स्पेन डायरी – भाग ६
X
पार्क गल पाहून परत बस स्टॉपवर आलो आणि बरोबर अर्ध्या तासाने एका चुकीच्या स्टॉपवर उतरलो, मग काय वाचत विचारत निघाली आमची स्वारी "सगरादा फेमिलिया" च्या दिशेनं. खूप तंगडीतोड केल्यानंतर आम्ही "सगरादा"ला पोहोचलो. तिथं गेल्यावर वाटलं सगळे जग इथं आलं आहे. पोहचल्यावर बाहेरून इतकी भव्य दिव्य इमारत की मग आतून काय असेल? लोकांची चहूकडे नुसती रिघ आणि रांगा, काय कराव कळेना? मागच्या बाजूंने तिकीट कॉउन्टरवर गेलो तर सारी तिकिटे संपली होती. पुढं चार दिवस बूक होते. माझं मन इतकं विषण्ण झाले, काय करू सुचेना, तिथली एक सेविका माझा हीरमुसला चेहरा पाहून मला म्हणाली की तुम्ही ऑनलाईन बूकिंग का केलं नाही? आज आमची डाळ शिजणार नाही याची पुरेपुर खात्री झाल्यावर मी तिथून काढता पाय घेतला! "सगरादा फेमिलिया" हे गौडिने बांधलेले दुसरे आश्चर्य होय! जगभरातले लोक ही वर्ल्ड हेरिटेज साइट पहायला शेकडोनी गर्दी करतात, गम्मत म्हणजे याची अजुनही पूर्तता होवू शकली नाही. "सगरदा"चा कतालान मध्ये अर्थ आहे "पवित्र". अर्थात अतिशय सुंदर असे हे कॅथेड्रल गौडिच्या कल्पक्तेत बांधले गेले आहे. उंच सुंदर खांब, भव्य उंचीचे छत, कल्पकतेने आत उभारलेले मूर्त्या. याबद्दल विषद कराव तितकं कमीच! गेल्या पाच पिढ्यांपासून हे बांधल जात आहे आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पर्वात पूरे होईल अशी वास्तुविशारदाना आशा आहे. एका पुस्तक विक्रेत्याने जोसेप मारीया बोक्याबेला याच्या प्रेरणेने 1882 मध्ये गौडिने हे बांधायला सुरूवात केली ते त्याच्या म्रुत्युपर्यंत म्हणजे 1926 बांधुन तयार नव्हते. आणि अजूनी अत्यंत वेगळया धरतीचे असे बॅसीलीका पुढं बांधले जाईल याची जगाला आशा आहे. युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं आहे. असे हे पहायला मी मुकले म्हणून अत्यंत हिरमुसली होवून निघाले आणि धडा ही शिकले की इथं युरोपियन देशात आधी ऑनलाईन बुकींग करणं मस्ट आहे. माझा मूड खराब असला की मी नेहमी शॉपिंग कडे वळते; म्हणून मी जवळच असलेली मेट्रो पकडून "प्लासl कातालुनीया" कडे गेले. ही शॉपिंग स्ट्रीट एक वेगळाच आनंद देवून गेली.
पुढच्या आठवड्यात वाचा "प्लासl कातालुनीया" च्या शॉपिंग स्ट्रीटवरील अनोखं शॉपिंग
डॉ. मनिषा कुलकर्णी