जाणता - अजाणता
Max Maharashtra | 16 Jun 2017 4:06 PM IST
X
X
नेहमीप्रमाणे राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला. त्याने झाडावर लटकणारे प्रेत खांद्यावर घेतले आणि तो चालू लागला. तब्बल १००-१५० पावले चालल्यावरही काहीच न घडल्याने त्याला वाटू लागले की आज आपला उद्देश सफल होणार. “जीवनात ही घडी अशीच राहू दे.” अशा ओळी राजाच्या मनात तरळत असतानाच त्याला खांद्यावरील देहात थोडीशी हालचाल जाणवली. मात्र, पुढे काही झाले नाही. त्यामुळे राजा स्वत:शीच म्हणाला, मन चिंती ते वैरी न चिंती. आपण उगाचच नकारात्मक विचार करायला लागलो. आज काही वेताळ त्याची कथा सांगणार नाही, प्रश्नही विचारणार नाही, आणि त्याचे उत्तर देताना मौन भंग पावल्यामुळे आपली फेरीही वाया जाणार नाही. मनातल्या मनात राजाने “ऑल इज वेल” असे अफर्मेशन केले आणि खांद्याला एक झटका देत प्रेत नीट अॅडजेस्ट करून घेऊन चालण्याचा वेग वाढविला.
मात्र, त्याचा हा आनंद काही फार वेळ टिकला नाही. लगेचच डाव्या कानाआडून ओळखीच्या आवाजात त्याला नेहमीच्या कॉंप्लीमेंटस ऐकू आल्या. “विक्रमादित्या, तुझ्या चिकाटीचे मला खरोखर कौतुक वाटते. डोक्याची शंभर शकले होण्याच्या भीतीमुळे तुला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते आणि मी प्रत्येक वेळी तुझे मौन भंग करण्यात यशस्वी होतो. तू वाचतोस, परंतु त्यामुळेच तुला तुझा भव्य महाल सोडून अमावस्येच्या अशा भयाण रात्री ह्या असल्या वैराण प्रदेशात फिरत राहावे लागते. तरीही तू चिकाटी सोडत नाही याचे मला फार आश्चर्य वाटते. मला तुझ्या कामावरील निष्ठेमुळे एका राजाची कथा आठवते. त्या राजाला प्रजेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित असल्यामुळे लोक त्याला “जाणता” असे म्हणत. मात्र, त्याच्या राजवटीत त्याने लोकांपुढे आ वासून उभ्या राहणाऱ्या एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे त्यालाही माझ्या शापाचा प्रत्यय आला. फक्त तो अतिशय चाणाक्ष असल्यामुळे त्याने प्रत्यक्ष भूतनाथाचीच सेवा करून उ:शाप मिळविला. मग, माझ्या शापात थोडा बदल होऊन त्याच्या डोक्याची शंभर शकले होण्याऐवजी त्याच्या प्रजेचीच हजारो शिरे राज्यातील झाडांवर लटकू लागली. पण, आज तुला मी दुस-या एका अजाण राजाची कथा सांगणार आहे.
मात्र, सर्वच अजाण लोकांप्रमाणे या राजाला आपण अजाण आहोत याची कल्पना नव्हती. उलट आपण अतिशय बुद्धिमान आहोत असे त्याचे ठाम मत होते. आपल्या या बुद्धीला स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून तो स्वत:ही खूप अभ्यास करत असे व आपल्या प्रधानालाही अभ्यास करायला लावत असे. त्यामुळे तो हळूहळू अभ्यास करणारा राजा म्हणून प्रसिद्ध झाला. निसर्गचक्राप्रमाणे राज्यात आधीच्या राजवटीपासूनच घोर दुष्काळ पडला होता. सगळे पर्यावरण दुषित झाल्याने अनेक वर्षे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी अवकाळी वृष्टी अशा संकटाची मालिका सुरु होती. प्रजा जेरीस आली. शिवाय आधीच्या राजाला मिळालेल्या उ:शापामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीतच होते. बाकीच्यानांही कसेबसे पोट भरणेही अशक्य झाल्याने ते कर्जबाजारी झाले. नापिकीमुळे कर्ज फेडणे अशक्य, त्यामुळे आपल्या राजाने हे कर्ज माफ करावे अशी मागणी ते करू लागले. अभ्यासू राजा सरकारी गंगाजळी खाली करण्याच्या विरुद्ध होता. तो प्रजेला कर्जमुक्ती द्यायला तयार होईना. मुळातच अभ्यासू असल्याने त्याला हा प्रश्न खूप अभ्यास करून सोडवावा आणि हल्लीच्या मुलांसारखे १००% मार्क पाडून घ्यावेत असे वाटे. त्याने गावाततळी बांधली आणि चांगल्या पावसासाठी तो प्रार्थना तो करू लागला.
त्याने केलेल्या अभ्यासानुसार एकदा तळी भरली की, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार होता आणि सरकारी गंगाजळीही सुरक्षित राहणार होती. पण, दुर्दैवाने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. इकडे राजाचा अभ्यास काही संपेना त्यामुळे शेवटी त्याच्या राज्यातील शेतक-यांचा धीर सुटून ते रस्त्यावर आले. त्यांनी उठाव सुरु केला. या उठावाचा आणखी एक परिणाम म्हणून आजूबाजूच्या राज्यातही अशीच बंडे होऊ लागली. मग ही खबर दिल्लीच्या चक्रवर्ती महाराजापर्यंत गेली. त्याने राजाला प्रजेचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचा आदेश दिला. आता साक्षात सम्राटाचा आदेश आल्याने राजाला अनिच्छेने सरकारी गंगाजळीवर पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याने प्रशासनाला बोलवून शेतकऱ्याचे कर्ज सरसकट माफ करत असल्याचे फर्मान काढले. प्रधानजी ते फर्मान घेऊन दरबारातून बाहेर पडणार तेवढ्यात राजाने त्यांना परत बोलावले. तो म्हणाला, “प्रधानजी, अशी सरसकट कर्जमाफी दिली तर आपला सगळाच खजिना खाली होईल आणि मग इतरही लोक नुकसानीचे कारण पुढे करून अशाच मागण्या करू लागतील. फर्मानात बदल करा. प्रधानजी म्हणाले, “महाराज सरसकट हा शब्द काढला तर पुन्हा उठाव होऊ शकतो आणि मोठ्या महाराजांची आपल्यावर खप्पा मर्जी होऊ शकते.
त्याऐवजी सरसकट हा शब्द कायम ठेऊन नव्या चतुर कार्पोरेट कुटीलतेने आपण खाली बारीक अक्षरात “कंडीशंस अप्लाय” असे लिहू. राजा खुश झाला. “अरे व्वा ! प्रधानजी, तुम्ही तर आपल्या विषयाबरोबर कार्पोरेट संस्कृतीचाही चांगला अभ्यास केला दिसतोय.” “कसचे, कसचे महाराज. आपल्याच तालमीत तयार होतो आहे.” असे म्हणत प्रधानजींनी कलम हातात घेतली व ते अगदी बारीक अक्षरात एकेक अटी व शर्ती लिहू लागले. यथावकाश फर्मान बाहेर गेले दवंड्या पिटल्या. अर्थातच फर्मानातील अटींमुळे पैसे काही एकही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. शेवटी सगळीकडे पाऊस सुरु झाल्यामुळे प्रजा शेतीच्या कामात व्यस्त झाली. तरीही एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर पदरात काहीच न पडल्यामुळे जनतेत ठिकठीकाणी नाराजी व कुरबुर होतीच.
कथा संपवून वेताळ म्हणाला, “विक्रमादित्या, आता तू दोन राजांची कथा ऐकली. एक जाणता आणि एक अभ्यासू. आता मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे दे. तुला माझ्या अटी व शर्ती तर ठावूकच आहेत! उत्तर तुला माहित नसेल आणि तू अभ्यासासाठी वेळ मागितलास तर चालेल. मात्र, माहीत असूनही उत्तर दिले नाहीस तर माझ्या जुन्याच अटी व शर्ती लागू राहतील.
माझा पहिला प्रश्न :- सर्व काही “जाणणाऱ्या राजाची” राजवट उलथवून टाकणारे लोक त्याच्यापेक्षाही जास्त अभ्यास करणाऱ्या राजाविरुद्ध का बंड करू लागले?
माझा दुसरा प्रश्न :- आधीच्या राजाला कंटाळून त्यांनी नव्या राजाला राज्याभिषेक केलेला असतानाही ते परत पहिल्या राजाच्या आश्रयाला का गेले ?”
वेताळाची उत्तर माहित असून दिले नाही तर काय होते ती अट माहीत असल्याने विक्रमादित्याने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले. “वेताळराज, आधीच्या राजाला उत्तरे माहीत होती पण त्याने ती कधी दिलीच नाहीत. उलट त्या उत्तराचा उपयोग करून घेऊन त्याने फक्त स्वत:ची आणि आप्तस्वकीयांचीच संपत्ती वाढविली. म्हणून लोकांनी चिडून त्याची राजवट उलथवून टाकली. कारण, वेताळा, चांगले राज्य करण्यासाठी फक्त उत्तरे माहिती असणे पुरेसे नाही. राजाची नियत साफ पाहिजे. त्याला स्वार्थ असता कामा नये. प्रजेचे हित हाच त्याला आपला स्वार्थ वाटला पाहिजे. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर - नवा राजा प्रामाणिक होता. अभ्यासूही होता. परंतू, राजकारण म्हणजे १० ची परीक्षा नाही. काही वेळा प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा, लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी, पहिल्या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न निर्माण करता आले पाहिजेत. नवा राजा फक्त उत्तरे शोधत बसला. त्याला राजकारणात प्रश्न निर्माण करण्याचे महत्व समजलेच नाही. त्यामुळे प्रजा पुन्हा आधीच्या राजाच्या शरण गेली. ”अशा प्रकारे राजाचे मौन भंग होताच प्रेतात बसलेला वेताळ राजाच्या खांद्यावरून निघून शेतकऱ्याप्रमाणे झाडाला जाऊन लटकू लागला.
श्रद्धा बेलसरे खारकर
Updated : 16 Jun 2017 4:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire