सोनिया गांधींचा गेम...
X
सध्या काँग्रेसमध्ये पुनर्रुजीवनाची चर्चा आहे. यासाठी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला असून पक्षांतर्गत निवडणुका योग्य रितीने व्हाव्यात, पक्षाला जमीनीवर काम करणाऱ्या पूर्णवेळ नेत्याची गरज आहे, अशा स्वरूपाच्या भावना या २३ नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच पक्षाला संस्थात्मक नेतृत्वाची गरज आहे. असं म्हणत या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी घराणेशाहीला आव्हान ही दिलं आहे. ज्यांनी खरंतर स्वतःच मार्गदर्शक मंडळात जायला हवं, अशी वरिष्ठ मंडळी काँग्रेसला अंतर्बाह्य बदलण्यासाठी मोहीम करतायत, ही पण एखादी राजकीय खेळी असू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे.
वरिष्ठ नेत्यांनी लिहिलेलं पत्र हा सोनिया गांधी यांचा गेम आहे की, पक्षातील नेत्यांनी मिळून गांधी परिवाराचा गेम करायचं ठरवलंय? हे आजच्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत काही वेळातच ठरणार आहे. काँग्रेसची रचना पाहता गांधी परिवारावर टीका करून कोणीही पक्षात टिकू शकलेलं नाही. अशा वेळी केंद्रीय नेतृत्वाच्या चुका दाखवणारं २३ नेत्यांचं पत्र हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
राहुल गांधी यांनी अपेक्षेपेक्षा चांगलं नेतृत्व दिलेलं असलं तरी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला त्यांच्या सारखी धरसोड भूमिका परवडणारी नाही. त्याचमुळे संस्थात्मक, पूर्णवेळ, जमीनीवर काम करणारं नेतृत्व अशी मागणी पुढे आली असावी. राहुल गांधी हे मोदींवर ट्वीटर च्या माध्यमातून हल्ला चढवतात, त्याला ऑनलाइन प्रतिसाद ही चांगला मिळतो. मात्र, खाली पक्षाची बांधणीच नसल्याने ही केवळ आभासी लढाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत काँग्रेसला जमीनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. अशा कानपिचक्या २३ नेत्यांच्या नथीतून तीर मारत सोनिया गांधी यांनी दिलेल्या असाव्यात असं माझं निरिक्षण आहे.
राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा परत जाणार असेल तर त्यांच्यावर यंदा सामुहीक नेतृत्व करण्याबाबत दबाव टाकण्यात येईल. असं ही एकूण चित्र दिसत आहे. राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष केलं तर त्यांना तुल्यबळ अशी कार्यकारी समिती अथवा कार्यकारिणीही देण्यात येईल, किंवा कोअर टीम बनवण्यात येईल असा कयास आहे.
त्यामुळे काँग्रेसमधल्या घडामोडी या काही पक्षासाठी फार आशादायक नाहीयत. सोनिया गांधी अद्यापही निर्णयप्रक्रीयेच्या केंद्रस्थानी आहेत. राजकीय परिपक्वता या एका गुणामुळे राहुल गांधी यांचं सपशेल नेतृत्व स्वीकारण्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अडचण आहे, या अडचणीवर आजच्या बैठकीत मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं दिसतंय.
- रवींद्र आंबेकर