Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हाडांना मंत्रिमंडळातून काढतील ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हाडांना मंत्रिमंडळातून काढतील ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हाडांना मंत्रिमंडळातून काढतील ?
X

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अत्यंत शांतपणे, संयतपणे व नियोजनपूर्वक काम करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जोडीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील जनतेला वेळोवेळी होणारं संबोधन हे आत्मविश्वासपूर्ण असतंच, शिवाय ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारंही असतं. एकंदरीत कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र सरकार सरस ठरलं आहे ; मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणामुळे चर्चेचा केंद्रबिंदू वेगळ्या विषयावर सरकला आहे. या विषयावर अत्यंत पद्धतशीरपणे रान उठवण्यात तसंच संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना असंविधानिक मार्गाचं समर्थन करायला लावून संभ्रमात पाडण्यात भारतीय जनता पार्टी सफल झाली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या मनोहर भिडे यांच्या संघटनेचा ठाणे शहराचा अध्यक्ष अनंत करमुसे याच्या मारहाणीची घटना बाहेर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने इतक्या वेगाने सूत्र हलवली व चारही बाजूंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला सुरू केला, ते पाहता अशा प्रकारच्या घटनेची भारतीय जनता पार्टी प्रतिक्षाच करत होती की काय, असा संशय घ्यायला वाव आहे.

अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दोन पोलीस कर्मचारी त्याच्या घरी आले व चौकशीच्या बहाण्याने सोबत घेऊन गेले. करमुसेच्या आरोपानुसार पोलिसांनी त्याला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. तिथे त्याला मारहाण झाली. ती मारहाण आव्हाड आणि पोलिसांच्या साक्षीने झाली. त्याठिकाणी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने आव्हाडांची माफी मागितली व तिथून सुटल्यावर पोलिसात तक्रार केली.

जितेंद्र आव्हाडांनी मारहाणीच्या घटनेबद्दल आपल्याला काही माहीत नाही, असा पवित्रा घेतला आहे. परंतु करमुसे याला झालेल्या मारहाणीचं आव्हाडांनी समर्थन केलं आहे. करमुसे, त्याच्या फेसबुक अकाउंटचा वापर करून जितेंद्र आव्हाड तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासहित अनेक राजकीय नेत्यांची अत्यंत खालच्या पातळीला जाऊन बदनामी करत होता. ही बदनामी जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोचली होती. अशा परिस्थितीत तुम्ही तरी गप्प राहाल का, असा उलट सवाल जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर शरसंधान साधणाऱ्या भाजपा नेत्यांना केला आहे.

या प्रकरणात अनंत करमुसे याने पोस्ट केलेली एकेक चित्रे, छायाचित्रे, पोस्ट, प्रतिक्रिया आता समोर येत असून ती अत्यंत गलिच्छ आणि विकृत स्वरूपाची आहेत. स्त्रीयांच्या संदर्भाने करमुसेने केलेली शेरेबाजी वाह्यात व खूप हीन दर्जाची आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवराय आणि संभाजींच्या विचारांच्या शिकवणीचा दावा करणाऱ्या मनोहर भिडेंचा करमुसे हा चेला आहे. करमुसेच्या गलिच्छ विचारसरणीवरुनच भिडे युवकांची जडणघडण राष्ट्रवादाच्या नावाखाली कशी करतात, त्याचं करमुसे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहता येईल.

जितेंद्र आव्हाड मनोहर भिडेंचा कायम विरोध करत आले आहेत. भीमा-कोरेगावपासून बाबासाहेब पुरंदरेंपर्यंतच्या अनेक आक्रमक भूमिकांमुळे आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या निशाण्यावर होते. सोलापूरचं पालकमंत्रीपद आव्हाड विरोधकांच्या जिव्हारी लागलंय. त्यामुळे करमुसेच्या विकृतीचा विरोध करणारा एकही चेला दिसला नाही. उलट, करमुसेच्या समर्थनार्थ गुरूजींचे चेले उघडपणे मैदानात उतरले आहेत.

अर्थात, त्यामागे संताप कमी आणि गुरूजींच्या चेल्यांचं नैराश्य अधिक आहे. श्री शिवप्रतिष्ठान चे बहुतांशी कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या शिवसेनेशी बांधील आहेत. भाजपाबद्दल त्यांना फारशी सहानुभूती नाही. परंतु, शिवसेनेसोबतच्या हिंदुत्ववादी युतीमुळे त्यांना भाजपा आणि सोबत मोदी बोनसमध्ये मिळालेत. मोदी राजवटीतल्या कडव्या हिंदुत्ववादाने भारतात जसे अनेक सोमेगोमे शेफारले, त्यात महाराष्ट्रात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांना समाजमाध्यमात दादागिरीने वावरायची सवय लागली होती. परंतु, आजवर त्यांच्या उन्मादाची झाकली मूठ होती. करमुसेला झालेल्या मारहाणीनंतर गुरुजींचे चेले बिथरलेत. नेमकं काय भूमिका घ्यावी, हेच त्यांना कळेनासं झालंय. शिवसेनेचं राजकीय पाठबळ मिळेल की नाही, याबद्दल साशंकता आहे. भाजपाच्या तावडीत जाण्याची मानसिकता नाही, अशा कचाट्यात ही तरूण मंडळी सापडलीत. भाजपा आपला त्यांच्या राजकारणासाठी वापर करेल, अशी त्यांना भीती वाटतेय.

उदयनराजे भोसले यांची कितपत मदत होईल किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील समोर आव्हाड असताना आणि इतकं टोकाला प्रकरण गेल्यावर सोबत येतील का, शंका आहे.

या भांबावलेल्या युवकांना आपल्या कब्जात घेण्याची धडपड भाजपाने चालवलीय. मुस्लिम द्वेषाचा समान धागा भाजपा आणि भिडेंमध्ये असल्याने ते शक्य होईल, असं भाजपाला वाटतंय. भाजपाची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची मंडळी या प्रकरणात उतरलीत, ती त्यासाठीच ! करमुसेच्या पोस्ट पाहता आव्हाडांना डिवचण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होते, असं दिसतंय.

समाजमाध्यमांतील विकृती आव्हाडांच्या घरापर्यंत पोचली आणि घाव वर्मी लागला. त्याची परिणती करमुसेला मारहाणीत झाली. आव्हाडांनी असं करणं योग्य आहे का, यावर संविधानिक मार्ग मानणाऱ्यांमध्येच दोन गट पडलेत. आव्हाडांनी कायदा हातात घ्यायला नको, असं काही लोकांचं मत, तर करमुसेसारख्या विकृतींना ठोकायलाच पाहिजे, असं ठाम मत असलेला एक वर्ग ! पण करमुसेला दोन्हीकडच्या लोकांची सहानुभूती नाही की आव्हाडांविरोधात भाजपाला साथ नाही ! उलट, बदडल्यानंतरच भाजपाला संविधानाचं महत्त्व कळतं, असं समाजमाध्यमात अनेकांनी म्हटलं आहे.

आव्हाड चूक की करमुसे याच्याशी भाजपाला काही देणंघेणं नाही ! करमुसेनिमित्ताने भाजपाला ब्राह्मणकार्ड खेळायचंय. तो मराठा असल्याचं पसरवून मराठा आणि बहुजनांना भिडवायचंय. शिवप्रतिष्ठानचा उन्माद आपल्या पंखाखाली घ्यायचाय. त्यांना शक्य झाल्यास महाराष्ट्रातलं वातावरण पेटवण्यासाठी सोयिस्कर वापरायचंय आणि कोरोना लाॅकडाऊनमध्ये सरकारला भलतीकडे भरकटवून अनागोंदी माजवायचीय. रात्रीपासून भाजपाचा आयटी सेल जोरात कामाला लागलाय.

नेहमीप्रमाणे रेडिमेड ट्वीटस्, पोस्टस् धडाधड मोबाईलवर पाठवल्या गेल्या. फोन करून पोस्ट करायला लावल्या. निरंजन डावखरे, नितेश राणेंच्या निष्ठा तपासल्या गेल्या. चंद्रकांत पाटील, विनय सहस्त्रबुद्धे मैदानात उतरले. स्वत: देवेंद्र फडणवीस फ्रन्टला आले. आव्हाडांविरोधात एक मोठं रान उठवलं गेलं. तशीही शरद पवार, सुप्रिया सुळे वगळता बाकी पवार मंडळी आव्हाडांना फारसं पसंत करत नाहीत. सद्याच्या वातावरणात आव्हाड सरकारसाठी मनस्तापदायक आहेत, असं वातावरण उभं करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आव्हाडांना मंत्रीमंडळातून काढण्याची मागणी करून मुख्यमंत्र्यांची कोंडी करणं सुरू आहे; पण आव्हाडांना सगळ्याच थरातून मोठा पाठिंबा मिळाला आणि आव्हाडांना एकटं पाडायचा भाजपाचा डाव फसला. अर्थात, सरकारामधील भाजपाविरोधातील आक्रमक नेता, अशी आव्हाडांची प्रतिमा असल्याने त्यांचं मंत्रिमंडळातून बाहेर जाण्याची शक्यता धूसर आहे.

तरीही, करमुसेची भेट घेण्याचा खोडसाळपणा, शिवप्रतिष्ठान कडून सुरू असलेलं धमक्यांचं सत्र पाहता महाराष्ट्रातील वातावरण गढुळ करण्यासाठी भाजपाने ताकद लावल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आव्हाडांची वेळ चुकलीय, असं म्हणावं लागेल. शिवाय, सरकारमधला प्रभाव वापरून करमुसेला कायदेशीर धडा शिकवण्याचा मार्ग हातात असताना, आव्हाडांनी स्वत:ला व सरकारला अडचणीत आणण्याचा मार्ग का पत्करला, हाही सवाल आहे. याबाबतीत आव्हाड भाजपाच्या सापळ्यात अलगद सापडले, असं म्हणावं लागेल.

अर्थात, आव्हाड आता आक्रमक पवित्र्यात आहेत. पण मला कुणाचीही सहानुभूती नकोय, असं ट्वीट करून आव्हाडांनी स्वत:ला लाॅकडाऊन मदतकार्यात झोकून दिलंय. दाभोळकर हत्येच्या ठाणे कनेक्शनच्या चौकशीची मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे करमुसेवरचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. शिवप्रतिष्ठान आणि सरकारमधला संघर्ष त्यामुळे वाढेल.

शिवप्रतिष्ठानची सांगलीबाहेर महाराष्ट्रभर फारशी ताकद नसली तरी भाजपाई फंडानुसार, जातीय-धार्मिक रंग दिला गेल्यास महाराष्ट्रातलं वातावरण बिघडू शकतं. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आव्हाडांची पाठराखण कशी होते, सरकारमधील सहकारी काय भूमिका घेतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. पण सरतेशेवटी महाविकास आघाडीतील हुकुमाचा पत्ता आव्हाडांकडेच आहे, हेही लक्षात घ्यावं लागेल.

Updated : 9 April 2020 10:12 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top