निवडणूक लढवायची की नाही - विरोधी पक्षांतल्या आमदारांमध्ये प्रचंड दहशत
Max Maharashtra | 22 Jun 2019 5:12 PM IST
X
X
निकाल काय लागणार आहे, त्यामुळे निवडणूक लढायची की नाही याचा विचार केला पाहिजे, कशाला पैसे घालवा, झाकली मूठ सव्वा लाखाची – ईव्हीएमच सगळा खेळ करणार असेल तर निवडणुकीला काय अर्थ आहे, पाच वर्षे मतदारसंघात इतकी कामं केली पण त्याचा काही फायदा नाही.. या अशा स्वरूपाची वाक्ये विधानभवनाच्या परिसरात सातत्याने ऐकायला मिळत आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. हे अधिवेशन शेवटचं अधिवेशन आहे. त्यानंतर तीन-चार महिन्यात राज्यात निवडणुका होतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन महत्वाचं मानलं जातं. लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि विरोधकांच्या चेहऱ्यावरची चिंता काही लपून राहिलेली नाहीय. संपूर्ण विधानसभा परिसरात सध्या निवडणुकीचीच चर्चा ऐकायला मिळतेय.
विरोधक गलितगात्र
लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानंतर विरोधकांमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. पक्षाच्या पातळीवर उभारी येईल असं कुठलंही वातावरण सध्या विरोधी पक्षात नाही. विधानसभेत फार आक्रामकपणा दाखवला तर उगीचच रडारवर येऊ या भीतीपोटी विरोधी पक्षातले आमदार फार आक्रमक व्हायला तयार नाहीत. जवळपास सर्वच आमदार आणि पक्षातील नेत्यांचा ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा समज असल्याने आपण काहीही केलं तरी निवडून येऊ की नाही अशी शंका निर्माण झालीय.
ऑपरेशन २२० ची धास्ती
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने २२० जागांवर विजय मिळवायचं लक्ष्य निश्चित केल्याच्या बातम्या आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय जनता पक्षाने पुणे-पिंपरी चिंचवड-लोकसभा अशा निवडणुकांमध्ये जे आकडे सांगीतले तितक्या जागा निवडणूक निकालांच्यावेळी भाजपा युतीला मिळाल्या. त्यामुळे भाजपाच्या आकड्यांची जादू समजत नसल्याने आमदार चिंतेत आहेत.
भाजपाला मतदान करतं तरी कोण?
मी व्यक्तिशः अनेक आमदारांशी बोललो. आम्ही लोकांमध्येच असतो. लोक जे काही सांगतात त्यावरून भारतीय जनता पक्षाची जिथे बांधणी नाही, संघटना नाही, मतदार नाहीत अशा ठिकाणी ही कसं काय मतदान होतं हा न समजणारा मुद्दा आहे असं बऱ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी सांगीतलं. खासदार उदयन भोसले यांनी तर आपण खासदारकीचा राजीनामा देतो मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेऊन दाखवा असं चॅलेंजच निवडणूक आयोगाला दिलंय. अनेक ठिकाणी मतदान आणि पडलेली मते यात तफावत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, यावर निवडणूक आयोगाने समाधानकारक खुलासा न केल्यानेही नेते-कार्यकर्ते यांच्या मनात संभ्रम आहे.
भाजपाची जमेची बाजू
अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही तसंच विविध सरकारी योजनांमध्येही मोठी ऑनलाइन चाळणी सरकारने लावली आहे. असं असलं तरी ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला आहे तो थेट मिळाला आहे. ऑनलाइन आणि लाभार्थ्यांना थेट मदतीचं किंवा पैशाचं वितरण यामुळे लोकांना थोडं फार लाभ मिळाला तरी तो थेट मिळत आहे. राजकीय दलालांचं यामुळे काही अंशी उच्चाटन झालंय. ऑनलाइन प्रक्रीयेतही काही लोक लाभार्थ्यांना नाडत आहेत, मात्र याचा राजकीय फायदा काँग्रेस-एनसीपी ला घेता येत नाहीय. सरकारच्या योजना आधी लोकांसाठी बनायच्या पण त्याचा लाभ राजकीय कार्यकर्त्यांना मिळायचा, त्यातून एखादी योजना वाचली की लोकांपर्यंत पोहोचते असा समज दृढ झाला होता. याच समजाचा फायदा उचलत भाजपाने आपली रणनिती आखली आहे. काँग्रेस-एनसीपीच्याच योजना नावं बदलून अधिक लोकाभिमुख करण्यावर भाजपाने भर दिलाय. त्यासाठी जाहीरातींचा मारा करण्यात सरकारने काहीही कसर सोडलेली नाही.
विरोधी पक्षातल्या मनातून हरलेल्या, विचलित, ढेपाळलेल्या, संधीसाधू नेत्यांना हेरून भारतीय जनता पक्षाने त्यांना पुनरूज्जीवनाची हमी दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांवर घराणेशाहीचा आरोप करायचा आणि त्यांची लोकमानसातली प्रतिमेला तडे द्यायचे आणि त्याच नेत्यांना आपल्या पक्षात आणून सर्वसामान्य वागणूक द्यायची अशी पद्धती भाजपाने सध्या अंगिकारली आहे. भाजपाच्या तंबूत तुलनेने कमी वयाचे नेते आहेत. अशा तरूण नेतृत्वापुढे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधले जुने-जाणते नेते हतबल झालेयत. मतदारांचं बदललेलं मन ओळखण्यात हे नेते कमी पडतायत, तर दुसरी कडे या नेत्यांने घरगुती तसंच आर्थिक हितसंबंध यामुळे त्यांना नवीन नेतृत्व पुढे आणून नवीन बांधणी करता येत नाहीय. हेच ओळखून भारतीय जनता पार्टी सध्या इतर पक्षांवर अंकुश ठेऊन आहे.
पारंपारिक राजकारण विरूद्ध नवं राजकारण
विष उतरवायला विषच लागतं या न्यायाने भारतीय जनता पार्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये त्याच पक्षातून नेते आणून तिकिटं वाटली. या बालेकिल्ल्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाने या भागांमध्ये आपली समांतर पक्षबांधणी सुरू केली. नवमतदार, त्यांच्या बदललेल्या अपेक्षा, कार्यकर्त्यांना संधी आणि तंत्रज्ञानाचा आक्रमक-कल्पक वापर यामुळे भाजपा सध्या इतर पारंपारिक पक्षांपेक्षा वरचढ दिसत आहे. विरोधी पक्षातले अनेक नेते निर्बुद्धपणे भाजपाचं अनुकरण करतानाही दिसतात, मात्र त्यांना अपेक्षित निष्कर्ष मिळालेला नाही. सध्यातरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांतल्या आमदार-नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या राजकारणाचा नवा अर्थ शोधण्याचा संकल्प घेतलेला दिसतोय.
- रवींद्र आंबेकर
Updated : 22 Jun 2019 5:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire