संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, सरकारने दिले कोरोनाचे कारण
X
कोरोना संकटामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेली आहे. विविध राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करावा पण अधिवेशन घ्यावे अशी मागणी केली होची. संसदेचे पुढील अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीदेखील प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या वर्षात म्हणजेच जानेवारीमध्ये घेण्याचा विचार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेला आहे.
सरकारच्या निर्णयावर काँग्रेसची टीका
दरम्यान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या निर्णय़ावरुन सरकारवर टीका केली आहे. "राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारने तर कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले. मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?"
केंद्र सरकारपुढची आव्हानं
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीबाहेर सुरू केलेले आंदोलन, देशाच्या बिघडलेली अर्थव्यवस्था, भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेले वादग्रस्त विधाने या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली होती.