ठिगळ्या मारुती

ठिगळ्या मारुती
X

नेहमीप्रमाणे प्रधानजी हातात फाईलचे गठ्ठे सावरत चिंताग्रस्त चेहऱ्याने धावत दरबारात आले. “महाराज, महाराज”, अशा हाका मारू लागले. महाराजही नेहमीप्रमाणे आसनावर नव्हते. प्रधानजींनी इकडेतिकडे पाहिले. फाईलींचा गठ्ठा टेबलावर ठेवला आणि व्हरांड्यात जावून पाहिले, तर महाराज ढगाळलेल्या आकाशाकडे बघून दोन्ही हाताने कसला तरी अदमास घेत आहेत असे दिसले.

‘महाराज, काय करता आहात?’ महाराजांचे लक्ष नव्हते.

‘गुड मोर्निग महाराज,’

त्यावर ‘हा.’ असा प्रतिसाद देत महाराजांनी परत आकाशाकडे नजर लावली.

‘महाराज, बोलत का नाहीत आपण?’

‘प्रधानजी, प्लीज डिस्टर्ब करू नका हो.’

‘ठीकाय महाराज, पण ...’

‘प्रधानजी, मी एक बघितले आहे. तुम्हा लोकांना मी अभ्यास केलेलाही आवडत नाही. काम करतोय तेही बघवत नाही.’

‘माफी असावी महाराज, काम काय करीत आहात तेच लक्षात न आल्याने विचारले. स्वारीने हातात घेतलेले काम सांगितल्यास मदत केली असती.’

‘प्रधानजी, मी फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावणार आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या फाटक्या आभाळाला कधी कुणी ठिगळ लावल्याचे ऐकलेय? रिसायकलिंग म्हणतात त्याला. नैसर्गिक स्त्रोत मर्यादित असतात, प्रधानजी.’

‘व्वा व्वा महाराज, ही तर मोठी गोष्ट आहे. ई-टेंडर काढून टाकू का? पण मग ठिगळ कुठल्या कपड्याचे लावायचे? टिकावूपणासाठी धातूचे लावू या का? म्हणजे मग इंग्रजी वृत्तपत्रात आपला विशेष कक्ष ‘He proved his metal.’ असेही छापून आणेल. पण त्याने अंधार फार पडेल. पुन्हा ते मराठवाड्याचे कवी निघायचे गात, “अंधार फार झाला, पणती जपून ठेवा.”

नाहीतर महाराज, आपण प्लॅस्टिकचेच छान पारदर्शक ठिगळ लावू या. आपल्या धोरणाशीही सुसंगतही होईल.”

‘प्रधानजी, अहो, हे काम मला एकट्यालाच करायचे आहे. इतिहासात नाव कोरले गेले पाहिजे ना.’

‘महाराज, आपल्याला इतिहासात आपले नाव ठिगळाने जोडले गेले पाहिजे असे तर म्हणायचे नाही?’

‘प्रधानजी, खामोश!! नो जोक्स प्लीज!’

‘माफ करा महाराज, पण एकूणच किती आकाराचे ठिगळ लावायचे, त्यावर किती मजूर लागणार, त्यांना किती मजुरी द्यायची, ठिगळाचे कापड कोणत्या दर्जाचे हवे? हे तर ठरवावेच लागले ना. शेवटी नियम म्हणजे नियम! मला सगळ्या गोष्टी कागदावर घेऊन वित्त खात्याची मंजुरी मिळवावी लागेल. त्याशिवाय काही करता येणार नाही.’ आता प्रधानजींच्या अंगात अचानक रामशास्त्री प्रभूणेच संचारले होते.

महाराज शांतपणे म्हणाले, ‘प्रधानजी, कुल डाऊन. माझ्या पक्षाने दिलेल्या कपड्याचे ठिगळ मी लावेन. तुम्ही एक काम करा. फक्त सुया दोऱ्यात ओवून द्या. चाळीशी उलटल्यामुळे माझी सुई पटकन दोऱ्यात ओवली जात नाही हो.’

