Home > राजदीप सरदेसाई > माध्यमांमधली दुफळी गौरी लंकेशना न्याय मिळवून देऊ शकत नाही

माध्यमांमधली दुफळी गौरी लंकेशना न्याय मिळवून देऊ शकत नाही

माध्यमांमधली दुफळी गौरी लंकेशना न्याय मिळवून देऊ शकत नाही
X

1993 चे वर्ष मुंबईसाठी अतिशय भयानक होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगली आणि त्यापाठोपाठ झालेले भीषण बॉम्बस्फोट यामुळे मुंबई हादरली होती. पण बऱ्याच लोकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की त्याचवर्षी शिवसेनेकडून काही पत्रकारांवर हल्ले झाले आणि त्यांच्या कार्यालयांचीही तोडफोड करण्यात आली. पण केवळ मूक साक्षीदार बनून न रहाता, मुंबईतील पत्रकारांनी शिवसेनेच्या मुख्यालयाबाहेर एकत्र येत निषेध केला. अतिशय सामर्थ्यशाली शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व त्यांचे सैनिक यांच्याकडून करण्यात येणाऱ्या धाकदपटशाहीविरुद्ध निषेध नोंदवण्याचे धैर्य त्यांनी या निमित्ताने दाखवले. सत्तेची चाहूल लागलेले काही मोजकेच जण यामध्ये सहभागी झाले नाहीत आणि त्यांना यासाठी चांगल्या प्रकारे "पुरस्कृतही" केले गेले (काही जण तर नंतर अगदी शिवसेना किंवा भाजप खासदारही झाले).

टीव्हीपूर्व युगात ज्या प्रकारे पत्रकारांनी एकी दाखवली होती, त्याच्या अगदी विरुद्ध असे तीव्र विभाजन पत्रकार-कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आता समोर आले आहे. हे जणू समाजात दिसणाऱ्या युद्धरेषांचे माध्यमांमध्ये पडलेले प्रतिबिंबच आहेः डावे विरुद्ध उजवे, हिंदुत्व विरुद्ध निधर्मी, उदारमतवादी विरुद्ध संघी, अगदी "राष्ट्रवादी" विरुद्ध "राष्ट्रविरोधी", हे म्हणजे जवळजवळ असेच वाटत आहे की जणू वैयक्तिक राजकीय अजंड्यांच्या सावटाखाली सत्याचा अविश्रांत शोध झाकोळला गेला आहे. जर एका बाजूसाठी लंकेश यांच्या मृत्यूची घटना अतिशय शोककारक आणि संतापजनक आहे, तर दुसरी बाजू त्यांच्या समर्थकांपैकी काही निवडकांनी व्यक्त केलेल्या क्षोभाकडेच लक्ष वेधण्यात व्यस्त आहे. जर एक वृत्तवाहिनी लंकेश यांच्या हत्येचा, ‘एक नक्षली कृत्य’ म्हणून निषेध करेल तर दुसरी बाजू उजव्या विचारसरणीच्या हिंदू कट्टरवाद्यांकडे लक्ष वेधेल. या देशाच्या एका असहाय्य महिला नागरिकासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन न्यायाची मागणी करण्याचा खरे तर हा क्षण असायला हवा होता, पण प्रत्यक्षात मात्र तो एका वैचारिक " युद्धापुरताच" उरून राहिला आहे.

गेल्या आठवड्यात जेव्हा प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि इतर माध्यम गटांनी एका शोकसभेचे आयोजन केले होते, तेव्हा उजव्या विचारसरणीच्या बहुतेक पत्रकारांनी त्यापासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला. यावेळी आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आलेले अगदी राजकारणीसुद्धा डाव्या-उदारमतवादी राजकीय पक्षांतीलच होते. आयोजकांनी ही सभा सर्वांसाठी खुली असल्याचे आग्रहपूर्वक सांगितले असूनही सत्ताधारी भाजपचे कोणीही यावेळी हजर नव्हते. जेव्हा एका "राष्ट्रवादी" वाहिनीच्या पत्रकाराने साऊंड बाईट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला डाव्या कार्यकर्त्यांनी चक्क टाळले. पत्रकारांना वेगवेगळ्या कॅंपमध्ये ढकलले जात होते, त्यांना भूमिका घेण्यास भाग पाडले जात होते, जेव्हा की घेण्यासारखी फक्त एकच बाजू होती. हिंसेविरोधात तातडीने कृती करण्याची आग्रही मागणी करणे.

