Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > सत्ता आणि पक्ष बदलणारे उंदीर

सत्ता आणि पक्ष बदलणारे उंदीर

सत्ता आणि पक्ष बदलणारे उंदीर
X

सत्ता आली की पक्ष बदलणाऱ्यांना उंदीरांची उपमा देऊन नितीन गडकरी यांनी सध्याचा राजकीय परिस्थितीचं यथार्थ वर्णन केलं आहे. सध्याच्या राजकारणात जे काही थोडे लढाऊ आणि आपल्या विचारांशी प्रामाणिक नेते आहेत त्यात नितीन गडकरी आघाडीचे नेते आहेत.

नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामध्ये सच्चे पणा जितका आहे तितकीच भीती पण आहे. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने भारतीय राजकारणाचा चेहरा, इतिहास आणि भूगोल बदलायचं काम सुरू केलं आहे. बहुमताच्या जोरावर जे जे करता येणं शक्य आहे ते ते सध्या हे दोघे करत आहेत. सत्तेसाठी ताकत पाहिजे, कधी कधी ती अशीच कमवता येते. कधी कधी तुम्हाला सप्लीमेंटस् खावे लागतात, स्टीरीऑईड घ्यावे लागतात. या स्टीरीऑईड आणि सप्लीमेंटस चे बरेच साईड इफेक्ट असतात. पण सत्तेत असताना अशा साइड इफेक्टची पर्वा सहसा कुणी करत नाही. गडकरी यांना ती चिंता जाणवतेय.

आतल्या-बाहेरच्या लोकांबरोबर लढून गडकरी यंदा लोकसभा निवडणूक जिंकून आलेयत. त्यांना पाडण्यासाठी विविध घटक काम करत होते. शेजारच्या राज्यातून लोकं विरोधात प्रचार करण्यासाठी आले होते, यावरून त्यांचं त्यांच्या पक्षातलं ‘वजन’ लक्षात येतं. पण गडकरी लढले आणि जिंकले ही.

गडकरी यांनी सध्याच्या आयाराम गयाराम स्थितीवर केलेलं भाष्य खरं तर विरोधी पक्षांसाठी आत्मचिंतन करायला लावणारं आहे. मध्यंतरी लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी विजय दर्डा यांनी किस्सा सांगितला होता की, त्यांनी राहुल गांधींना सांगीतलं होतं की नागपूरात गडकरी पाहिजेत. त्यामुळे आम्ही गडकरींना पाडणार नाही. या नंतरच्या भाषणात गडकरींनी जे सांगीतलं ते विचार करायला लावणारं आहे. ते म्हणाले की प्रफुल्ल पटेलांच्या निवडणुकीच्या वेळी दर्डा गडकरींची मदत मागायला गेले होते, त्यांना गडकरींनी सांगीतलं की प्रफुल्ल पटेल माझेपण मित्र आहेत, पण मी माझ्याच पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार! विचारांमधला हा स्पष्टपणा हल्ली अभावाने जाणवतो. गडकरी यांनी तो जपला आहे.

अनेक वर्षे विरोधी पक्षात राहून तग धरण्याची क्षमता भारतीय जनता पक्षात आलीय. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जन्मालाच सत्तेत येतात आणि मरेपर्यंत सत्तेत राहतात अशी स्थिती निर्माण झाली होती. सत्तेशिवाय कसं राहायचं हे त्यांना अजून जमलं नाहीय आणि पचनी पडलेलं नाही.

पक्षांतराचा नवीन कायदा आणला पाहिजे असं ही गडकरी म्हणाले, सध्या असा कायदा सत्ताधारी पक्षाच्या हिताचा नसल्याने तो येणार नाही, किंवा त्यावर विचार ही होणार नाही. पण असा कायदा आला तर निदान राजकीय आयुष्यात कथित जनहित, जनतेची कामं यांच्या पेक्षा जास्त विचारधारेला ही महत्त्व असतं हे लोकांना पटेल. आपल्याला न पटणाऱ्या विचारधारेत बागडण्याची तडजोड करण्याइतकं असं कुठलं जनहित अडलेलं असतं तेच मला कळत नाही.

जे लोकप्रतिनिधी नाहीत अशांच्या पक्षबदलांना एकवेळ आपण समजून घेऊ शकतो, निष्ठा डळमळीत होऊ शकतात. पण जे लोकप्रतिनिधी आहेत, ते आचारसंहिता लागायच्या आधी राजीनामा देऊन जनतेचा विश्वासघात करतात, त्यांच्या डोक्यात नक्की कसलं जनहित असतं याचा शोध घेतला पाहिजे. मॅक्समहाराष्ट्र कडे राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा जवळपास सर्वच आमदारांचा ‘बायोडाटा’ आहे. गेले तीन वर्षे आमच्या टीम ने गोळा केलेल्या माहिती-कागदपत्रांमध्ये आम्हाला आमदार सांगतात त्याप्रकारचं कुठलंच ‘जनहीत’ आढळून आलेलं नाही. त्यामुळे ही स्वहिताची लढाई आहे. त्यासाठी सुरू झालेली ही पक्षांतरं आहेत. त्यांना त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्यामुळे नितीन गडकरी यांचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरचं भाष्य महत्वाचं ठरतं.

Updated : 3 Sept 2019 8:40 AM IST
Next Story
Share it
Top