‘नक्की महाराज. मी शासननिर्णयच काढतो, की प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने दिवसातून ५० दोरे तरी ओवून द्यावेत. शेवटी एवढे मोठे आभाळ वेळेत शिवायचे आहे. सर्व कर्मचारी, ज्यांचे मुख्यालय मुंबई किंवा ठाणे आहे आणि ज्यांचे वय ३९ वर्षे आणि ३६४ दिवसापेक्षा कमी आहे, त्यांनी प्रत्येकी ५० सुया ५० दोऱ्याच्या बंडलात ओवल्याच पाहिजेत. सुया शासन पुरवेल दोरे त्यांनी घरून आणावेत. आज ज्यांचे वय ४० वर्षे पूर्ण किंवा त्यापुढे पण ४९ वर्षे ३६४ दिवस किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना ४० सुया देण्यात येतील. ५० वर्षांच्या पुढच्या लोकांना ‘सरसकट’ २५ सुया असे प्रमाण ‘तत्वत:’ ठरवून देवू या. मात्र जरी कुणाचे एका डोळ्याचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन झाले असेल तर त्याने, विहित नमुन्यात योग्य ती स्वयंप्रमाणित प्रमाणपत्रे, सादर केल्यास सुयांची संख्या २० वर आणण्यात येईल.’

‘प्रधानजी, अरेरेरे! हे काय हो. तुम्ही किती जंजाळ करून टाकता नियमांचे ! अहो इतकी चिकित्सा बरी नाही. बर, मला आधी सांगा आता, तुम्ही आल्याआल्या एवढे ओरडत का होतात?’

‘महाराज, आपल्या कारागृहात एका महिला कैद्याची हत्या झाली आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.’

‘प्रधानजी, हे तर रुटीन मॅटर आहे ना. त्या अधिकाऱ्यांना हलवा.’

‘महाराज कारवाई सुरु आहे. पण लोक म्हणतात दोष अधिकाऱ्यांवर अंकुश नसलेल्या सरकारचा आहे. सरकारने जवाब दिला पाहिजे.’

‘कुणाकडे आहे हे खाते ? त्या मंत्र्यावर महाराज फार चिडलेत आणि त्याला पुढच्या खातेबदलात बदलणार अशी अफवा द्या उठवून, आपल्या सोशल मिडिया टीमच्या माध्यमातून..’

‘महाराज, गुस्ताखी माफ असावी पण हे खाते तर आपल्याकडेच आहे.’

‘मग प्रधानजी, जनमत बदला. संबधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायचे निर्देश द्या आणि प्रसारमाध्यमांना ‘कारागृहातील कैदी म्हणजे संताचा समुदाय नाही, त्यांच्याशी प्रसंगी कठोर वागवेच लागते’ अशी जाणीव सिल्कगार्डनला करायला सांगा.’

‘सांगतो महाराज.’

‘आता माझ्या ठिगळ लावण्याच्या मेगा इव्हेंटचे व्यवस्थापन करा बरे! सोशल मिडियाटीमला अलर्ट करा. सरकारी प्रसिद्धी खात्यातर्फे जाहिरात मोहीम राबवा. हो, आणि पेपरमध्ये जाहिरात देताना पहिले पान बुक करा. ती निरमाची जाहिरात आठवते का? त्यांनी कसा सॅशे डकवला होता पहिल्या पानालाच? तसे पहिल्या पानाला वेगळाच आकार देवून त्यावर एक ठिगळ लावा.’

‘महाराज, सुपर्ब आयडिया सरजी !’

‘..आणि टीव्हीसाठी एक जिंगल तयार करा. तुमचे सरकारी प्रसिद्धीवाले लोक बिलकुल क्रियेटीव्ह नाहीत. जिंगलचे शब्दही मलाच सुचले आहेत, ते लिहून घ्या.’ ...आभाळाच्या देवा तुला ठिगळठिगळ वाहू दे.

कर्जमाफीची कृपा तुझी आम्हावर राहू दे.”

राजेसाहेबांच्या साहित्यिक गुणाचा प्रत्यय आल्याने आवक झालेले प्रधानजी स्तुतीसाठी शब्दांची जुळवाजुळव करीत असतानाच महाराजांचे पुढचेही वाक्य आले.

