BJP vs CONGRESS : विधानसभा कोण जिंकणार ?
Max Maharashtra | 16 July 2019 6:04 PM IST
X
X
काँग्रेसमध्ये बहुप्रतिक्षीत खांदेपालट झाला आणि भाजपाने ही आपली नवी टीम जाहीर करून टाकली. बाळासाहेब थोरात आणि चंद्रकांत दादा पाटील या वेगळ्या छापाचं राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या खांद्यावर राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांचं नेतृत्व सोपवलं गेलंय.
दोन्ही ही नेते आपापल्या पक्षाशी निष्ठा राखून आहेत. कदाचित या निष्ठेचं त्यांना हे बक्षिस ऐन निवडणुकीच्या आधी मिळालेलं असावं. बाळासाहेब थोरातांसाठी लढाई वाटते तितकी सोपी नाहीय. पक्ष धुळीला मिळालाय. पक्षातले वरिष्ठ नेते नाराज आहेत, कार्यकर्ते घाबरलेले आहेत. बाकीच्यांना काही सुचत नाहीय. पक्षाला मरगळ आलेली आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे.
काँग्रेस कडे गावागावात कार्यकर्त्यांचं जाळं आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांना कार्यक्रम देईल असा नेता मात्र नाही. एखाद्या नेत्याला जास्त शक्तीशाली होऊ द्यायचं नाही हा काँग्रेसचा अलिखित नियम. आणि त्याचमुळे सतत बहुपायांची शर्यत इथल्या राजकारणात खेळवली गेलीय. बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाची सूत्रे देत असताना पाच कार्याध्यक्ष ही दिले गेले आहेत. बाकी माजी मुख्यमंत्री पायात पाय घालायला बसलेले आहेतच.
काँग्रेस पक्षाची सर्वांत मोठी शोकांतिका ही आहे की, बरीच वर्षे सत्तेत राहिल्याने या पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला जमत नाही. आता आंदोलन करायला जावं तर वेळही उरलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, पैशाशिवाय काहीच होत नाही हा विचार काँग्रेस मध्ये पक्का रूजलेला आहे. त्यामुळे विचार किंवा विचारधारा यासाठी ही पक्षाचं काम करायचं असतं ही भावनाच लुप्त झालेली आहे.
दुसरी कडे चंद्रकांत दादा पाटलांसाठी सोयीच्या ग्राऊंडवर मॅच आहे. रणनिती आखायची जबाबदारी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची आहे. पक्ष सध्या एकेकाळच्या ऑस्ट्रेलियाच्या टीम सारखं खेळतोय. सर्व निवडणुका जिंकल्या जातायत. नव्या-जुन्या नेत्यांना पक्षात ‘आदेश’ पालनाच्या पलिकडे काहीही काम ठेवण्यात आलेले नाही.
राज्यात जे अडचणीचे विषय होते त्यावर भाजपा सरकारने रणनितीच्या आधारे पकड मिळवलीय. आपापसातील भांडणांपासून बाहेर येऊन विरोधक विचार करू शकतील अशी स्थिती राहिलेली नाही. लोकसभा पराभवाचा झटका इतका जोरात लागलाय की विधानसभा निवडणूक लढवावी की नाही या वंचनेत विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षाच्या मतांमध्ये फूट पडण्यासाठी जागोजागी विविध घटक कार्यरत आहेत. आपल्या मतांचं लिकेज थांबवण्याची कुवतच विरोधी पक्षात राहिलेली नाही.
अशा परिस्थितीत अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या चंद्रकांत दादा पाटलांना पक्षाची धुरा सोपवून पक्षाने त्यांचा सन्मान केलाच आहे, त्याचबरोबर चंद्रकांत दादा हे येणाऱ्या काळातलं नेतृत्व असणार आहे यावर ही शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यात भाजपाच्या ज्या ज्या लोकांच्या मनात मुख्यमंत्रीपदाच्या आशा-आकांक्षा आहेत त्या सर्वांना या पुढे चंद्रकांत दादांना पार करूनच पुढे जावं लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत दादांनी बारामतीचा पाडाव करायचा विडा उचलला आहे. चंद्रकांत दादांनी बारामती मध्ये प्लॅटच भाड्याने घेतलाय, असं सांगण्यात येतंय. अशावेळी काँग्रेसचे नवीन अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपली निवड झाल्या-झाल्या शरद पवार यांची भेट घेऊन आघाडी धर्म पालन करण्याचं आश्वासनच आपल्या कृतीतून दिलं आहे. येणारी विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची असणार आहे. अनेक महत्वाच्या नेत्यांचं राजकीय करिअर पणाला लागणार आहे.
पुढच्या विधानसभेत अनेक मोठे चेहरे कदाचित दिसणार नाहीत. अशा परिस्थितीत आपला आहे तो गड राखण्याचं आव्हान बाळासाहेब थोरात यांच्यासमोर असणार आहे, तर आपली स्थिती जगज्जेता सिकंदराप्रमाणे होऊ नये म्हणून आहे त्या सैन्याची उमेद सांभाळायची जबाबदारी पाटलांवर असणार आहे. एकूणच, दोन मोठ्या पक्षाच्या नेतृत्वात झालेल्या बदलामुळे या निवडणुकीत फारशी रंगत येणार नसली तरी या निवडणुकीची दिशा मात्र स्पष्ट झाली आहे.
रवींद्र आंबेकर, संपादक, मॅक्समहाराष्ट्र
Updated : 16 July 2019 6:04 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire