नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि बरंच काही...
Max Maharashtra | 17 Sept 2019 10:27 AM IST
X
X
आजच्या दिवशी निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्रात येत आहे. निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर हे पथक दिल्लीत जाईल, आणि मग काही दिवसांत निवडणूकांची घोषणा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या जाहीर सभेनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने तमाम भारतातले मोदीमय झालेली लोकं त्यांना शुभेच्छा देत आहेत. या गर्दीत सामील होऊन जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न आपण ही पाहू शकतो, पण किती ही प्रयत्न केले तरी हे स्वप्न पडायला काही तयार नाही. मोदी आल्यावरच असं घडतंय अशातला भाग नाही, आधीच्या सरकारांच्या काळातही असलं काही स्वप्न पडत नव्हतं. आताही तेच होतंय.
वाढदिवसाच्या दिवशी नरेंद्र मोदी सरदार सरोवराला भेट देत आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आदिवासींचं विस्थापन आलं. त्याबद्दल नरेंद्र मोदी कधीच काही बोलले नाहीत. आजही नर्मदा बचाओ आंदोलनाचं जलसमाधी आंदोलन नित्यनेमाने महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरच्या गावांमध्ये होत असतं. विकासाचा भला मोठा पुतळा उभारत असताना त्यातला मानवीय चेहरा विसरला जाऊ नये ही माफक अपेक्षा असते, ती पूर्ण करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींवर देशाने सोपवलीय.
नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करत असताना कश्मिरमध्ये अजूनही स्थिती सामान्य झालेली नाही. कश्मिरमध्ये पुन्हा जनजीवन सुरळीत करण्याचं मोठं आव्हान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर आहे. भारताच्या बाजूने असलेले काश्मिरी नेते ही या वेळी नजरकैदेत आहेत. सर्वोच्च न्यायालयात या संबंधीच्या केसेस प्रलंबित आहेत. वेळ पडली तर आपण स्वतः काश्मिर मध्ये जाऊ असं सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधिशांनी सांगितलंय.
फारूख अब्दुल्ला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून ताब्यात आहेत असं सांगण्यात येतं. फारूख अब्दुल्ला जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगत असतात की मी भारतीय आहे. फारूख अब्दुल्लांना जेव्हा जेव्हा भेटलो आहे, तेव्हा तेव्हा ते भारता बद्दलच बोलायचे. त्यांना गीता पाठ आहे, ते मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान येऊन भजनं गायचे. आज ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाले असतील तर मोठा गंभीर विषय आहे.
पीडीपी सोबत सरकार बनवण्यामागे काय रणनीती होती वगैरे व्हॉटसऍप पोस्ट वाचलेल्या तमाम भारतीयांना भारतीय जनता पक्षाच्या देशभक्ती विषयी शंका नाहीय. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या समर्थक आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुयायांना देशातल्या इतर लोकांच्या देशभक्ती वर शंका घेण्याचं ही काही कारण नाही.
नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा बहुमताने निवडून दिलंय देशाने. त्यांच्याकडून बेरोजगारी नष्ट करणे, देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, समान विकास करणे, काळ्या पैशाला रोखणं, उद्योजकता वाढवणं, देशातला विद्वेष कमी करणं, जात-धर्माच्या नावावर कायदा हातात घेणाऱ्या झुंडींना रोखणं इ इ अपेक्षा आहेत. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना आर्थिक-औद्योगिक क्षेत्रातल्या मंदीचा सामना करावा लागतोय. त्याचे प्रभाव देशाच्या एकूण विकासावर होतोय. राजकीय क्षेत्रात मोदी तेजीत आहेत. सतत निवडणूक कँपेन मोड वर असल्याचा ही आरोप त्यांच्यावर होतो. आता देशातला विरोधी पक्ष जवळपास संपलाय. मोदींना मोकळं मैदान आहे. तरी त्यांचा पाय अजून विरोधी पक्षात घुटमळतोय. एखादा कमजोर पैलवान चांगली संधी असतानाही तुम्ही मला सोडा मी यांना बघून घेतो, असं सारखं म्हणत असतो. त्याला मोकळं सोडलं तरी तो काही करत नाही. मोदींचं तसं झालंय, त्यांना मोकळं सोडलेलं असतानाही ते आता समोरच्या समस्या-आव्हानांना बघायला तयार नाहीत. या पर्सेप्शन मधून मोदींनी देशाला आता बाहेर काढलं पाहिजे. देशातला, देशाच्या आर्थिक राजधानीतला विरोधी पक्ष संपलाय. आता त्याला उगीच मारत बसण्यात अर्थ नाही. आता देशासमोरच्या खऱ्या-खुऱ्या आव्हानांचा सक्षमपणे सामना करायला हवा. देश तुमच्या पाठीशी आहेच.
Updated : 17 Sept 2019 10:27 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire