारातील मराठी माणसाच्या, प्रामुख्याने तरुण पिढीच्या, गुंतवणुकीचा टक्का हळूहळू वाढत आहे. परंपरेने चालत आलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. उदा. मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत आहेत, त्यावर भरावा लागणारा कर आणि महागाईचा दर लक्षात घेता यातून फारच थोडे उत्पन्न मिळते. सोन्याचे भाव मागील बऱ्याच वर्षांपासून स्थिर आहेत.

आज म्युच्युअल फंड हा सामान्य गुंतवणूकदाराला परिचयाचा झाला आहे आणि गुंतवणूकदारांच्या भरभक्कम प्रतिसादाच्या जोरावर देशातील म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता एप्रिलमध्ये प्रथमच १४.२२ लाख कोटी रुपयांपल्याड गेली आहे. म्युचुअल फंडातील गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढतो आहे.

पण, अजूनही म्युच्युअल फंडाबद्दल लोकांमध्ये म्हणावी तेवढी जागृकता नाही. याबाबत जागृकता झाली तर नक्कीच म्युच्युअल फंडातील गुंतलणुकीकडे लोकांचा कल आणखी वाढेल. मला इथं उल्लेख करावासा वाटतो, मागच्या महिनामध्ये सेबीनं आपल्या देशामध्ये आर्थिक साक्षरतेसंदर्भात एक सर्वे केला होता. त्यात असं दिसून आलं की अजूनही भारतीयं लोकं गुंतवणुकीसाठी बँक फिक्स्ड डेपोसिटलाच जास्त पसंती देतात. माझ्या मते याच मुख्य कारण म्हणजे इतर उपलब्ध पर्यायांची लोकांना माहिती नसणे किंवा त्याबद्दल गैरसमज असणे हे आहे.

म्युच्युअल फंड हा "crowd फंड " आहे. सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर, ऍसेट्स मॅनेजमेंट कंपनी गुंतवणुकदारांकडून योजने द्वारे आलेल्या पैसाच ठरवलेल्या पर्यायांमध्ये योग्य नियोजन करून गुंतवणूक करते. गुंतवणुकीवर अधिक परतावा गुंतवणूकदारांना देते. म्युच्युअल फंडामध्ये वेगवेगळ्या योजना असतात प्रत्येक योजनाच दृष्टीकोन वेगळा असतो. म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवणूक दोन मार्गाने करू शकतो. पहिला सिप (SIP) म्हणजे हप्त्यांमध्ये पैसे भरून किंवा एक रक्कमी पैसे भरून.

सिप(SIP) ही नियमित गुंतवणूक तत्त्वावर काम करते. ते आपल्या रेकररिंग डेपॉजिट सारखे असते. जिथे आपण दरमहा लहान रक्कम गुंतववतो किंवा आठवड्यातून किंवा तीन महिन्यातून एकदा.

म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत

१. ओपन एंडेड फंड – हा म्युच्युअल फंड कायमस्वरूपी ‘सबस्क्रिप्शन’ साठी उपलब्ध असतो आणि तो केव्हाही ‘रिडीम’ करता येतो.

२. क्लोज्ड एंडेड फंड – या प्रकारच्या म्युच्युअल फंडाचा निश्चित परिपक्वता कालावधी असतो. उदाहरणार्थ, 3-6 वर्षे. हे फंड बाजारात येण्याच्या वेळी एका विशिष्ट कालावधीसाठी सबस्क्रिप्शनकरता खुले असतात.

३. इंटरव्हल फंड्स – या प्रकारच्या म्युच्युअल फंडांत ओपन एंडेड व क्लोज्ड एंडेड फंड्सच्या वैशिष्टय़ांची सरमिसळ असते. या फंडांचे शेअर बाजारात सौदे होऊ शकतात आणि पूर्वनिर्धारित कालखंडांमध्ये ते विक्री किंवा रिडिम्प्शनसाठी खुले असतात.

आता आपण गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर आधारित असलेले म्युचुअल फंडांचे प्रकार बघूया.

१. इक्विटी फंड्स – हे म्युच्युअल फंड्स त्यांच्या निधीचा (कॉर्पस) मोठा भाग शेअर बाजारात गुंतवतात आणि त्यांच्या गुंतवणुकीचा उद्देश दीर्घकालीन भांडवलवृद्धीचा असतो. हे फंड्स अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगणाऱया गुंतवणूकदारांसाठी हे सोयिस्कर असतात.

२. डेट व मनी मार्केट फंड्स – डेट म्युच्युअल फंड्स साधारणत: बाँड्स, कंपन्यांचे डिबेंचर्स, सरकारी रोखे यासारख्या तारणपत्रांमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी फंड्सपेक्षा कमी तरल असण्याची शक्यता असलेले हे म्युच्युअल फंड्स नियमित उत्पन्न देतात.

३. बॅलन्स्ड फंड्स – या प्रकारचे म्युच्युअल फंड्स योजनेच्या पूर्वनिर्धारित गुंतवणूक उद्दिष्टांनुसार इक्विटीज आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या इक्विटीजमध्ये गुंतवणूक करतात. उत्पन्न आणि माफक वाढ यांची सांगड घालू पाहणाऱया गुंतवणूकदारांसाठी हे म्युचुअल फंड्स आदर्श ठरू शकतात.

४. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) – प्राप्तीकर कायदा 1961 मधील विशिष्ट तरतुदींच्या अंतर्गत करबचत योजना गुंतवणूकदारांना करविषयक सवलत देऊ करतात. या विकासोन्मुख योजना असतात आणि प्रामुख्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या फंडांना प्राप्तीकर कायद्यात नमूद केल्यानुसार 3 वर्षांचा लॉक-इन पिरिएड असतो.

. थिमॅटिक फंड्स – एका विशिष्ट संकल्पनेशी जवळून संबंधित असलेल्या (उदा.- पायाभूत सोयी) क्षेत्रसमूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी योजना म्हणजे थिमॅटिक फंड्स होत. या म्युच्युअल फंडांचे काम करण्याचे क्षेत्र व्यापक असते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील कर सवलत:

‘कलम ८० सी’नुसार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक केल्यास दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळू शकते. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांच्याकडे ही योजना आहे. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक ही किमान ३ वर्षांसाठी असली पाहिजे. ‘कलम ८० सी’च्या अंतर्गत जे इतर गुंतवणूक पर्याय आहेत त्यामध्ये ईएलएसएसचा गुंतवणूक कालावधी कमी आहे. मुदत ठेवींमध्ये किमान ५ वर्षे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) साठी १० वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. ईएलएसएसमधील गुंतवणुकीत शेअर बाजारातील गुंतवणुकीसारखी वाढण्याची क्षमता आहे. इतर गुंतवणुकीच्या पर्यायात वाढ होत नाही. ईएलएसएसवर मिळणारा लाभांश करमुक्त आहे. तीन वर्षांनंतर ईएलएसएसमधील गुंतवणूक विकली तर त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही, कारण ईएलएसएसच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरलेला असल्यामुळे तो करमुक्त आहे. या सर्वामुळे ईएलएसएसमध्ये एसआयपी (सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) करणे सोयीस्कर ठरते.

‘कलम ८० सीसीजी’ नुसार राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम : ही योजना नवीन गुंतवणूकदारांसाठी आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर उघडलेल्या डिमॅट खातेधारकांसाठी ही योजना आहे. या योजनेनुसार सूचिबद्ध इक्विटी शेअर्स किंवा सूचिबद्ध इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्या ५० टक्के वजावट (परंतु २५,००० रुपयांपर्यंत मर्यादित) उत्पन्नातून मिळते. ही उत्पन्नातून वजावट प्रथम गुंतवणूक केलेल्या वर्षांपासून सलग तीन वर्षांसाठीच मिळू शकते. या कलमानुसार वजावटीसाठी काही अटी आहेत. (१) करदात्याचे एकूण उत्पन्न १२ लाख रुपयांच्या पेक्षा जास्त असू नये, (२) करदाता हा नवीन गुंतवणूकदारच असावा (३) गुंतवणूक फक्त निर्देशित केलेल्या सूचिबद्ध इक्विटी शेअर्स किंवा सूचिबद्ध इक्विटी फंडामध्येच असावी, (४) गुंतवणूक किमान ३ वर्षांसाठी असावी. या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणारी वजावट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना फक्त ३१ मार्च २०१७ पर्यंतच आहे. १ एप्रिल २०१७ नंतर केलेल्या गुंतवणुकीची वजावट या कलमानुसार मिळणार नाही.

म्युच्युअल फंडावरील लाभांश

इक्विटी फंडावरील लाभांश हा करमुक्त आहे. डेट फंडावरील लाभांश हा लाभांश घेणाऱ्यासाठी करमुक्तच आहे. परंतु फंडाला यावर कर भरावा लागतो आणि तो कर गुंतवणूकदाराकडून वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा डेट फंडाकडून करदात्याला लाभांश मिळतो त्यावर त्याला परत कर भरावा लागत नाही.

म्युच्युअल फंडाच्या विक्रीवरील भांडवली नफ्यावर कर

म्युच्युअल फंड यांच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दोन प्रकारचा आहे. एक लघु मुदतीचा आणि दुसरा दीर्घ मुदतीचा. या दोन प्रकारावरील नफा हा त्याच्या धारण काळावर अवलंबून आहे.

इक्विटी फंड :

इक्विटी फंड युनिट्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा होतो. इक्विटी फंडाच्या युनिट्सच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला आहे असा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त आहे आणि अशा लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो.

डेट फड :

डेट फंड अर्थात रोखेसंलग्न फंडाचे युनिट्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा ठरतो आणि ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा ठरतो. डेट फंडाच्या युनिट्सच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला जात नसल्यामुळे दीर्घ मुदतीचा किंवा लघु मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र असतो. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशकानुसार खरेदी किमतीचा फायदा घेता येतो आणि त्यानुसार गणलेल्या नफ्यावर २० टक्के इतका कर भरावा लागतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर कलम ५४ एफ नुसार किंवा ५४ ईसी नुसार गुंतवणूक करता येते. लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

Updated : 26 May 2017 12:06 PM IST
Next Story
Share it
Top