Home > मॅक्स रिपोर्ट > काय झाडी,काय डोंगार, काय हाटेल फेम शहाजीबापूंचे रस्ते नाय ओके

काय झाडी,काय डोंगार, काय हाटेल फेम शहाजीबापूंचे रस्ते नाय ओके

काय झाडी,काय डोंगार, काय हाटेल फेम शहाजीबापूंचे रस्ते नाय ओके
X

काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल समंध ओके मधी हाय..या डायलॉगने महाराष्ट्रभर फेमस झालेले सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघात समंध ओकेमंदी नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

सांगोला शहराला जोडणाऱ्या सांगोला-महुद रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताची मालिका सुरू असून या अपघातामध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण पहाता शासन,प्रशासन हालचाली करताना दिसत नसल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सांगोला-महुद रस्ता अकलूज मार्गे इंदापूर जवळ सोलापूर-पुणे महामार्गाला मिळतो. त्यामुळे सांगोल्यावरून पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनाची संख्या जास्त आहे. सध्या पावसाळा सुरू असून खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या अंधारात वाहन धारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक वाटू लागले आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकातून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी जोर धरू लागली असून या मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या निर्णयाकडे वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.





महुद-सांगोला रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा

महुद-सांगोला रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून हे गाव बाजार पेठेचे आहे. पंढरपूर-आटपाडी रस्त्यावर महुद गाव वसले असून या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यापार चालतो. याच गावातून सांगोल्याला जाण्यासाठीचा रस्ता जातो. येथून पुण्याला जायचे असेल तर सोलापूर-पुणे महामार्गापर्यंत महुद गावावरूनच प्रवास करावा लागतो. पंढरपूर-कर्हाड या रस्त्यावरून सांगोला येथे जाण्यासाठी वाहनधारक या रस्त्याचा उपयोग करतात. याच रस्त्यावरून 'जत ' येथे जाता येते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला लागून कर्नाटक राज्याची सीमा असून त्यामुळे या राज्यातील वाहनधारक या रस्त्याचा शॉर्ट कट रस्ता म्हणून उपयोग करतात. तसेच या रस्त्यावर टोल वसुली नसल्याने येथे वाहनाची सातत्याने ये-जा असते. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच सांगोला-महुद रस्ता अतिशय महत्वाचा असल्याचे वाहनधारक सांगतात. या रस्त्यावरून सातत्याने जड वाहनाची रेलचेल असते. तसेच या रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या खेडे गावातील शेतकऱ्यांची सांगोला येथे सातत्याने ये जा असते. तालुक्याला कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टने अतिशय महत्वाचा असल्याचे नागरिक सांगतात.





रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना सोसावा लागतोय त्रास

सांगोला ते महुद दरम्यान शाळा,कॉलेज आहेत. या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात. रस्त्याची दुरावस्था झाल्याने या विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. पावसात रस्त्यावरील खड्डा किती खोल आहे,याचा अंदाज येत नसल्याने विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने आणि टू-व्हीलर घेवून शाळा कॉलेजला येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांना या खड्डेमय रस्तचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सांगोला तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथे शासकीय कार्यालय,शाळा,कॉलेज,दवाखाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाची जास्त प्रमाणात वाहतूक होते. आजारी पेशंटला दवाखान्यात घेवून जात असताना गाडी वेगात घेवून जाता येत नाही. दवाखान्यात पोहचण्यास रुग्णाला वेळ लागतो. त्यामुळे पेशंटचे नातेवाइक,वाहनधारक रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना अनेकजण जखमी झाले आहेत तर काहीजणांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाहक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सांगोल्यापासून रस्त्याला सुरुवात होत असतानाच वाहनधारकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. तो वाकी गावापर्यंत थांबत नाही. वाकी गावच्या आसपास काहीशा प्रमाणात रस्ता चांगला असल्याचे दिसून येतो. परंतु तेथून पुढे सातत्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा सामना करत महुद गाठावे लागते. महुद गावच्या आसपास तर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त असल्याचे दिसून येतात. येथे गाडी चालवताना वाहनधारकांना जास्त त्रास होत असल्याचे वाहनधारक सांगतात. त्यामुळे या रस्त्याची लवकर दुरुस्ती करण्यात यावी,असे वाहनधारकांना वाटत आहे.





आमदार शहाजी बापू पाटील गावाकडे याच रस्त्यावरून जातात

आमदार शहाजी बापू पाटील यांचे गाव महुद गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या गावाचे नाव चिक महुद असून सांगोला शहरात जाण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील महुद-सांगोला रस्त्याचा वापर करतात,असे या मतदार संघातील लोक सांगतात. या रस्त्यावरून जात असताना त्यांच्या निदर्शनास हे खड्डे येत नाहीत का असा सवाल नागरिकांतून करण्यात येत आहे. या रस्त्यावर वर्षानुवर्षे खड्डे असल्याचे नागरिक सांगतात. या रस्त्याच्या दुरावस्थेकडे आमदारांनी लक्ष द्यावे,अशी मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.





सांगोला-महुद रस्ता म्हणजे रस्ता कमी आणि खड्डे जास्त

सांगोला-महुद रस्त्यावरून दररोज ये-जा करणारे वाहनधारक गणेश केसकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले,की हा रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. हा रस्ता सांगोला तालुक्याला जात असून त्याची दुरावस्था झाली आहे. पंढपूर आणि आटपाडी तालुक्यातील रस्ते व्यवस्थित आहेत. वीस मिनिटात पंढरपूर आणि आटपाडी येथे जाता येते. पण सांगोल्याला जायचे म्हटले,की एक तास हमखास लागतो. कारण ब्रेक लावल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. पावसात या रस्त्यावरून जात असताना पावसापेक्षा या खड्ड्यातील पाण्याने वाहनधारक जास्त भिजतात. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण ही जास्त आहे. तर दुसरे वाहनधारक बापू अलदर यांनी सांगितले,की या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चार ते पाच अपघात झाले आहेत. वाहन धारकांना खड्ड्यांचा अंदाज नाही. त्यामुळे वाहनधारकांने अचानक ब्रेक दाबल्यास पाठीमागून येणारे वाहन पुढच्या वाहनावर जावून आदळते. या रस्त्यावरील खड्डे वरचेवर वाढत चालले असून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लक्ष द्यावे.





आमदार शहाजी बापू पाटील नॉट रीचेबाल

रस्त्याच्या प्रश्ना संबंधी सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी वारंवार फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. ते नॉट रीचेबल असल्याचा संदेश मिळत आहे.


Updated : 28 Aug 2022 5:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top