Home > रवींद्र आंबेकर > युवासेनेची पाकिस्तानला थेट मदत...

युवासेनेची पाकिस्तानला थेट मदत...

युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी यवतमाळ मध्ये कश्मिरी युवकांना अपमानास्पद वागणूक देत मारहाण केल्याची घटना घडलीय. कश्मीरमध्ये तुझे नातेवाईक आमच्या जवानांना मारतायत असं बोलून या युवकांना थेट दहशतवादी असल्याचा टॅगच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. युवासेना जे करतेय तेच कश्मीरी युवकांनी कश्मीरमध्ये केले तर ते दहशतवादी कॅटेगरीत येतात, शबरीमाला प्रकरणाच्यावेळी संपप्त भाविकांनी रस्त्यावर उतरून तुफान दगडफेक केली, पण अशी दगडफेक कश्मीर मध्ये केल्यावर दहशतवादी म्हटलं जातं. आपल्या कश्मीरशी संबंधित व्याख्या अतिशय स्वच्छ आणि ठाम आहेत. कश्मीरच्या युवकांवर जर आपण देशभरात असे हल्ले करत राहिलो, तर आपण दहशतवाद्यांनाच मदत करत आहोत हे, आपल्याला समजत नाहीय हेच या देशाचं दुर्दैव आहे.

पाकिस्तानच्या एका राजकीय नेत्याने कालच एक ट्वीट केलं होतं, तो नेता म्हणतोय की मी पाकिस्तानी आहे, आणि मी हिंदू आहे. मला पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे, कारण तो माझा देश आहे. कश्मीरमध्ये कश्मीरी मुसलमानांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आपण माणूसकीच्या नात्याने का होईना पण निषेध केला पाहिजे. मला वाटतं, ही भूमिका खूप सांगून जाते.

कुलभूषण जाधव प्रकरणात आतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान भारतीय माध्यमांच्या अनेक बातम्या पाकिस्तानने संदर्भ म्हणून वापरल्या. कसाबच्या वेळेसही अशा बातम्या वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला. काश्मीरी मुसलमानांवरच्या अत्याचाराच्या बातम्याही पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सतत ठेवत असतो. अशा बातम्या, व्हिडीयो दाखवून दाखवून अनेक तरूणांचं ब्रेनवॉश केलं जातं. त्यांच्यात इथल्या व्यवस्थेच्या विरोधात विष भरलं जातं. मुख्यप्रवाहातील कश्मीरी युवकांवर, त्यांच्या उद्योगांवर हल्ले करून आपण पाकिस्तानलाच प्रत्यक्ष मदत करत आहोत, हे आपल्याला समजायला हवं. आपण दहशतवाद्यांच्या कँपना तरूणांची माथी भडकवण्याचं साहित्य पुरवतोय, हे ही आपल्याला समजलं पाहिजे.

अखंड हिंदुस्तान वगैरे घोषणा देणाऱ्यांना पाकिस्तानमधलेच काय भारतातील मुसलमानही नकोसे आहेत. कश्मीर आपल्या अविभाज्य भाग आहे, असं ठणकावून सांगणाऱ्यांना कश्मीरी मुसलमान मात्र नको असतात. सतत कश्मीरी पंडीतांच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगून जनमत भडकवणाऱ्यांनी कश्मीरी पंडीतांच्या छावण्यांमधला शिधा आणि सुविधा या सरकारच्या काळात का बंद झाल्या? याची साधी चौकशीही कधी केल्याचं ऐकिवात नाही. कश्मीरी पंडीतांच्या पुनर्वसनाचा कुठला असा मोठा कार्यक्रम या सरकारने राबवला आहे, 2008 मध्ये कश्मीरी पंडीतांसाठी घोषित पॅकेजची अंमलबजावणीही अद्याप पर्यंत झालेली नाही. कश्मीरी पंडीतांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधण्यामध्ये जम्मू-कश्मीरचं सरकार अयशस्वी झालं, भाजपप्रणित सरकारने ही आपल्या कार्यकाळात तिथे काही भरीव कामगिरी केलेली नाही.

मध्यंतरी आपली फसवणूक झाल्याच्या भावनेने कश्मीरी पंडीतांनी पंतप्रधान मोदींकडे साकडं ही घातलेलं आहे. एकूणच, कश्मीर, कश्मीरी मुसलमान आणि कश्मीरी पंडीत यांच्या बाबतीत आपला समाज सतत दांभिक भूमिका घेत आला आहे.

एखादी घटना घडली की, तत्कालीक प्रतिक्रीया द्यायच्या, माथी भडकवायची याच्या पलिकडे राजकीय नेत्यांना दुसरं काही काम नाही. पर्यटक म्हणून जाऊन कश्मिरी महिलांवर वाईट नजर टाकणारे, अनेक जण देशभक्त म्हणून मिरवताना मी पाहिलंय.

देशात ज्या पद्धतीने झुंडशाहीचं वातावरण तयार झालंय, झुंडीनं जाऊन कुणाला तरी टार्गेट करायचं, यात कसलं शौर्य आलंय. मध्यंतरी मध्यप्रदेशच्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी पाकिस्तानच्या आयएसआय साठी हेरगिरी केल्याची घटना समोर आली. यातल्या एकाही बहाद्दुराला त्यांच्या कानाखाली मारावी का वाटली नसेल.. आपली देशभक्ती इतकी सिलेक्टीव का असते..

देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी यांचा विचार करायची गरज आहे. आज या राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष पणे दहशतवाद्यांना मदत केली आहे, उद्या हीच प्रकरणे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडली जाणार आहेत, नवनवीन तरूणांना दाखवून त्यांना दहशतवादी कँपमध्ये रिक्रूट केलं जाणार आहे, त्यावेळेला तुमच्या अशा ‘देशभक्ती’मुळे आपला देश अडचणीत येणार आहे, आपले सैनिक मारले जाणार आहेत. याची जबाबदारी अशा नादान राजकारण्यांच्याच शिरावर येणार आहे.

Updated : 21 Feb 2019 5:08 PM IST
Next Story
Share it
Top