‘...आणि जिंगल गायला कुणाला बोलावताय? एखाद्या फ्रेश गायिकेला द्या हे महत्वाचे जाहिरात-गीत.’

‘महाराज, गुस्ताखी माफ असावी, पण एक विचारू का? हे गायला बंगल्यावरून वहिनीसाहेबांना बोलावू का?’

‘प्रधानजी, मी असल्या गोष्टीत पडत नसतो, तुम्हाला माहित आहे ना, माझी स्वच्छ प्रतिमा वगैरे.. पण जर याउपर तुम्ही बोलावलेच तर मात्र त्यांना सांगा, नो मानधन हं, अजिबात नाही.’

‘होय, महाराज. पण एक शंका आहे. मेगा इव्हेंटची सुरवात कुठे करायची, आपल्या नागपुरातूनच ना?’

‘नागपूर नको, नागपूर नको, प्रधानजी! माझा एक गनिमी कावा लक्षात आलेला दिसत नाही तुमच्या! नागपूरला आपण समृद्धी घेवू. ठिगळे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात टाकू.’

खरे तर ‘द्या टाळी!’ असे म्हणायचाच प्रधानजींना मोह झाला होता. पण चेहरा प्रोफेशनल ठेवत ते म्हणाले, ‘बरोबर महाराज, पण मराठवाडाही नको. तिथल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळत नाही. आपण का कार्यक्रम पुण्यातच घेऊ. पुणेकरांनी एकदा मान्य केले की सगळीकडे मान्यता मिळते.’

‘ठीक आहे, तुम्ही तयारीला लागा, प्रधानजी.’

‘महाराज, हे सर्वात मोठे ठिगळ असल्याने लिम्का बुक वाल्यांनाही बोलावून घेतो!

‘प्रधानजी, कुठेही कसूर ठेवू नका. सगळे कसे व्यवस्थित झाले पाहिजे.’

‘महाराज, एक नंबर करतो व्यवस्था. हे फार मोठे भव्यदिव्य काम आपण करीत आहात. वर्तमानच काय, इतिहासही याची नोंद घेईल. अजून एक विनंती आहे महाराज.’ चाचरत असल्याचे नाटक करीत प्रधानजी म्हणाले. पण मनातून खुश झालेल्या महाराजांना ते आवडले कारण त्यांना कळून चुकले होते की असा टोन लावला की प्रधानजी आपल्याला अनुकूल असेच काहीतरी सुचवीत असतात. त्यामुळे रंगात आलेले महाराज जणू अभय देत आहोत अशा थाटात म्हणाले, ‘बोला, बोला, प्रधानजी, मला कामाबद्दलच्या शंका चालतात. निशंकपणे विचारा.’

‘महाराज, पुण्यात अनेक मारुती आहेत. आपण इव्हेंटनंतर तिथे एक हनुमानाचे मंदिर बांधू. त्याची प्राणप्रतिष्ठेची पूजा अटेंड करून, दर्शन घेऊन निघून जावू.’

‘याचा आपल्याला काय उपयोग?’

‘महाराज, मी नेहमी म्हणतो ना, आमच्या महाराजांना फक्त काम करणे जमते, प्रसिद्धीची अजिबात हाव नाही ते यामुळेच! आता बघा महाराज, पुण्यात अनेक मारुती आहेत. पुणेकर मारुतींची संख्या वाढल्याने त्याने वेगवेगळी अर्थपूर्ण नावे देतात. मग कल्पना करा, आपण तिथून गेल्यावर त्या मारुतीचे नाव काय होईल?’

‘ठिगळ्या मारुती !!’ महाराज अनवधानाने बोलून गेले आणि त्यांना आपल्या प्रधानजींचे कौतुकही वाटले. पण ते आपला जुना पवित्रा पुन्हा ठीकठाक करीत म्हणाले, ‘ते पहा बुवा तुम्ही, मला यातले फार समजत नाही. मी अशा गोष्टीत नसतो हे तुम्हाला माहितीच आहे.’

Updated : 29 Jun 2017 8:54 PM IST
Next Story
Share it
Top