ट्वीटर वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, एलन मस्कची ट्वीट करून माहिती
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्कने आठवडाभरापुर्वी ट्वीटर खरेदी केले. त्यानंतर ट्वीटरच्या धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच एलॉन मस्कने ट्वीट करून ट्वीटरच्या वापरासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
X
एलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात 43 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी किंमतीला ट्वीटर खरेदी केले आहे. त्यानंतर ट्वीटरच्या धोरणांमध्ये बदल करणार असल्याचे संकेत एलॉन मस्क यांनी दिले होते. तर आता एलॉन मस्कने ट्वीटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
एलॉन मस्क यांनी ट्वीट करत म्हटले की, भविष्यात ट्वीटरच्या वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच हे पैसे सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी लागू करण्यात येणार आहेत. मात्र प्रासंगिक वापरकर्त्यांना ट्वीटरची सेवा मोफतच मिळणार आहे, असे सांगत मस्क यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
Ultimately, the downfall of the Freemasons was giving away their stonecutting services for nothing
— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022
ट्वीटरमध्ये बदलाचे संकेत-
एलॉन मस्क यांनी ट्वीटर खरेदी केल्यानंतर ट्वीटरच्या धोरणांमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये पुर्णपणे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांच्या नोकरीवरही गंडांतर येण्याची चर्चा मीडिया रिपोर्टमधून सुरू आहे. मात्र पराग अग्रवाल आणि विजया गडदे यांना हटवण्याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.
ट्वीटरची खरेदी आणि एलॉन मस्क
गेल्या अनेक दिवसांपासून एलॉन मस्क हे ट्वीटरची खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांनी ट्वीटरला ऑफर देत दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर 25 एप्रिल रोजी एलॉन मस्क यांनी ट्वीटर खरेदी केले. तर मस्क यांनी ट्वीटर विकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच ट्वीटर वापरणाऱ्यांना पैसे मोजावे लागू शकतात, असे म्हटले आहे. त्यामुळे ट्वीटर भविष्यातही अशा नव्या पॉलिसी आणू शकते, अशी चर्चा सुरू आहे.