काँग्रेसवर का बोलत नाहीत प्रकाश राज?
X
तुम्ही प्रश्न विचारताना सिलेक्टीव्ह का असता? सध्या जे-जे लोक व्यवस्थेला, सत्तेला प्रश्न विचारतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. सत्तेला, धर्माला, जातीला आणि ज्यांचा सहसा उल्लेख केला जात नाही त्या अर्थसत्तेला प्रश्न विचारण्यांना आणखीही काही प्रश्नांना सामोरं जावं लागतं, आणि ते म्हणजे तुम्ही तेव्हा कुठे होता, तेव्हा का नाही काही बोलला, तुमची जात-धर्म कुठला... इ. असल्या प्रति-प्रश्नांनी मग प्रश्न विचारण्यांची भंबेरी उडते, किंवा ते आपण तेव्हा काय काय बोललो, कसं बोललो, काय काय केलं याची यादी वाचायला लागतात. एकदा का ही यादी वाचायला तुम्ही सुरू केली की, उत्तर द्यायची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांचा विजय होतो. त्यांची प्रश्नापासून सुटका होते आणि प्रश्न विचारणारा चक्रव्यूहात अडकतो.
आजवर मी अनेक विचारवंताना या चक्रव्यूहात अडकताना पाहिलंय. असाच काहीसा प्रश्न सध्या मोदी विरोधामुळे चर्चेत आलेल्या प्रकाश राज यांना ही सर्वत्र विचारण्यात येतो. परवा एका कार्यक्रमात आमची भेट झाली. त्या कार्यक्रमातही त्यांना सारखं हाच प्रश्न विचारला जात होता. प्रकाश राज यांच्याकडे मात्र यावर फार मस्त उत्तर आहे, ते म्हणतात कुणाला प्रश्न विचारायचा आणि कधी विचारायचा हे ठरवायचा अधिकार मला आहे की नाही. या आधी नाही विचारला कुणाला प्रश्न.. पण आता विचारतोय. प्रश्न विचारायला सुरूवात केलीय, यापुढे जे जे सत्तेत बसतील त्यांना प्रश्न विचारेन. या पुढचा प्रश्न म्हणजे तुम्ही प्रश्न विचारताना सिलेक्टीव का आहात. प्रकाश राज यांचं यावरचं उत्तर मला भन्नाट वाटलं.. ते म्हणतात साब, बहोत साफ है, एबीसी को पुछना है.. एक्सवायझेड को नहीं पुछना है..!
आपण कोणाला आणि का प्रश्न विचारतोय याचं भान आपल्याला असलं की झालं. प्रश्न विचारणाऱ्याला प्रतिप्रश्न करून गप्प करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी प्रकाश राज यांनी विविध क्लुप्त्या शोधून काढल्यात. संविधान बदलण्याची भाषा बोलणाऱ्या हेगडे यांच्या सर्वा सभांमध्ये प्रकाश राज यांचे कार्यकर्ते जाऊन गाय हंबरते तसं हंबरतात. कानडी मध्ये गायीला अम्बाSS म्हणतात. अम्बा असं हे कार्यकर्ते अशा हेल मध्ये बोलतात की ऐकणाऱ्याला डम्बो ऐकू जाईल..यामुळे हेगडे सध्या परेशान आहेत. जस्टआस्कींग असा हॅशटॅग वापरून प्रकाश राज दररोज सरकारला विविध प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नामुळे सध्या भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. प्रकाश राज हे काँग्रेसकडून सुपारी घेऊन काम करतायत असा त्यांच्यावर आरोप ही लावण्यात आलाय, मात्र प्रकाश राज यांच्या कामात काही खंड पडलेला नाही.
आपण प्रश्न विचारले पाहिजेत. मात्र ते जड असता कामा नयेत. काही वेळा प्रश्न नाही विचारला तरी चालेल, पण जे लोक मूर्खासारखं वागतायत त्यांच्या वागण्यावर हसलं तरी बरंचसं काम होतं असं प्रकाश राजचं म्हणणं आहे. आपण आपला विरोध सेलिब्रेट केला पाहिजे. आपल्या भूमिकेवर कायम राहिलं पाहिजे. विरोधक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील, पण अशा वेळी आपण संयम सोडता कामा नये. आम्ही भेटलो त्याच्या एक दिवस आधीच प्रकाश राज यांची बायको डान्सर आहे अशी कँपेन होऊन गेली होती. प्रकाश राज म्हणतात की अंडरवर्ल्ड पण साधा नियम पाळतो, की आपल्या लढाईत परिवार आणायचा नाही. पण ज्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत ते मात्र अंडरवर्ल्डच्याही खाली उतरलेयत. ते लहान मुलं- बहिण- बायको- आई वडील यांनाही वादात आणायला मागेपुढे पाहत नाहीत हे वेदनादायी आहे, पण मोठी लढाई लढत असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी आपल्या अभिनयक्षेत्रातील करीअर पणाला लावून सरकार विरोधात 'जस्ट आस्कींग' या नावाने आंदोलनास सुरूवात केली. गौरी चा मृतदेह शवागारातून मधून मीच बाहेर काढला. तेव्हा गौरी मला विचारत होती, असं मला वाटलं. प्रश्न विचारण्याचा आपला हक्क-अधिकार मरेपर्यंत आपण बजावला पाहिजे. म्हणून मी बाहेर पडलो. आज मोदी सत्तेत आहेत, उद्या दुसरं कुणी असेल.. त्यांनाही मी विचारेन.. 'मिस्टर प्रधानमंत्री..........??? '
माझी भूमिका स्पष्ट आहे. कँसर आणि खोकल्यापैकी सर्वांत मोठा आजार कँसर आहे तर कँसर वर उपचार करा. खोकल्याचं नंतर बघता येईल. मी कँसरवर उपचारासाठी फिरतोय. म्हणूनच मी ठरवलंय.. एबीसी वर बोलायचंय एक्सवायझेड वर नाही..