‘काही लोकांचे’ विष
X
नुकतीच मी जुनैद खानचे वडील जलालुद्दीन यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत ते असं काही बोलले की ज्यामुळे मी सुन्न झालो. ‘ते आमचा एवढा द्वेष का करतात, की आमच्या धर्मामुळे ते आमचा खून करतात?’ सोळा वर्षीय जुनैदचा चाकूचे वार करुन खून करण्यामागे, ट्रेनच्या सीटवरुन झालेला वाद कारणीभूत असल्याच्या बातम्या येत असल्याबद्दल मी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. “ इतना गुस्सा सीट को लेकर नही होता सर, वो मेरे बेटे को ऍंटी-नॅशनल कह रहे थे, उसकी टोपी और कपडों लेकर गाली दे रहे थे,” ते सांगत होते. जलालुद्दीन संतापलेले होते आणि तरीही त्यांनी कमालीचा संयम बाळगला होता. त्यांच्या मुलाचे खूनी हे समाजाचे प्रतिनिधी नसल्याचे मान्य करण्याचा मोठेपणा त्यांनी यावेळी दाखवलाः “पांचो उंगलीया एक जैसी नहीं होतीं सर, कुछ लोग ऐसा सोचते है.”
आणि त्यातूनच मी माझ्या मुख्य प्रश्नाकडे येतोः कोण आहेत हे ‘कुछ लोग’ जे एका तरुण मुलाची तो जसा दिसतो त्यावरुन, तो घालत असलेल्या कपड्यांवरुन, तो मानत असलेल्या धर्मावरुन हत्या करतील? कोण आहेत हे ‘कुछ लोग’, जे इस्लामोफोबियाच्या वाढत्या लाटेत एवढे वाहून गेले आहेत, की ते संपूर्ण समाजाकडेच एका ठराविक दृष्टीनेच बघतील आणि चांगलं आणि वाईट यामध्ये फरक करण्याची थोडीही पर्वा करणार नाहीत? कोण आहेत हे ‘कुछ लोग’ ज्यांनी समाजांमध्ये भीती आणि द्वेष पसरवण्याचा मार्ग निवडला आहे.
खरं म्हणजे, जुनैदची हत्या ज्यांनी केली ते वास्तवात केवळ साधे सैनिक आहेत. त्यांना हे नैतिक बळ मिळतं ते धार्मिक-राजकीय सत्ताधारी आणि त्यांच्या खंद्या समर्थकांकडून पसरवण्यात येत असलेल्या धोकादायाक अशा धार्मिक राष्ट्रवादाच्या भावनेतून. ज्यांचा ठाम विश्वास असतो की विशिष्ट समाजातील लोकांना ‘धडा शिकवणे’ गरजेचे आहे. कशाबद्दल धडा, तर, लष्करने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल, काश्मीरमधील दगडफेकीबद्दल, पाकिस्तानच्या निर्मितीबद्दल, लंडनमधील हल्ल्याबद्दल आणि आणखी भूतकाळात जात, मुघल आक्रमणाबद्दल, सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या तथाकथित तुष्टीकरणाबद्दल आणि गौ रक्षकांच्या प्रकरणात, अगदी ‘ते’ खात असलेल्या अन्नाबद्दल.. जमावाकडून होत असलेल्या हत्येच्या प्रत्येक घटनेनंतर, ही भाषा बोलणाऱ्यांच्या आवाजाचा प्रतिध्वनी आणखी मोठा होताना दिसत आहेः हिंसेचे समर्थन करण्यासाठी नवनविन कारणे शोधून काढली जात आहेत. खून आणि लक्ष्यित हिंसा यामध्ये नैतिक समतोल आणण्याचा प्रयत्न म्हणून गेल्या सरकारच्या कार्यकाळात जमावाकडून झालेल्या हत्यांची आकडेवारी बाहेर काढली जात आहे.
या प्रकरणी कसलाही मतभेद व्यक्त करणारा आवाज गप्प करण्याच्या दृष्टीनेच या आवाजाची रचना करण्यात आली आहे. जेणेकरुन अशा प्रकारचे हल्ले हे अगदी सामान्य गुन्हेगारी कृत्याचा भाग असल्याचे वाटेल. जे याविरुद्ध बोलतात त्यांना ‘सुडो-सेक्युलर’ उदारमतवादी ठरवण्यात येत असून, त्यांच्यावर पक्षपाती नजरेतूनच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. “ तुम्ही तेंव्हा बोललात का, जेंव्हा दिल्लीमधील डेंटीस्ट डॉ. नारंग यांची जमावाने ठेचून हत्या केली होती?” ते तुम्हीला विचारतात. हो, त्या हत्येबद्दलही तुम्ही बातमी केली असल्याचं तुम्ही रागाने सांगता. पण मग त्याविरोधात सातत्यापूर्ण मोहीम कुठं राबवली, ते प्रतिप्रश्न करतात. म्हणजे, आता कॉलम सेंटीमीटर किंवा टीव्हीवर त्याविषयासाठी दिला गेलेला वेळ किंवा तुम्ही केलेल्या ट्विटस् या गोष्टींच्या आधारे हिंसेच्या विरोधातील सामुहीक क्षोभाची भावना मोजली गेली पाहिजे.
