मॅक्स पर्सनॅलिटी - हरिश्चंद्र सुडे
X
सफेद डगला आणि पायजमा, डोक्यात गांधी टोपी, उंची पाच फूट, कृष्णवर्णीय चेहऱ्यावर देवीचे व्रण. पहिल्या भेटीतच आपलंस करून टाकेल असं व्यक्तीमत्व आणि खास मराठवाडा स्टाईलची बोली भाषा...हरिश्चंद्र सुडे हे नाव अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध...सुडे काकांकडे जायचं असं सांगितल्यावर लोकांनी सहजपणे रस्ते दाखवले. लातूरपासून जवळच असलेल्या बुधोडा गावात ते गेली 30 वर्ष अंध आणि अपंगांसाठी पुर्नवसन केंद्र चालवत आहेत. ज्याचं नाव आहे स्वाधार अंध-अपंग पुर्नवसन केंद्र. एका छोट्याशा झोपडीतून त्यांनी या केंद्राची सुरूवात केली. पुणे अंधजन मंडळ आणि इतर अनेक संस्थांमध्ये काम करून अनुभव घेतल्यानंतर सुडेकाकांनी स्वतःची संस्था उभी केली. त्यांचा मुख्य हेतू आहे, अंध आणि अपंगांना 12 महिने रोजगार देणे.
अंध आणि अपंगांना शिक्षण आणि रोजगाराचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था राज्यात आहेत. जिथं ब-याचदा कालबाह्य झालेल्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणूनच सुडेकाकांनी त्यांच्या संस्थेत 12 महिने रोजगार मिळेल असं हातमाग, बॉडी मसाज आणि ऍक्युपंक्चरचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. सुडे काकांचं स्वाधार केंद्र हे असं एकमेव केंद्र आहे जिथे अंध-अपंगांना फक्त प्रशिक्षण नाही तर 12 महिने रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे याच केंद्रात त्यांची राहण्याची सोयसुद्धा केली जाते. शिक्षण, प्रशिक्षण आणि कायमचा रोजगार असं सुडे काकांच ध्येय आहे. आतापर्यंत त्यांनी इथल्या 36 अंध-अपगांची लग्नसुद्धा लावून दिली आहेत. तसंच संस्थेतच त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा केलीय. पण, त्याचमुळे आता त्यांच्या संस्थेला ग्रँट मिळत नाहीय. दरवर्षी 30 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सरकारी मान्यता त्यांच्या संस्थेला आहे. पण, निवासी संस्था केल्यानं ग्रँट देता येत नाही असं शासनानं त्यांना कळवलं. त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतलीय. पण, आपलं कार्य मात्र अविरत सुरू ठेवलंय. सरकारी पैसा मिळत नाही म्हणून ते अडून राहीले नाहीत. त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि मोठ्या कंपन्यांना गाठून संस्थेला मदत मिळवली. भारत पेट्रोलियम, एलआयसी सारख्या वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्या आज त्यांचं काम पाहून त्यांना सढळ हस्ते मदत करत आहेत.
व्यावसायिक शिक्षण, रोजगार आणि राहण्याची सोय होत असल्यानं आज त्यांच्याकडे राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह इतर राज्यातली मुलं येत आहेत. पण, सर्वांनाचा आता संस्थेत सामावून घेणं शक्य नसल्यानं त्यांनी कम्युनिटी बेस रिहॅबिलीटेशन म्हणजेच अंध-अपगांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलंय. त्यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, जिल्हाधिकारी आणि इतर संस्थांची ते मदत घेत आहेत.
स्वतः शिका, स्वतः कमवा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा हा संदेश देण्यासाठी केंद्राचं नाव स्वाधार ठेवल्याचं सुडे काका सांगतात. संपूर्ण लेखात जरी मी हरिश्चंद्र सुडे यांचा उल्लेख सुडेकाका असा केला असला तरी इथले विद्यार्थी आणि सर्वजण त्यांना ‘पप्पा’ या नावानं आवाज देतात आणि ते सुद्धा आपल्या आपत्याप्रमाणे प्रत्येकाला जीव लावतात.
नीलेश धोत्रे