स्पेन डायरी - भाग ११
X
...तर अतिशय सुंदर अश्या बाथरूममधल्या मनसोक्त स्नानानंतर मी त्वरित व्हेन्यूवर जाण्यास तयार झाले. लॉबित इतर कलाकार जमले होते आणि आम्ही वेळ न दवडता कारमध्ये बसलो. सगळे कलाकार गुणगुणत मजेत बोलत होते. मी मात्र जितके साठवता येईल तितकं डोळे भरुन शहर पाहत होते! जागोजागी पामची झाडे, मोठे अरुंद रस्ते, लांबलचक मोठे फूटपाथ, रस्त्यावर आलेली पांढरट वाळू, सारं काही स्वप्नातल्या गोष्टीसारखे. रस्त्यावर बिनधास्त चालणारी बिकीनी मधली जोडपी, कुठंही अश्लील न वाटणारी प्रेमी युगुलं. आपण एखाद्या स्वप्न नगरीत तर नाही ना असं वाटत होतं.
व्हेन्यू तर इतका भव्य दिव्य. सर्व गोलाकार पायऱ्या, मोठा रंगमंच, मोठाले ग्रीन रूम्स. दिल खूष हुआ. पण मला जरा गरगरत होते. त्यामुळं मूडचे बारा नाही तेरा वाजले होते. ते साहजिकच तोंडावर दिसत होते. मग डीक, जो चेलों आणि गिटार दोन्ही वाजवण्यात कुशल आहे. तो माझ्या जवळ येवून मला अध्यात्म देवू लागला. अगं बाई लाइफ एकदाच मिळते. एन्जॉय करायचे, चिडू भांडू नये. म्हटलं नाही रे बाबा, माझा इन्टर्नल ईअर हलला आहे. त्याने कवटी सटकलेय. तो आ वासुन पाहत राहिला. मग आम्ही दोघेही मोठ्यानं हसलो. या सर्वाचा साउंड चेक होईपर्यंत मी मस्त स्पॅनिश क्युसीन वर ताव मारला. माझे खास जीन्नस होते कालाबतिम सूप जे काकडीचे बनते आणि फेँच फ्राईस. मग आले स्पिनकॉस आणि खुदीआस, तनाओरीआस ई.
पोटपूजा झाल्यावर मी ग्रीन रूम मध्ये जावून मरला जी आज आमच्या बरोबर प्रथमच गाणार होती तिला आणि मरसेला थोडी मेकअप करायला मदत केली. मी ही रेडी झाले. वाट पाहत राहिली एका आनंद सोहळ्याची जो या व्यासपीठावर साकार होणार होता. काही क्षणात! एका अभूतपूर्व अश्या पर्वाला सुरुवात झाली. थोडा काळोख आणि निमीषlत कलाकारांनी आपल्या दैवी सुरांची बरसात केली. प्रचंड टाळ्यांचा वर्षाव आणि रसिकांचा उत्साह याला सीमा न्हवती. एका मागोमाग एक अश्या रेशीम लड़ी उलगडत गेल्या आणि सरते शेवटी प्रेक्षकांनी सभागृह डोक्यावर घ्यायचे बाकी ठेवले होते. मला माझ्या देशाचा, माझ्या कलेचा आणि आई वडील, गुरु आणि ईश्वर यांनी संगीत समजण्याचा जो वारसा दिलाय याचा कोटी कोटी नाही शतकोटी अभिमान वाटला. रात्र उत्तरोत्तर रंगत गेली आणि सुरांची नशा चढत गेली!
क्रमश: