मॅक्स महाराष्ट्रच्या दणक्याने, नांदेडच्या त्या संस्थेवर गुन्हा दाखल
X
अन्नधान्य देण्याच्या नावाखाली गरिबांची लूट करण्याचा आरोप असणाऱ्या महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या संस्थेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकराशे रुपयात अन्नधान्य देण्याच्या नावाखाली 25 लाख गोरगरीब कुटुंबाची 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या संस्थेवर आहे.
धर्मादाय विभागाची कोणतेही नोंदणी नसताना या संस्थेने मराठवाड्यातील हजारो गरीब ,कष्टकरी,मजूर,शेतमजूर, शेतकरी यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, धार,जि. परभणी संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या संस्थेने शासनाच्या अन्नधान्य वाटप योजनेची नक्कल करत,संस्थेकडून सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींची अन्नदाता PRO म्हणून नियुक्ती केली. ज्यामध्ये संस्थेकडून 1100 रुपये भरून दहा किलो गहू, दहा किलो, तांदूळ,दहा किलो तेल, दहा किलो, शेंगदाणे, दहा किलो तेल,दहा किलो पोहे असे अन्नदाता किट देण्याचे सांगण्यात आले.त्यासाठी मराठवाड्यातील नांदेड,परभणी,हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, संभाजीनगर,जालना, बीड या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणींची PRO अन्नदाता माहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली. ज्यांच्या कडून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, हमाल, कष्टकरी गरीब लोकांना 100 रुपये भरून अन्नधान्य किट,तर मुलींना शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या सायकलसाठी 2500 रुपये, लॅपटॉपसाठी 5000 रुपये तर स्कुटी या दुचाकी वाहनांसाठी 2700 रुपये घेण्यात आले. मराठवाड्यात असे 500 PRO नियुक्त करून प्रत्येक PRO कडून किमान सातशे ते एक हजार लोकांचे अन्नदाता किट,लॅपटॉप, स्कुटी देण्याचे सांगून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या संस्थेने पैसे घेऊन दोन महिन्यांच्या आत दोन टप्प्यामध्ये किट देण्याचे आश्वासन दिले, सुरुवातीला लोकांना किट वाटपही केल्या,परंतु नंतर किट देणे बंद केले. मराठवाड्यातील हजारो लोकांनी कुणी अकराशे,पाच हजार,सत्तावीस हजार अशी गुंतवणूक केली.पण गेल्या सहा महिन्यांपासून संस्थेने ना या लोकांना धान्य दिले ना त्यांचे पैसे परत केले. या लोकांनी संस्थेच्या हिंगोली, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील कार्यालयाच्या पत्त्यावर गेले असता संस्थेने कार्यालय बंद करून पोबारा केल्याचे निदर्शनास आले होते .फसवणूक झालेल्या नागरिकांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर संस्थेवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या लोकांना न्याय मिळावा यासाठी मॅक्स महाराष्ट्रने ही बातमी समोर आणली. मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची दखल घेत आज वाजीराबाद नांदेड पोलिसात बाबासाहेब सुतारे या संस्था चालकासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संस्थेने 'सेवाभावी' संस्थेचा मराठवाड्यातील जिल्ह्यांत 25 लाख लोकांना कमी पैशात धान्य, वाहने देण्याचे आमिष दाखवत 100 कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील मूळ रहिवासी असणाऱ्या बाबासाहेब सुतारे याने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेय.
सुतारे याने साडेचार हजार रुपयांचे धान्य अकराशे रुपयात घेऊन जा, तसेच, सव्वा लाखाची दुचाकी अवघ्या 30 हजार रुपयांत,अशी वेगवेगळी आमिषे दाखवून छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेने मराठवाडयातील नांदेड, हिंगोली ,परभणी,जालना, बीड, उस्मानाबाद, संभाजीनगर,लातूर जिल्ह्यातील जवळपास 25 लाखांवर नागरिकांना तब्बल 100 कोटी रुपयांनी गंडविले आहे. वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून प्राथमिक तपासातच फसवणुकीचा हा आकडा 50 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
बाबासाहेब सुतारे हा या घोटाळ्याचा मास्टर माइंड आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नांदेड, हिंगोली, परभणी,बीड, लातूर, उस्मानाबाद,जालना, संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 700 एजंट (संस्थेच्या भाषेत जनसंपर्क अधिकारी) नियुक्त केले होते. हे एजंट
मराठवाड्यातील जिल्ह्यांत गावोगावी जाऊन ग्राहक शोधत होते. यातील प्रत्येक एजंटने जवळपास 3 ते 4 हजार ग्राहक जोडले होते. त्यांच्याकडून तीन महिने 1100 रुपये घ्यायचे आणि साडेचार महिन्यांचे धान्य त्यांना द्यायचे असा हा फंडा होता. त्यानंतर सव्वा लाख रुपये किमतीची दुचाकी अवघ्या 30 हजार रुपयांत देण्याची स्कीम सुरू करण्यात आली. त्याचबरोबर संसारापयोगी इतर साहित्यांवरही आपल्या ग्राहकांना भरमसाठ सूट देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला काही महिने संस्थेकडून धान्य, दुचाकी आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले. परंतु, त्यानंतर मात्र टाळाटाळ सुरू करण्यात आली. बाबासाहेब सुतारे आणि संबंधित एजंटही ग्राहकांना दाद देईनासा झाले. त्यामुळे या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नांदेड पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव हे करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये आठ आरोपींचा समावेश आहे. परंतु, तपासात आरोपींमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.