हो, गौरी लंकेश यांचा राजकीय कल हा डाव्या विचारसरणीकडे होता आणि त्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या तिरकस टीकाकरही होत्या. पण जेव्हा एखाद्या महिलेला अशा प्रकारे मूर्खपणाच्या पद्धतीने लक्ष्य केले जाते, तेव्हा तिची राजकीय विचारधारा नि:संशयपणे गौण असते. किंवा असे तर झाले नाही ना की, माध्यमांतील एक भाग हा प्राईम टाईम टेलिव्हिजनच्या राष्ट्रवादी कथनातच एवढा कैद झाला आहे की, स्वतःसाठी विचार करण्याची, बरोबर आणि चूक यामधील अंतर ओळखण्याची आणि या सगळ्या कोलाहलापासून वर उठून आपल्या साथी पत्रकाराचे समर्थन करण्याची क्षमताच गमावून बसला आहे?

दुःखाची बाब म्हणजे नैतिकदृष्ट्या दिवाळखोर राजकीय वर्गाकडून रेटल्या जात असलेल्या "ते" विरुद्ध "आपण" अशा अभद्र गटांत माध्यमही विभागली जात आहेतः टोकाचा द्वेष पसरवण्यासाठी सुरू असलेल्या पद्धतशीर मोहीमचे प्रतिबिंब दिसत आहे ते विरोधी मतांबाबत वाढत्या असहिष्णुतेत आणि लक्ष्य केलेच पाहिजे अशा "शत्रूंच्या" सातत्याने केल्या जात असलेल्या निर्मितीत, मग जर टीव्ही स्टुडीयोत नसेल, तर समाजमाध्यमांवर आणि अंतिमतः रस्त्यावर. अतिशय कडवट ध्रुवीकरण झालेल्या या वातावरणात सत्य गोष्टींचा स्वतंत्र तपास करण्यासाठीचा अवकाश वेगाने आक्रसत चालला आहे. सत्ताधारी विचारसरणीच्या चिअरलीडर्ससाठी, लंकेश एक " प्रेस्टीट्यूट" आणि "लिबटार्ड" होत्या, त्यांना नक्षलवादाप्रती सहानुभूती असलेल्या " देशद्रोही" ठरविले गेले होते, बऱ्याच प्रमाणात विख्यात लेखिका अरुंधती रॉय यांच्याप्रमाणेच... ज्यांच्याबाबत भाजप खासदाराने निर्लज्जपणे असे विधान केले होते की त्यांना त्यांच्या काश्मीरबाबतच्या मतांसाठी जीपला बांधून टाकले पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या हिंसेला वैधता देणे म्हणजे व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी जमावाला चिथावणी देण्याची पहिली पायरी आहे.

लंकेश या स्वतःच्या भाषेत लिहीणाऱ्या महिला पत्रकार होत्या आणि या गोष्टीमुळेच कदाचित त्या अधिक असुरक्षित होत्या. इंग्रजी भाषेतील पत्रकार, काही प्रमाणात तरी, ते काम करत असलेल्या मर्यादित जगामुळे सुरक्षित असतात. याऊलट, प्रादेशिक भाषेतील पत्रकार हा वास्तवाशी जोडलेल्या खूप मोठ्या जनसमुदायाबरोबर संवाद साधत असतो. प्रादेशिक वृत्तपत्र/वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना धमक्या किंवा हल्ल्यांना जास्त तोंड द्यावे लागते, पण 'मीडीया एलिटिझम' अर्थात माध्यमांमध्ये असलेल्या अभिजनवादामुळे असे प्रसंग क्वचितच ठळक बातमी बनतात.

लंकेश या इंग्रजी-कानडी बंधने तोडणाऱ्या एक हाय प्रोफाईल द्वैभाषिक पत्रकार होत्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू हा, त्या अर्थाने, एक टर्निंग पॉईंट असायला पाहिजे. यापूर्वी पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांविरोधात जेवढा परिणामकारक आवाज उठवणे आवश्यक होते, तेवढा उठवण्यात जर आपण अपयशी ठरलो असू, तर आता वेळ आहे बदलण्याची. आता जर आपण एकत्रित न येता गप्प बसलो, तर आणखी कितीतरी गौरी लंकेशना आपल्या या एकत्रित अपयशाची किंमत चुकवावी लागेल.

ता.कः टीव्हीवर सुरु असलेल्या एका चर्चेतून आपण अतिशय वैतागून कसे बाहेर पडलो ते लंकेश यांनी मला त्यांच्याशी नुकत्याच झालेल्या एका संभाषणात सांगितले होते. "माझ्या मतांमुळे माझ्यावर जणू काही शारीरिक हल्लाच केला जात आहे, असे मला त्यावेळी वाटले होते," त्या मला सांगत होत्या. जेव्हा सभ्य संवादची जागा धोकादायक मानसिक हिंसा घेते आणि निवेदकच जेव्हा एक दिवस टीव्हीवरून गरळ ओकत असतो, तेव्हा ती गोष्ट म्हणजे चेहरे झाकणाऱ्या बंदुकधाऱ्यांना दुसऱ्या दिवशी दारुगोळा पुरवणारी तेवढी असू शकते.

राजदीप सरदेसाई

Updated : 15 Sept 2017 7:28 PM IST
Next Story
Share it
Top