'ऑस्कर'च्या मदतीने 48 तासात खुनाचा गुन्हा उलगडला
रायगड जिल्ह्यातील महिला सरपंचाच्या हत्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती, महाड तालुक्यातील आदिस्ते गावाच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या खुनातील आरोपीपर्यंत पोहोचण्यात महाड तालुका पोलिसांना यश आले
X
रायगड (धम्मशील सावंत)// रायगड जिल्ह्यातील महिला सरपंचाच्या हत्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती, महाड तालुक्यातील आदिस्ते गावाच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या खुनातील आरोपीपर्यंत पोहोचण्यात महाड तालुका पोलिसांना यश आले असून शेजारी राहणाऱ्या एका विवाहित तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या आरोपीला जेरबंद करण्यात रायगड जिल्हा पोलिस दलातील श्वान ऑस्करची मोठी मदत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारणाचा छडा ४८ तासात लावला.ऑस्करने दाखवलेल्या मार्गानुसार पोलिसांना आरोपीपर्यंत जाणे शक्य झाले.
अमीर शंकर जाधव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा निर्घृण खून झाला होता. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच ही घटना घडल्याने पोलिस प्रशासनाने देखील तपासाला गती दिली. घटना घडल्यानंतर श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढणे शक्य झाले. आरोपी अमीर जाधव हा मयत महिला सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांच्या घरा शेजारी राहत होता. आरोपी अमीर जाधव याने पूर्ववैमनस्यातून क्षुल्लक कारणावरून खून केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती महाड तालुका पोलिस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांनी दिली. खुनातील आरोपी अमीर जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी स्थानिक असावेत असा संशय सुरूवातीपासूनच व्यक्त केला जात असल्याने आदिस्ते गावात पोलिस पथके रवाना केली होती. खुनाची घटना समोर येताच पोलीस पथकाने तात्काळ श्वान पथक मागवले. घटनास्थळी सुमारे चार तासातच श्वान पथक दाखल झाले. श्वानपथकातील श्वानाने गावातील एका वाड्यापर्यंत जावून आरोपीचा मार्ग दाखवला. यातूनच या खुनाचा तपास लावणे शक्य झाले आहे.
महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या सरपंच यांचा २७ डिसेंबर रोजीच्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा उलगडा डॉग स्कॉड मधील ऑस्कर श्वानाने केला त्यामुळे सदर प्रकारणाचा छडा ४८ तासात पूर्ण करून आरोपितास अटक करण्यात यश मिळाले..
— Raigad Police (@RaigadPolice) January 2, 2022
रायगड जिल्हा पोलिस दलातील श्वान :- ऑस्कर#Crime_Investigation pic.twitter.com/MXXrgJm2YC
या प्रकरणात आणखी सहआरोपी आहेत का?याबाबत तपास सुरु असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी मिनाक्षी खिडबिडे यांचा मुलगा सचिन यांनी पोलिसांकडे केली आहे.