‘चक दे’ गर्ल्स… वी आर प्राऊड ऑफ यू !
X
१९८० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, त्या वेळच्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या स्टार गोलंदाज डायना एडलजी या मुंबईतल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या नेट्समध्ये सराव करत असत. “काहीही कर, पण तिच्या हातून बाद होऊ नकोस,” आमच्या टीममधल्या एकाने मला आधीच इशारा दिला होता... आणि खरोखरच ड्राईव्ह मारण्यासाठी मी आत्मविश्वासाने पुढे आलो आणि त्या बॉलच्या फ्लाइटने मला चांगलंच चकवलं आणि मी स्टम्प्ड झालो. मी नेटस् बाहेर येताच, माझ्या सहकाऱ्यांनी “तू एका बाईबरोबरही खेळू शकत नाहीस!” या शब्दात माझी चेष्टा सुरू केली. आमच्यातला हा संवाद माजी कसोटीपटू कै. अशोक मंकड यांच्या कानावर गेला आणि लगेचच मध्ये पडत ते म्हणाले, “अरे, डायना ही मुंबई रणजी संघातील अनेक फिरकी गोलंदाजांपेक्षाही जास्त चांगली असावी.”
आज, या घटनेनंतर जवळजवळ चार दशकांनी मात्र, कोणीही भारतीय महिला क्रिकेटला कमी लेखण्याचा प्रयत्न करणार नाही. गेल्या काही आठवड्यात इंग्लडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत संघानं केलेली कामगिरी आणि त्यावर लॉर्डस् च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानं गाठलेला कळस, ही प्रगती पाहता, भारतातील महिला क्रिकेटकडे आता तरी गांभीर्यानं बघितलं जाईल, असं वाटतं. विश्वचषक मिळवणे हा एक मोठाच बोनस ठरू शकला असता, तरीही अंतिम फेरीपर्यंतच्या या प्रवासाकडे भारतीय महिला क्रिकेटमधील सुवर्णक्षण अर्थात ‘चक दे मोमेंट’ म्हणूनच बघितलं पाहिजे. जे यश आपल्या महिला हॉकी संघाने पडद्यावर मिळवलं त्या यशाची ही वास्तवातील आवृत्ती होती आणि हा क्षण म्हणजे देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय खेळात महिलांच्या सहभागाबाबत गेली अनेक दशकं चालत आलेला पूर्वग्रह दूर करणारा मैलाचा दगड ठरला.
वर्षानुवर्षे, क्रिकेट या खेळाकडं फक्त आणि फक्त पुरुषांचाच खेळ म्हणून पाहिलं गेल्यानं भारतीय महिला क्रिकेटपटूंना बरंच सोसावं लागलं. २००६ पर्यंत बीसीसीआयची महिला क्रिकेट संघटनेला मान्यताही नसणं किंवा खेळाडूंना अगदी किरकोळ मोबदला मिळणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नव्हतं, तर वास्तवात महिलांना हा खेळ खेळण्याचा समान हक्क आहे ही कल्पनाच या संपूर्ण व्यवस्थेला मान्य नव्हती. १९८२ साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी संघातील खेळाडूंना स्वतःच्या खिशातून दहा हजार रुपये भरावे लागले होते. तर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांत खेळाताना त्यांना सर्वोत्तम अशा मैदानांवर खेळण्याचा हक्क नाकारण्यात आला होता आणि बऱ्याचदा पत्र्याच्या शेडमध्ये रहावं लागत होतं आणि जमीनीवर झोपावं लागत होतं.
आता मात्र भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना वाजवी दैनंदिन भत्त्यांशिवाय सेंट्रल रिटेनर कॉन्ट्रॅक्टही मिळत असून, परिस्थिती हळूहळू पण निश्चितपणे बदलत आहे. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आणि खास करून रविवारच्या कमालीच्या रंगतदार ठरलेल्या अंतिम सामन्यानंतर तर महिला क्रिकेटची एक संपूर्ण पिढीच प्रकाशझोतात आली आहे.
लहानखुरी सलामीवीर पूनम राऊत, तिच्या संथ फलंदाजीच्या शैलीने आणि भक्कम बचाव तंत्र आणि उशिराने बॉल खेळण्याच्या क्षमतेमुळे लिटल मास्टर सुनील गावस्करांचीच आठवण करून देते. सातत्याने धावांचा डोंगर रचणारी मिताली राज, जिच्या भात्यात पुस्तकातील प्रत्येक फटका आहे आणि जोडीला मजबूत इच्छाशक्तीही. उंच आणि आक्रमक वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, जी गेली अनेक वर्षं कोणताही गाजावाजा न करता नव्या चेंडूनं सुरुवात करून देत आहे आणि प्रतिभासंपन्न अशा तरुण खेळाडू वेदा कृष्णमूर्ती आणि दिप्ती शर्मा ज्या पुढं अनेक वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करत रहातील आणि या सगळ्यांपेक्षाही अधिक करीष्मा असलेली हरमनप्रीत कौर.
प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला करण्याची तिची जबरदस्त क्षमता हेच दाखवून देते की सेहवागच्या पठडीतील आक्रमक भारतीय फलंदाजी जिवंत आहे आणि अगदी ठणठणीतही. तिनं तिच्या बॅटनं कदाचित आपल्याला अंतिम सामना जिंकून द्यायला हवा होता. आणखी फक्त पाच ओव्हर्स ती खेळपट्टीवर टिकून रहायला हवी होती. तेवढंही पुरलं असतं. पण उपांत्य सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिनं केलेली १७१ धावांची खेळी ही निश्चितच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. ज्या सहजतेनं ती षटकार ठोकत होती, ते पहाता चंदीगढच्याच आणखी एका महान खेळाडूच्या, कपिल देव यांच्या, आठवणी ताज्या झाल्या. खरं तर ज्या ज्या लोकांना १९८३ मधील झिंबाब्वेविरुद्धची कपिलची १७१ धावांची जादूई खेळी बीबीसीच्या संपामुळे पहाता आली नव्हती, त्यांनी हरमनप्रीतची डर्बीची खेळी पहावी; क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्टेजवर, एका भारतीयाने साकारलेली ही खेळी कपिलच्या त्या खेळीच्या सर्वाधिक जवळ जाऊ शकेल अशीच होती.
आणि तरीही, प्रायोजकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याच्या किंवा नव्या स्टार्सचा शोध लागण्याच्या शक्यतेच्या कितीतरी पलीकडे जात भारतीय महिला क्रिकेटमध्ये खरे परिवर्तन घडले आहे. ते आहे भारतीय महिला क्रिकेटपटूंना स्वतःच्या बळावर खेळाडू म्हणून मिळत असलेली वाढती ओळख आणि मान्यता यामध्ये. तेदेखील पुरुषी वर्चस्वाच्या जगात पुरुषांच्या मदतीशिवाय.
पी. टी. उषा ही भारतीय महिलांच्या खेळ जगतातील पहिलीवहिली आयकॉन होती. माझ्या मते, १९८० च्या दशकात तिनं केलेल्या कामगिरीमुळे, ती जरी सर्वोत्तम नाही, तरी सहजपणे भारतातील सर्वोत्तम तीन महान ऍथलिटस् पैकी एक निश्चितच आहे. सानिया मिर्झाने टेनिस कोर्टवर आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं आहे. अगदी तिच्या कपड्यांविरुद्ध विनाकारण वाद उकरून तिच्याविरुद्ध फतवा काढणाऱ्या टोळीलासुद्धा शेवटी हार मानावी लागली. बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी ऑलिंपिक पदक प्राप्त करत, अशी गोष्ट साध्य केली जी आतापर्यंत या खेळातल्या कोणाही पुरुष खेळाडूला जमली नव्हती. आज जवळपास प्रत्येक खेळामध्ये तिरंदाजी ते जिम्नॅस्टिक्स, भारतीय महिला चमकदार कामगिरी करत आहेत.
मात्र, टेनिस आणि बॅडमिंटनसारख्या खेळात जरी महिलांना प्रोत्साहन देण्याची आणि समानतेने वागवण्याची परंपरा असली (अर्थात याचे संपूर्ण श्रेय द्यावे लागेल ते बिली जीन किंग आणि मार्टीना नवरातिलोवा या जिगरबाज महीला कार्यकर्त्या-खेळाडूंना), तरी क्रिकेटला मात्र असा समानतेचा वारसा नाही. क्रिकेट हा जरी फुटबॉलसारखा धसमुसळा खेळ नसला तरीही काही कारणाने महिलांकडे स्पर्धात्मक पातळीवर क्रिकेट खेळण्याची शारीरिक क्षमता नाही, याच दृष्टीने पाहिले गेले आहे.
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी फोगट भगिनींना कुस्तीच्या मैदानात ज्या गोष्टींचा सामना करावा लागला, तशाच अडथळ्यांचा सामना महिला क्रिकेटपटूंनाही करावा लागला. अर्थातच हा प्रकार काही केवळ भारतापुरताच मर्यादित नाही. प्रतिष्ठित अशा मॅरीलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) १९९८ साली आपले मेंबर्स पॅवेलिय महिलांसाठी खुले करण्यापूर्वी दोनशे वर्षांहून जास्त काळ लावला आणि त्यानंतरही सुरुवातीच्या काळात अगदी कमी महिलांना तिथं प्रवेश मिळत होता. सर्वाधिक वेळा विजेत्या ठरलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंना रविवारच्या अंतिम सामन्यापूर्वी कधीही लॉर्डस् वर खेळता आले नव्हते, कारण त्यांच्या कौंटीच्या वेळापत्रकात महिला क्रिकेटला या पवित्र मैदानात खेळण्याची संधीच कधी मिळू शकली नाही.
खरी परीस्थिती अशी आहे की, महिला क्रिकेटपटूंकडे क्रिकेट खेळण्याची शारीरीक क्षमता आहे की नाही या वादापेक्षाही, या खेळाच्या सरंजामी परंपरांना महिला हा साडेपाच औंसाचा जड चेंडू मैदानाबाहेर फटकावू शकतील, ही कल्पनाच मुळी पटत नाही. जेव्हा जेव्हा त्यांनी पुरुषी वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या दिशेने पुरुषी ताकदीचा युक्तिवाद फेकला गेला. इंग्लंडच्या क्रिकेट मैदानांवर हा युक्तिवाद शेवटी एकदा कायमचा पराभूत झाला. अंतिम फेरीसाठी मोठ्या संख्येनं जमलेले प्रेक्षक हे काही केवळ उत्सुकता म्हणून आले नव्हते, तर ते एक उत्तम स्पर्धात्मक आणि कौशल्यपूर्ण क्रिकेट पहाण्यासाठी आले होते आणि त्यांना ते पहायला मिळालं. त्यामुळेच मिताली राज आणि टीम इंडियाचे कौतुक करण्याचा हा क्षण आहे आणि हा क्षण आहे त्यांना सांगण्याचा ‘चक दे गर्ल्स, वी आर प्राऊड ऑफ यू !’
ता. कः तर मग आता भारतीय महिला क्रिकेट खऱ्या अर्थाने आणि दमदारपणे दाखल झालं आहे का? मला असा विचार करायला आवडेल, पण त्यासाठी त्यांनी आणखी एक कठीण परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा मिताली राज हैदराबादच्या रस्त्यावरून चालत असेल किंवा हरमनप्रीत चंदीगढच्या, तेव्हा तुम्ही त्यांना ओळखू शकाल का आणि सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी कराल का?
त्यानंतरच आपण आत्मविश्वासाने म्हणू शकू की एकेकाळी स्वतःची ओळख नसलेल्या या भारतीय महिला क्रिकेटपटू शेवटी ‘मेन इन ब्लू’च्या छायेतून बाहेर पडल्या...!
राजदीप सरदेसाई