जर तुम्हाला भारतात कुठेही आणि कोणत्याही गुन्ह्यामध्ये झालेल्या हिंदू व्यक्तीच्या हत्येबद्दल ‘पुरेसा’ क्षोभ वाटत नसेल, तर जेंव्हा मुसलमान व्यक्तीची मुसलमान असल्याच्या कारणाने हत्या होते, तेंव्हादेखील तुम्हाला क्षोभ व्यक्त करण्याचा अधिकार नाही, आम्हाला सांगितले जाते. उद्देश स्पष्टच आहेः असुरक्षित गटांसाठी आवाज उठविणाऱ्यांना एवढ्या बचावात्मक परिस्थितीत नेऊन पोहचवा, की त्यांचा आवाज क्षीण होईल आणि तो प्रबळ दाव्यांपुढे जवळजवळ असंबद्धच ठरेल. एक तर त्यांचं मान्य करा किंवा शिक्षेसाठी तयार रहा.. जेंव्हा ठेचून मारण्यानेच वाद संपुष्टात येऊ शकतात, तेंव्हा तुम्हाला दंगलीची गरज नसते, जिथं केंद्रीय मंत्री दादरी प्रकरणातील खुन्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावतात, पण शोकाकूल कुटूंबियांचे सांत्वन करत नाहीत, जिथं अलवारमध्ये खुन्यांचा ‘गौरव’ केला जातो, पण त्यात बळी गेलेल्यांना मात्र न्यायाची लढाई स्वबळावर लढण्यासाठी सोडून दिले जाते.
आणि तरीही, जेंव्हा जेंव्हा एखाद्याला त्याच्या सामाजिक ओळखीमुळे ठेचून मारले जाते, तेंव्हा तेंव्हा आपण आवाज उठवलाच पाहिजे. कारण जबाबदार आणि माणुसकी असणारे नागरीक म्हणून आपण हे करु शकतो. कारण आपल्याला आणखी अखलाक, अयुब, पेहलुस आणि जुनैद नको आहेत किंवा आणखी उना, दादरी आणि अलवारसुद्धा... कारण लोकशाहीमध्ये नेतृत्वापर्यंत तुमचा आवाज मोठ्याने आणि स्पष्टपणे पोहचवणे गरजेचे असते आणि अपराध्याविरुद्ध वेगाने कृती करणेही.... कारण जेंव्हा आपले देशबांधव हे भीतीच्या छायेत असतात आणि त्यांच्यामध्ये आपला बळी जात असल्याची भावना निर्माण होते, तेंव्हा मौन हा काही पर्याय असू शकत नाही. कारण जेंव्हा नेते हे पोकळ विधानांशिवाय काही करणार नसतील, तेंव्हा लोकांनीच त्यांना जबाबदार धरणे आवश्यक असते. कारण हा भारत आहे, एक असा देश, जिथं कायदा महत्वाचा आहे, जिथं घटनेनंच येथील नागरीकांना समानतेचा मुलभूत अधिकार दिला आहे. कारण भारत काही पाकिस्तान नाही आणि तो एक बहुसंख्यांक देश होऊही शकत नाही आणि झालाच नाही पाहिजे. कारण खरा ‘हिंदू धर्माभिमानी’ हा ‘राष्ट्राभिमानाच्या’ नावाखाली अशा प्रकारच्या हिंसेचं कधीच समर्थन करणार नाही. कारण जो भारत चूक आणि बरोबर यात फरक करु शकत नसेल, तो माझा भारत नाही.
ता.कः जलालुद्दीन यांनी या वर्षी ईद साजरी केली नाही आणि बल्लभगढमधील अनेक गावकऱ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. मी त्यांना पुढच्या वर्षीच्या ईदच्या उत्सवात सहभागी होण्याचे वचन दिलं आहे आणि ते दिवाळीत माझ्याबरोबर येतील अशी मला आशा आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा वेगळा असा हा अगदी अद्वितिय देश आहेः त्यांच्या शेवया आणि माझे श्रीखंड यातील गोडी, या ‘कुछ लोग’ अर्थात काही लोकांच्या आत्म्यातून पसरत असलेले ‘द्वेषा’चे हे विष दूर करो...
राजदीप सरदेसाई.
अनुवाद - सुप्रिया पटवर्धन