स्पेन डायरी – भाग ७
X
लास राम्ब्लास स्ट्रीट उर्फ ला राम्ब्ला ही सुप्रसिद्ध पादचारी स्ट्रीट बार्सीलोनाच्या प्लाजा कतालुनया मेट्रो पासून सुरु होते ती चक्क पोर्टवेल बंदरापर्यंत जाते. स्पॅनिश कवी फेडरिको गारसिया लॉरका म्हणतो की "ही जगातील एकमेव न संपणारी स्ट्रीट आहे आणि अशीच असुद्या"!
या स्ट्रीटवर ऐकावेळी लक्षावधी लोक चालू शकतात व चालत ही असतात. माणसांच्या गर्दीत भिजलेला आणि फुललेला असा रस्ता असतो हा. इतका सुंदर रस्ता पाहणे हाही एक वेधक अनुभव असतो! रस्त्यावर असणारी शेकडो माणसे, वेगवेगळी दुकाने, रस्त्याच्या पार पल्याड असलेली वैविध्यपूर्ण हॉटेल्स, दुकाने, रस्त्यावर असलेले बाक, मधेच असलेली फुलझाडं, चेरीब्लॉसमची झाडं, फॅशनची पंढरी, प्रेमात उतू चाललेली तरूणाई! सगळीकडे नुसतं सौंदर्य! एखादा निराशावादी पण अंतर्यामी फुलून येईल असं हे वातावरण.
ला राम्ब्ला नाव अरेबिक "रामला" या शब्दापासून आले आहे. याचा अर्थ "रेतजमीन". हे मूलतः एका पाण्याच्या प्रवाहापासून उत्पत्तित झाले आहे. ज्याचा मूळ उगम "तीबीदाबो”च्या टेकडी मधून झालाय. याचा उल्लेख आपण पुढं पाहुच.
लास राम्ब्लास स्ट्रीटचं वैशिष्ट्य म्हणजे इथं स्पॅनिश सुविनर्स मिळतात. ती ही माफक दरात. इथं तुम्ही घासाघीस सुद्धा करु शकता. फक्त मुम्बई सारख नाही कारण कमाल विक्रेते हे निग्रो वंशाचे असतात आणि त्यानी डोक्यात राख घातली की आपली पळता भुई थोडी होते. वेगळाली मेगनेटस मिळतात. इथं रस्त्यावर सेक्स स्टोर्स आहेत चक्क. आत जायच आपल्याला हव ते विकत घ्यायच. दूसरी खासियत म्हणजे इथं आतल्या बाजुला ओपन मार्केट आहे. तिथं जरा स्वस्त पण अगदी सगळ म्हणजे सगळ मिळत जस की केशर, चॉकलेटस, बदाम, तेल आणि बरच काही. इथं नुसते फिरणे हा पण नजरेचे पारणे फेडणारा सोहळा असतो.
साधारण आठराव्या शतकात इथे पहिली इमारत निर्माण झाली. इकडे खरं तर अश्या सहा राम्ब्ला आहेत पण सगळे मिळून आता ला रम्ब्ला असे म्हटलं जातं. इथे खरे म्हणजे गेल्या खेपेत मी अनेक वेळा फिरले आहे. पण, म्हणतात ना जिथं माणसांच्या आनंदाचे झाड फुलले आहे तिथं कुठला मनस्वी माणूस रमणार नाही? तर मी पण जुन्या आठवणी जागवत चिक्कार फिरले. खीशाला भरपूर चाट दिली आणि परत वलारकाला जायला मेट्रो कडे प्रस्थान केलं!
डॉ. मनिषा कुलकर्णी