खड्ड्यांची सफर
Max Maharashtra | 22 July 2017 1:21 PM IST
X
X
विक्रमादित्य नेहमीप्रमाणे झाडावरचे प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला. आज त्याने स्मशानाबाहेरून थोडे मुंबई शहरात फेरफटका मारण्याचे ठरविले असावे. यापूर्वीही वेताळाला राजाने मुंबईत आणलेले असल्याने त्याने लांबूनच मुंबई शहर ओळखले आणि तो म्हणाला,
“राजा आज काय नवीन?” यावर राजा म्हणाला,
"नवीन? काही नाही."
“अरे गेल्या वेळेस आपण मुंबईत आलो. तेव्हा तू मला विधानभवन दाखविले होते आणि त्या पूर्वी उंचउंच इमारतीमध्ये राहणारे आय.ए.एस लोक दाखविले होतेस. आज काय दाखविणार आहेस?” त्यावर राजा म्हणाला,
"आज मी तुला मुंबईचा पाऊस दाखविणार आहे. तो पहायला अरबस्थानातून लोक येतात. समुद्रामध्ये पडणारा धुवाँधार पाऊस बघणे हा एक अनुभव असतो. हा अनुभव तू घ्यावास असे मला वाटते.” राजा चालू लागला रस्तावर तुरळक वाहतूक होती. दुतर्फा लावलेल्या ट्युबलाईटमुळे आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या धारा चमकत होत्या. बराच वेळ राजा चालत होता. मध्येच पाऊस थांबला. आता वातावरणात गारवा पसरला होता. वेताळाला मात्र सारखे धक्के बसत होते. एकदा तर राजा पडतापडता सावरला. कसाबसा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आधार घेऊन त्याने स्वत:चा तोल सांभाळला. या गडबडीत वेताळाने मात्र राजाच्या पाठीला घट्ट मिठी मारल्यामुळे तो बचावला.
“राजा आज तुझे लक्ष दिसत नाही. कुठल्यातरी गहन विचारात गढलेला दिसतो आहेस.” त्यावर राजा म्हणाला, “खरोखरच आज मी संभ्रमित झालो आहे. मला समजेना की, इथून रस्ता कसा काढायचा.”वेताळ काही वेळ प्रश्नार्थकपणे बघित राहिला आणि पुढे म्हणाला, “यापूर्वीही आपण येथे आलो पण चालताना आजच तू का अडखळतो आहेस. त्यावर राजा म्हणाला, “अहो वेताळराज, पावसाळ्यामुळे रस्त्याचे काय हाल झाले आहेत ते बघत आहात ना ! जागोजागी मोठमोठे खड्डे झाले आहेत.” राजा बोलत असतानाच समोरुन एक मोठी कार भरधाव वेगाने आली आणि रस्तावर पाणी असल्याने काहीच अंदाज न आल्याने सरळ एका मोठ्या खड्ड्यात गेली. बंद पडली. कसेबसे त्यात बसलेले लोक धडपड करून बाहेर आले आणि गाडी बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू लागले. खड्ड्यातले चिखल मिश्रीत थंडगार पाणी विक्रमादित्य आणि वेताळाच्या अंगावर उडाले आणि ते दोघेही पार भिजून गेले. पुन्हा मोठ्या नेटाने राजा चालू लागला. आता मात्र तो तर प्रत्येक पावलाला अडखळू लागला होता.
वेताळाने काहीशा सवयीनेच प्रश्न केला, “राजा आपण रस्ताने जातो आहोत की खड्ड्यातून?” राजा हताशपणे उद्गारला, “आपण खड्डे असलेल्या रस्त्यातून जात आहोत. आता तर इथे चालणेही मुश्कील झाले आहे.”
“राजा मला सांग. जर आपले हे हाल होत आहेत तर दिवसा लाखोंनी मुंबईत येणाऱ्या लोकांचे काय होत असतील? या राज्यात रस्त्यांची देखभाल कोण करते? त्यावर राजा म्हणाला, “रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेचे असते. महापालिकेवर आता वाघाचे साम्राज्य आहे. आणि कदाचित मैत्रीभाव म्हणूनच त्यांनी पुढील निवडणुकीत मुंबई शहरात अधिक कमळे फुलण्यासाठी रस्त्यात खड्डे तसेच ठेवून त्यात चिखलाची राळ केली आहे. त्यातूनच उद्या कदाचित खरेच अधिक कमळे फुलतील.”
“आले लक्षात ! पण राजा, इथले लोक याला विरोध करत नाही का ? आवाज उठवत नाही का ?”
“वेताळराज, हळू बोला. इथे थोडे जरी कोणी बोलले तरी खपत नाही. एका रेडीओ निवेदिकेने एक साधे पोरकट गाणे म्हंटले होते, ‘भरोसा नाही का?’ तर त्यावर केवढे मोठे रामायण झाले होते परवाच ! उगाच तु ही अडचणीत येशील आणि मलाही आणशील.”
शेवटी रस्ता संपत आल्याने वेताळाने एक स्मार्ट मूव्ह घेतलीच. तो म्हणाला, “राजा आज मी तुला एकही गोष्ट सांगितली नाही. कारण तू मला दुसऱ्याच गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केलास. पण तरीही नियम म्हणजे नियम ! मी तुला एक प्रश्न विचारणारच ! आणि तुला उत्तर माहित असून नाही दिलेस तर परिणाम यावेळी अधिक गंभीर आहेत. तुझ्या शिराचे शंभर शकले होऊन मुंबईच्या रस्त्यातील खड्यात बुडून जातील. तेंव्हा सावध.” राजाने स्मितहास्य केले. तो म्हणाला, “वेताळराज आता आपण दोघे एकमेकांना चांगलेच ओळखू लागलो आहोत. रस्ता संपत आला तेंव्हाच मला अंदाज होताच. विचारा आपला प्रश्न !”
“राजा वाघ हा जंगलाचा राजा आहे. तो हरीणाची शिकार करतो. त्याच्या एका डरकाळीने सगळे जण थरकापतात, मग त्याने मोठी शिकार न करता आळ्या का शोधाव्यात ???
वेताळा दिवस बदलत गेले. पिढ्याही बदलल्या. आवडी निवडी बदलल्या. आपण जंगलाचे राजे आहोत आपल्याविरुद्ध कुणी काही बोलायचे नाही ही मानसिकता आजूबाजूच्या हुजऱ्यांनी तयार केली. त्यामुळे एका छोट्या मुलीने वाकुल्या दाखवल्यावर संतापलेल्या वाघाला तिला धडा शिकवण्यासाठी आळ्या शोधायची वेळ आली. अशा प्रकारे राजाचे मौनभंग होताच प्रेत झाडावर जाऊन लटकू लागले.
- श्रद्धा बेलसरे खारकर
Updated : 22 July 2017 1:21 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire