Home > रवींद्र आंबेकर > बारबंदीचा निर्णय, पडद्यामागची कहाणी

बारबंदीचा निर्णय, पडद्यामागची कहाणी

बारबंदीचा निर्णय, पडद्यामागची कहाणी
X

‘आज महत्वाची घोषणा करणार आहे, रवी जरा मदत करा,’ आर. आर. पाटील यांनी सभागृहात प्रवेश करताना हळूच कानात सांगितलं. एखाद्या रिपोर्टरसाठी एवढी हिंट पुरेशी असते. मी अधाशीपणे विचारलं, ‘काय घोषणा आहे?’ आर. आर. पाटील हलकेच हसले आणि म्हणाले, सांगतो!

नंतर काही वेळातच विधानपरिषदेत डान्सबार वरची चर्चा सुरू झाली. गरमा-गरम चर्चा सुरू होती. नंतर आर.आर. पाटलांनी भाषणाला सुरूवात केली. आम्ही आबांच्याच दालनात भाषण ऐकत बसलो होतो. आबा नेहमीच्याच आवेशात भाषण करत होते. आवेशा-आवेशातच आबांनी बारबंदीचा निर्णय जाहीर केला. आबांनी हा निर्णय जाहीर करताच एकच हल्ला उडाला. सगळीकडे पत्रकारांची पळापळ सुरू झाली. ब्रेकींग न्यूज सुरू झाल्या. आबांची वाट बघत सगळेजण विधानपरिषद आणि दालनाकडे उभे होते. थोड्या वेळात लोकांच्या गर्दीतच आबा दालनात आले. आबांच्या मागे नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती.

आबा थोडे टेन्शन मध्ये दिसत होते. मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून समजलं होतं की, खरं तर पनवेल आणि परिसरातल्या बारबाबत निर्णय करायचा होता. खासकरून ग्रामीण भागातील बार बाबत बंदी करायची होती, पण आबांनी आवेशात राज्यभरात बंदी जाहीर केली. त्यामुळे आबा टेन्शन मध्ये आहेत. मी आबांना विचारायचा प्रयत्न केला. पण आबा मूड मध्ये नव्हते. आबांनी सर्वांना केबिनच्या बाहेर काढायला सांगितलं. मी आणि एक-दोन पत्रकार केबिन मध्ये होतो. आबांनी शरद पवारांना फोन लावला. मेसेज ठेवला, आणि फोनची वाट बघत बसले. केबिनमध्ये सन्नाटा होता.

थोड्या वेळात फोन खणाणला. आबा इतर कुणालाही ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात काही तरी बोलले.. नेमकं बोलले की नाही हे सुद्धा कळलं नाही. तोंडावर हात पकडला होता, जेणेकरून ते काय बोलतात याचा अंदाज कुणाला लावता येऊ नये. समोरून अर्थातच शरद पवारांनी काही तरी सांगीतलं आणि आबांचा चेहरा खुलला. ओके..ओके म्हणत आर. आर पाटलांनी मोठ्या आदराने रिसिव्हर खाली ठेवला. फोन ठेवण्यातल्या अदबीत पण ते कुणाशी बोलले असावेत याचा अंदाज बांधता यायचा.

चला बाईट द्यायला येतो, असं म्हणत आर.आर.पाटील मिडीया स्टॅँडकडे यायला तयार झाले. आम्ही मीडिया स्टँडपर्यंत जायला निघायच्या आतच जगभरातल्या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर मुंबईतली नाइट लाइफ बंद अशा आशयाच्या बातम्या झळकल्या. आबांना मी सांगितलं, आज एकदम जगभरात प्रसिद्ध झालात. न्यूयॉर्क टाइम्स पासून सगळीकडे एकच बातमी आहे..

आबांनाही आश्चर्य वाटलं, एवढासा निर्णय त्याला जगभरात इतकं कव्हरेज कसं काय मिळालं. मुंबईची नाइट लाइफ हा जागतिक पातळीवर आकर्षणाचा मुद्दा होता. इथले डान्सबार हा पर्यटकांचाही आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. आता याचा परिणाम एकूण पर्यटन, अर्थकारणावर,ग्लॅमर, गुन्हेगारी, राजकीय हितसंबंधांवर होणार हे स्पष्टच होतं. आबांना यापुढचा काळ कठीण असणार आहे, याची कल्पना लागलीच आली होती. पण, थोड्याच वेळापूर्वी त्यांना शरद पवारांकडून जीवनदान मिळालं होतं, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्सही वाढला होता. याच कॉन्फिडन्समध्ये आर.आर. मिडीया स्टँडकडे निघाले. त्यानंतर ते जे बोलले ते सर्वांनी ऐकलंच होतं. आबांच्या आणि मुंबईच्या जीवनातली एक नवी सुरूवात त्या दिवशी झाली. उंचीने कमी असलेल्या या नेत्याने आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी, धनदांडग्यांशी पंगा घेतला होता. आबा सहसा भावनेच्या भरात काही करत नव्हते. बारबंदीचा सरसकट निर्णय हा भोळेपणाने, किंवा उत्साहाच्या भरात, अनवधानाने घेतलेला निर्णय नव्हता. त्यानंतर आबांवर बारबालांच्या संघटनांकडून खूप टीका झाली. माध्यमांनीही, (खास करून हिंदी आणि इंग्रजी) उद्ध्वस्त बारबालांच्या कहाण्या दाखवायला सुरूवात केली. त्याचा खूप दबाव आर.आर.पाटलांवर सतत असायचा. या निर्णयामुळे आबांची एकूण राजकीय प्रतिमा बदलून गेली, महिलांनी मोठ्या प्रमाणावर आबांना समर्थन दिलं.

मला आजही आबांचा टेन्शनमधला आणि फोननंतर खुललेला चेहरा आठवतो. कधी कधी त्यांचा एक प्रश्न मला असायचा,

खरंच तो निर्णय इतका मोठा होता का?

- रवींद्र आंबेकर

Updated : 18 Jan 2019 5:13 PM IST
Next Story
Share it
Top