महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे हिवाळी अधिवेशनाबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला
X
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. यानुसार तयारीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह विविध संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने या बैठकीत तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य आहे.सोबतच कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे.