वीज पुरवठ्यासाठी सावित्री नदीवरुन ओव्हरहेड वायर नेण्याचा थरार
X
रायगड जिल्ह्यासह कोकणात 22 जुलै रोजी आलेल्या आलेल्या महापुरात आपला जीव धोक्यात घालून शेकडो महाडकरांचे प्राण कोलाड रिव्हर राफ्टींग टीमने वाचवले होचे. आता पुन्हा एकदा महाडकरांच्या मदतीसाठी ही टीम धावली. सावित्रीच्या नदीपात्रात उतरून अनेक तास अविश्रांत मेहनत घेत महाडचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी या टीमने केली आहे.
केवळ चार तासात सावित्री नदीच्या वाहत्या पाण्यातून बोटच्या मदतीने वायर ओढुन हे काम करण्यात आले. महापुरामुळे महाड तालुक्यात वीज पुरवठा ठप्प झाला होता, तसेच यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. सावित्री नदी पार करणाऱ्या चार ओव्हरहेड लाईन तुटल्याने महाड तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यात अडचण निर्माण झाली होती. यावेळी कोलाड रिव्हर राफ्टींगचे महेश सानप यांच्या मदतीने नदी पार करुन लाईन टाकण्याचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले. कोट आळी येथुन महाड शहर, वडवली येथुन विन्हेरे आणि कुंबळे तर शेडाव येथुन राजेवाडी फिडरला जोडणाऱ्या लाईनचे काम केले गेले. वाईल्डर वेस्ट कोलाड रिव्हर राफ्टींग टीमच्या मदतीने महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने महावितरणचे इंजिनियर, कर्मचारी, ठेकेदार यांनी मिळून यांनी हे काम पूर्ण केले. यामुळे महाड तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. कोलाड रिव्हर राफ्टींग टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतेय.