हिंदू खतरें में है!
X
राज्यात गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेच्या थटथयाटाला कोर्टाने रितसर बंदी घातलेली असतानाही अनेक छत्रपतींना हा आपल्या धर्मावर आक्रमण असल्यासारखं वाटतंय. डीजे लावणं, त्यावर धुंद होऊन नाचणं आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचं अनेकांना वाटतंय. धर्माच्या नावावर असा उन्माद दाखवणाऱ्यांना खरं तर चाबकाने फोडून काढायला हवं. लोकशाहीच्या नावावर अशा नतद्रष्टांना फार मोकळीक देणं हे लोकशाहीचं दीर्घकालीन नुकसान करून घेण्यासारखं आहे.
मशिदींवरचे भोंगे चालतात तर आमचा डीजे का चालत नाही असा मूर्खपणाचा सवालही अनेक जण करत फिरत आहेत. मशिंदींवरचे भोंगे तर उतरवायलाच हवेत, पण म्हणून तुम्हाला डीजे लावायचं लायसन्स नाही मिळू शकत. म्हणजे एखादा नालायक असेल तर मी अतिनालायक होईन अशी स्पर्धा नाही लागू शकत. सध्या हिंदू असल्याचा अनेकांना ज्वर चढला आहे. हा हिंदुत्वाचा ज्वर प्रतिगामी आहे. या ज्वर तुमचा जीवच घेणार आहे, त्यामुळे मिरवणुकीत सामील होणाऱ्या हिंदूंनो सावधान, अशा आजारी हिंदूंच्या नादाला लागू नका. वर्षानुवर्षे गणपतीच्या मिरवणुका सुरू आहेत. गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूप ही धार्मिक उन्मादासाठी नव्हतं, तर त्यामागे प्रबोधन हा हेतू होता. या हेतू पासून तुम्हाला दूर नेणाऱ्या वर्गणीबाज प्रवृत्तीपासून सावधान.
मी हिंदू आहे, मला माझा धर्म जपण्याचा अधिकार आहे, असा प्रतिवाद करणाऱ्यांच्या खरंतर कानाखालीच दिली पाहिजे. पण लोकशाहीत आपण संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे माझा भर आताही संवादावरच असतो. डीजे लावणं म्हणजे हिंदुत्व नाही. डीजे हा विज्ञानाचा अविष्कार आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवायला आपल्याला मुलभूत अक्कल नाही, आणि बुद्धीची देवता समजल्या जाणाऱ्या गणपतीसमोरच असा निर्बुद्ध प्रकार चालत असेल तर आपल्याला हे थांबवायला हवं.
विविध मार्गाने हिंदू धर्म धोक्यात आहे असा प्रचार सध्या केला जातो. हिंदुत्व-हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून रस्त्यावर एकजूट दाखवण्याची किती गरज आहे हे मनात बिंबवलं जातं. मुस्लीमांच्या विरोधात हिंदू धर्म नाही असं भारतात येऊन सांगणारे जंगली कुत्री एकत्र येऊन सिंहाची शिकार करू शकतात, म्हणून हिंदूनी एकत्र यायला पाहिजे अशी भीती घालतात. खरं तर हिंदू धर्म धोक्यात नाही. हिंदू धर्म धोक्यात येऊ शकत नाही. इथल्या धर्माच्या ठेकेदारांमुळे संयमी, विचारी, विवेकी, सहिष्णु हिंदू धोक्यात आहे. त्याला सतत घाबरवलं जातंय. उन्मादी बनवलं जातंय. त्याला सतत अतिरेकी विचारांच्या लोकांची भीती दाखवून अतिरेकी विचारच कसा आवश्यक आहे हे भासवलं जातंय. रस्त्यावर उतरून कुणाला तरी एकजूटीची दहशत दाखवली पाहिजे असं ठसवलं जातंय. ज्या उत्सवांचा हेतू एकोपा वाढावा असा होता, त्या उत्सवांचा वापर धार्मिक उन्माद वाढवायला केला जातो.
माझ्या आजीच्या घरी गणपती आणला जायचा. मानेकाकांची हलगी आणि लेझीम, कांबळेंचा प्रसाद, अब्दुलभाईची म्युजिक सिस्टीम लागल्याशिवाय गणपतीचा सण सुरू व्हायचा नाही. म्युजिक सिस्टीमचा आवाज इतर कुणाला त्रास होणार नाही इतका ठेवला जायचा. माझी आजी अशिक्षित होती, पण तिला हे कळायचं. गणपतीच्या काळात आमच्या चाळीतील सर्वजण रात्रभर जागायचे. गप्पा मारायचे, पारंपारिक गाणी म्हटली जायची, सर्वजण वय विसरून नाचायचे. मरेपर्यंत तीने गणपती आणला, गणपतीची पुजा मात्र तिने कधी केली नाही. आम्ही कधी तिला गणपतीच्या पाया पडताना पाहिलं नाही. सर्वजण एकत्र येतात म्हणून ती गणपती आणायची. गणपतीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र यायचे, कदाचित याच काळातल्या आपसातल्या संवादामुळे आणि एकोप्यामुळे दोन मोठ्या जातीय-धार्मीक दंगलीच्या काळातही आमच्या चाळीला त्याची झळ लागली नाही.
माझ्या आजीला जे समजलं होतं ते आजकालच्या कथित छत्रपतींना समजत नाही. कोर्टाला याबद्दल निर्णय द्यायला लागतो. हिंदू धर्मासाठी यापेक्षा लाजीरवाणी आणखी काय गोष्ट असू शकते. बाकी हिंदू धर्मच दिसतो का लिहायला, इतर धर्मावर पण लिहा अशी टीका करणाऱ्यांनी हा लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचावा.
रवींद्र आंबेकर