छंदिष्टपणातून घडली वन्यजीव फोटोग्राफर
X
आवड होती म्हणून सवड काढली आणि चक्क वन्यजीव फोटोग्राफर घडली. ही कथा आहे साध्यासुध्या गृहिणीची. मोकळ्या वेळात कुटुंबाबरोबर फिरायला जाण्याच्या छंदाने पुढे तिचं करियरच घडवलं !
ऋता कळमणकर यांचा जन्म, शालेय शिक्षण तसेच सोशल सायन्स पदवीपर्यंतचं शिक्षण मराठवाड्यातील लातूरमध्ये झालं. लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाल्यानंतर गृहिणीचा जीवनक्रम सुरू झाला. घर व दोन मुले यांच्या शिक्षणात पूर्णपणे गुरफटून गेलेल्या आयुष्यात वेगळेपण इतकंच होतं की लहानपणापासूनचा निसर्गभ्रमणाचा छंद नंतरही सुरू राहिला. वन्य प्राण्यांची विशेष आवड. जिथे कुठे फिरायला जात तेथील निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात टिपत. मग पशुपक्ष्यांबद्दलची माहिती देणारी पुस्तकं वाचणं आणि ज्ञान परिपूर्ण करणं, असा परिपाठच पडला.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांच्या आयुष्याने एक निर्णायक वळण घेतलं. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करून स्वतःला छायाचित्रणासाठी झोकून द्यायचं ठरवलं. परिवाराची व आप्त स्वकीयांची साथ लाभली आणि त्या हिमती वर डिजिटल कॅमेरा व छायाचित्रणाचं तंत्र आत्मसात केलं. ठाण्यातील धनेश पाटील यांनी वाइल्डलाइफ फोटोग्राफीत सुरुवातीला मार्गदर्शन केलं. आता टोहोल्ड ट्रॅव्हल अँड फोटोग्राफी या ग्रुपबरोबर काम करत यात अधिक अचूकता आणण्याचे प्रयत्न चालले आहेत. पहिलं जंगलभ्रमण हे ताडोबा व्याघ्रप्रकल्प. अंगावर शहारे आणणारा तो अनुभव.
भव्य रॉयल बंगाल टायगरचं दर्शन घडलं. त्यानंतर देश-विदेशातील विविध नॅशनल पार्क्सना भेटी देत, फोटोग्राफी करणं हे सातत्यानं सुरू राहिलं. विविध ठिकाणी जाण्यापूर्वी तेथील प्राणी-पक्षी, त्यांचं लाईफ सायकल, सवयी इत्यांदींचा बारकाईने अभ्यास करून जावं लागत असे. त्यात त्यांनी कधी कंटाळा केला नाही.
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या वन्यजीव फोटोग्राफीच्या छंदाची वाट तशी सोपी नव्हती. एकेका फोटोसाठी संपूर्ण दिवस द्यावा लागतो. भल्या पहाटेच्या गारव्यात, सफारीला सुरवात होते. सुखावणारे कोवळे ऊन, मग दुपारचे रखरखते ऊन झेलत प्रवास करावा लागतो. जंगलातील कोणताही भयंकर प्राणी सहजपणे तुमच्यासमोर उभा ठाकू शकतो! या दिवसभरात आहार, पाणी बेताचंच मिळतं. माणसाची परीक्षा बघणारा निसर्ग कठोर असतो. तिथल्या वातावरणात सनस्क्रीन क्रीम काहीच करू शकत नाही. पण छंदापुढे बाकी गोष्टी गौण वाटू लागतात.
ऋता यांनी भारतातील रणथंबोर, कान्हा, बांधवगड, जिम कॉर्बेट, ताडोबा, पेंच आणि हंपी इथल्या अभयारण्यांना व राष्ट्रीय उद्यानांना बऱ्याचदा भेट दिली आहे तर परदेशातील केनया, टांझानिया, बोट्स्वाना, मध्य अमेरिकेतील कोस्टारिका, अलास्का, अमेरिकेचा पूर्व व पश्चिम भाग व समुद्रकिनारा, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया अशा ठिकाणच्या अभयारण्यांनाही भेटी देऊन तेथील प्राण्यांची विशेष माहिती गोळा केली आहे. कोस्टारिकात काही सरपटणाऱ्या प्रजाती तर धोकादायक -विषारी आहेत. तिथे फोटोग्राफी करणे खूप आव्हानात्मक.
बोट्स्वानामध्ये मोबाईल, वायफाय यांच्याशिवाय जंगलात वास्तव्य करावं लागतं. पण दुर्मिळ प्रजातींचे फोटो काढण्यात यश आल्यावर या आव्हानांवर मात करण्यासाठी केलेल्या धाडसाचं चीज झाल्यासारखं वाटतं.
ऋता म्हणतात, सेल्फीच्या बाहेरसुद्धा जग आहे आणि जो किमान एकदा निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेईल, त्याची दुनियाच बदलून जाईल.