ED च्या समन्सला अनिल देशमुख यांचे उत्तर, सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप
X
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना EDने पुन्हा एकदा समन्स बजावले होते. अनिल देशमुख यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत आपले म्हणणे ईडीपुढे मांडले. त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी अनिल देशमुख यांचे पत्र ईडीच्या कार्यालयात आणून दिले. आपण ईडीच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. त्यावरील सुनावणी सध्या सुरू आहे, तरीही ईडीने समन्स बजावल्याबाबत निल देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
"EDला समन्सची घाई का?"
EDची अशी कारवाई म्हणजे सत्तेचा दुरूपयोग आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी EDच्या सहायक संचालकांना पत्र लिहून केला आहे. ED ने देशमुख यांच्या मुलालाही समन्स बजावले आहे. EDच्या कारवाईला अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवरील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी EDने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले होते. सर्वोच्च न्यायालयात आपण ईडीच्या कारवाईलाच आव्हान दिले असताना अशाप्रकारे समन्स बजावणे धक्कादायक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच ३० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या याचिकेवरील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी होईल हे सांगितले होते, असे असतानाही ईडीने त्यांच्या आदल्या दिवशी हजर होण्याचे समन्स बजावण्याचा अर्थ काय, हा सत्तेचा दुरूपयोग आहे, या शब्दात अनिल देशमुख यांनी आपली नाराजी ईडीला कळवली आहे.
मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता का नाही?
तसेच चौकशी संदर्भात ECIR आणि इतर कागदपत्रं वारंवार मागूनही आपल्याला दिली जात नसल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. अनिल देशमुख यांनी याआधीही आपल्या चौकशी संदर्भात ईडीकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे, पण इडीने आपल्याला कोणतीही कागदपत्रे पुरवली नसल्याचे अनिल देशमुख यांचे म्हणणे आहे. ईडीला नेमकी काय माहिती हवी आहे, हे कळले तर आपल्याला चौकशीमध्ये पुरेपूर सहकार्य करता येईल असे अनिल देशमुख सुरूवातीपासून सांगत आहेत.