पुण्याची 'क्वीन ऑफ द बुक्स'
X
गुहेच्या भिंतीवर चित्रलिपी कोरणाऱ्या माणसाचा प्रवास फेसबुकच्या भिंतीपर्यंत येऊन पोहोचला. काळाच्या या मोठ्या पटावर दरम्यान कागदाचा शोध लागून ज्ञानप्रसारासाठी पुस्तकांची निर्मिती झाली होती. परंतु सोशल मीडियाच्या प्रभावाने पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालं. यावर उपाय काढण्यासाठी भाग्येशा कुरणे या युवतीनं हुशारीनं, स्मार्टफोन स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांची सांगड मदत देणाऱ्या हातांशी घातली आहे !
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा – हा बाबासाहेबांचा संदेश भाग्येशानं शीरोधार्य मानला. कॉलेजजीवनात चळवळीत सक्रिय असण्याचा अनुभव होता. दत्तवाडी येथील झोपडवस्तीत फिरण्याचाही एक अनुभव तिला कृतिशील बनवण्यास कारणीभूत ठरला. तेथील विहारात स्थानिक कार्यकर्त्यांनी छोटंंसं ग्रंथालय सुरू केलेलं होतं. मग ग्रंथालय आणखी उत्तम करण्यासाठी भाग्येशाने सोशल मीडियावरून पुस्तकं तसंच अर्थिक मदतीचं आवाहन केलं. तीन दिवसांच्या छोट्या अवधीतच तिच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नि तब्बल ४० हजार रुपये जमा झाले !
मोबाईल स्क्रीनवर लाइक आणि नोटिफिकेशनसाठी फिरणारे हात या उपक्रमाच्या मदतीला सरसावले. डॉक्टर-इंजिनीयर ते सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वांनी मदत केली. यातूनच पुढे तिनं ‘विहार तिथे ग्रंथालय’ असा विस्तार झाला. विहारांना ज्ञानाचं केंद्र बनवण्याचा संकल्प झाला.
पुण्यातील वस्त्यांमध्ये जाऊन जिथे विहार आहेत तिथे ग्रंथालय सुरू करण्यासाठी ती आवाहन करू लागली. उपलब्ध झालेल्या पैशांतून पुस्तकं खरेदी केली. पारदर्शकता ठेवत सर्व बिलं, हिशोब फेसबुकवर शेअर केला. शिवाय शैक्षणिक साधनं विकत घेतली व विहार ग्रंथालयांना ती भेट देणं सुरू केलं. कार्यकर्त्यांनी शैक्षणिक तक्ते तयार केले. आत्तापर्यंत फक्त प्रार्थना होणाऱ्या विहारात मुले ब-बाबासाहेब, श-शिवाजी, स-सावित्रीचा गिरवू लागली. विहारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तकं ही वाटण्यात आली. पुण्यातल्या दत्तवाडीतून सुरू झालेला हा प्रकल्प चक्क रत्नागिरीतील मिठनगावापर्यंत पोहोचला. दत्तवाडीतल्या ग्रंथालयामुळे स्थानिक मुलामुलींशी संपर्क येत होता.
मुलांचे बँकिंग परीक्षेचे फॉर्म भरताना लक्षात आलं की मुलं गणित आणि इंग्लिश या विषयांत मागे आहेत. मग चौकशी केल्यावर कळलं की आठवीपर्यंतच्या बऱ्याच मुलांना स्वतःचंं नावही लिहिता येत नाही. याच वेळी पानमळा वसाहतीतील शिवाजी वाघमारेंनी तेथील मुलांसाठी क्लास सुरू करण्याची विनंती केली. ‘साऊ रमाई शैक्षणिक प्रकल्पा’ने आकार घेतला. शैक्षणिक तसंच संस्कारवर्ग असं त्याचं स्वरूप. यासाठीही सोशल मीडियातूनच जोडलेले कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी विहारात शिकवायची जबाबदारी घेतली.
यातले सूरज व गीता वाघमारे हे नवदांपत्य केवळ संसाराच्या नव्हाळीत रमण्याऐवजी विहारातील या मुलांमध्ये रमतात. प्रतिमा पडघन, लहु कांबळे, मनीश पट्टे बहादुर, अनुपम बाम, सुधीर दिगोले, अक्षय ठाकरे, श्रद्धा देसाई, कुणाल शिरसाठे, किशोर कश्यप, वीरधवल सोनवणे, यांसारखे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. दररोज विहारात सात ते नऊ वेळ देऊ लागले. व्यसनमुक्ती, चित्रकला, गायन, गणित, विज्ञान हे विहारात शिकवले जातात. माजी अधिकाऱ्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते.
अण्णाभाऊ साठेंची जयंती भाग्येशाने वेगळ्या पद्धतीने साजरी केली. तृतीयपंथीय दिशा शेख हिला निमंत्रित करून मुलांच्या मनात तृतीयपंथीयांबद्दल आदर निर्माण व्हावा व त्यांना समाजामध्ये आदराचे स्थान मिळावे हा प्रयत्न तिने केला. भाग्येशाने आतापर्यंत जवळजवळ एक हजार पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. भाग्येशाला या परिसरामध्ये ‘क्वीन ऑफ बुक्स’ नावाने ओळखू लागलेत. तिचा संकल्प तडीस नेण्यासाठी आपणही तिला पुस्तकं अथवा अर्थिक स्वरूपात भेट देऊ शकता. त्यासाठी आम्रपाली बुद्ध विहार, सिंहगडरोड, पुणे. (फोन नं. 9730197530) या पत्त्यावर संपर्क करू शकता.
- सागर गोतपागर