यू टर्न
Max Maharashtra | 29 July 2017 1:03 PM IST
X
X
नेहमीप्रमाणे विक्रमादित्याने स्मशानभूमीत जाऊन प्रेत खांद्यावर घेतले आणि तो चालू लागला. उशीर झाल्यामुळे प्रेतात बसलेला वेताळ वैतागला होता.
“नाराज होऊ नकोस वेताळा, शहरात खूप पाउस झाल्यामुळे मला उशीर झालाय.”
“विक्रमादित्या, तू खरोखरचा राजा आहेस. तेंव्हा राजाला शोभेल अशीच उत्तरे देत जा. सरकारी कार्यालयातील बत्थड डोक्याच्या बाबुसारखी उत्तरे देऊ नकोस आणि स्मशानात वेळेवर येत जा. इथे येण्याची कुणाचीही वेळ एका सेकंदानेही चुकत नाही असा लौकिक आहे, माहित आहे ना?”
“होय वेताळा मी उद्यापासून वेळेवर येईन.” विक्रमादित्य त्याच्या एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या सराईत निगरगट्टपणे उत्तरला.
“हल्ली तूच मला कहाण्या सांगतोस. आजकाल कुणालाच ऐकायचे नसते. प्रत्येकाला फक्त बोलायचेच असते. तेंव्हा तुझे काही सुरु होण्याआधी मी तुला एक कथा सांगणार आहे आणि मग प्रश्नही विचारणार आहे. तुला पुढचे सगळे माहित आहेच की. तुला उत्तर माहीत असूनही जर तू उत्तर दिले नाहीस तर तुझ्याच डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील, वगैरे....”
“होय वेताळा, सांग तुझी कथा!” आपल्या बोअरसम रुटीनला कंटाळलेला विक्रमादित्य म्हणाला.
“राजा, ही कथा नेहमीप्रमाणे पुराणकाळातील नसून सांप्रत काळातील आहे. म्हणजे अगदी ताजी काल परवाची आहे.” राजाने कान टवकारले.
पाटण नावाच्या राज्यात नावात “नीती” असणारा एक नीतिमान राजा राज्य करीत होता. नीतिमान राजा म्हणून सर्व गणराज्यात त्याची मोठी ख्याती होती. जनतेच्या मनातही त्याच्याबद्दल आदर होता. पुढेमागे तो त्या सार्वभौम देशाचा चक्रवर्ती राजा होईल अशी लोकांना आशा वाटत होती. कारण आधीच्या चक्रवर्ती राजाने आपल्याला पूर्ण गंडविले आहे हे त्यांना ‘प्रायव्हेट’ली कळले होते पण ‘पब्लीकली’ मान्य करता येत नव्हते. त्याच्या राज्याचा प्रधानसुद्धा ‘तेजस्वी’च होता. पुढे काय झाले की तेजोमय प्रधानावर चोरीचा आळ आला. राजाला फार दुख झाले. त्याने प्रधानाला सांगितले की तू राजीनामा दे आणि निदान काही दिवस राजधानीत दिसू नकोस. सध्यापुरते तरी सत्तेतून बाहेर पड. कारण माझ्या नीतिमान राज्यात तू असल्यामुळे मी अनीतिमान ठरत आहे. दोघांमधील धुसफूस वाढली. प्रधानाने पदत्याग करण्यास नकार दिला. एका दिवस वैतागलेला राजा स्वत:च पदत्याग करून वनाकडे चालू लागला. सर्व जनतेने राजाची वाहवा केली. नितीमत्तेसाठी इतिहासात राजाचे नाव सुवर्णाक्षराने कोरले जाईल अशी ग्वाही ते एकमेकांना देऊ लागले. राज्यातील वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या. आणि एवढ्यात चक्रवर्ती राजाने त्याला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. त्याने सांगितले, ‘अरे राजा, तू तर राजा आहेस पण मी तर राजांचाही राजा आहे. तू तुझी चूक नसताना असा पदत्याग करू नकोस. तू परत तुझे राज्य सांभाळ. मी तुला नवीन प्रधान देतो. तो माझ्याच कुळाचा असून अतिशय ‘सुशील’ आहे. तुला लागणारी सर्व मदत आम्ही देऊ.’
राजा खुश झाला. त्याने वनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून फुल्ल ‘यू टर्न’ घेतला. पुन्हा ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या. वृत्तवाहिन्यांवर सुरु असणारे डिबेट शो बदलावे लागले. रात्री तडकाफडकी राजा आणि नव्या सुशील असणाऱ्या प्रधानाच्या नावाची घोषणा केली. जुन्या प्रधानाने अनेक ठिकाणी तक्रारी केल्या पण चक्रवर्ती राजाच्या भीतीने कुणी त्याच्या तक्रारी ऐकल्याच नाहीत. जुनाच राजा पुन्हा सत्तेत आला.
आता विक्रमादित्या, मला सांग, नीतिमान असणाऱ्या राजाने नितीमात्तेसाठी राज्यत्याग करून तडकाफडकी आपला निर्णय का बदलला. “अर्थात तुला हे तर माहिती आहेच की माझ्या प्रश्नाचे उत्तर माहिती असून जर तू उत्तर दिले नाही तर ....”
विक्रमादित्याने एक स्मितहास्य केले तो म्हणाला वेताळा, तुला या कलीयुगासाठी कुणी नीतिमान असू शकतो या गोष्टीवर विश्वास ठेवावासा वाटतो याचे मला खरोखर कौतुक वाटते. नावात नीती शब्द असल्यामुळे कोणी नीतिमान होऊ शकत नाही. आजचे राजकारण म्हणजे नितीमता नसून नितीसत्ता आहे. सत्तासुंदरीच्या गळ्यात माळ घालण्यासाठी केलेली नीती म्हणजे आजचे राजकारण आहे. म्हणून त्या राजाने चक्रवर्ती राजाच्या इच्छेप्रमाणे यू टर्न घेतला !
अशाप्रकारे राजाचे मौन भंग होताच वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लटकू लागला.
श्रद्धा बेलसरे-खारकर
Updated : 29 July 2017 1:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire