वस्तू अंगाला का चिटकते?
कोरोना लस घेतल्यानंतर स्टीलच्या काही वस्तू अंगाला चिकटतात हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले त्या निमित्ताने पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि समाजातील अज्ञान स्पष्ट झाले, आपल्या घामातील सिबम द्रव्याचे रेणू आणि वस्तूच्या पृष्ठभागावरचे रेणू यांच्यातील विषमाकर्षण बलामुळे वस्तू अंगाला चिकटते असं छद्म विज्ञानाचे अभ्यासक प्रा. प.रा.आर्डे यांनी स्पष्ट केला आहे.
X
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने काल 'चुंबक मानव : चमत्कार की छद्म विज्ञान' या विषयावर अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते व छद्म विज्ञानाचे अभ्यासक प्रा.प.रा.आर्डे यांचे जाहीर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते.या व्याख्यानास संपूर्ण महाराष्ट्रातून २५० श्रोते कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा.आर्डे विषयाची मांडणी करताना म्हणाले की, कोरोना लसीमुळे आपल्या अंगात चुंबकीय शक्ती आली आहे,असा दावा करणार्या नाशिकच्या गृहस्थापासून ते अनेक ठिकाणी स्वत: चुुंबक मॅन असल्याचा दावा करणार्या व्यक्तींचे पीक महाराष्ट्रात जोमात वाढू लागले आहे. कोरोना लसीमुळे आपल्यात चुंबकत्व आले, असा दावा ही मंडळी करीत आहेत. कारण काही का असेना पण अशा व्यक्ती खरोखरच मॅग्नेट मॅन आहेत का? वस्तुस्थिती काय आहे? हे आपण जाणून घेऊ.
प्रा.आर्डे पुढे म्हणाले की, आपण मॅग्नेट मॅन आहोत, असा दावा जगभरच्या अनेक देशांत, अनेक लोकांनी केला आहे. अशा दाव्याची चिकित्साही जगभर झाली आहे. चिकित्सेअंती चुंबक मॅन म्हणून मिरविणार्या व्यक्ती चुंबकीय शक्ती नसून अन्य कारणांनी त्या व्यक्तीच्या अंगाला धातूच्या वस्तू चिकटतात. असे सिद्ध झाले आहे.
बॉग्डॉन या सात वर्षीय सर्बिया या देशातील मुलगा आपल्या छातीवर धातूंच्या अनेक वस्तू तोलून दाखवी. हे आपण आपल्यातील चुंबकीय शक्तीने करतो, असा दावा तो करी. त्याला तपासताना संशोधकांनी त्याच्या शरीराजवळ चुंबकसूची नेली असता तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही, शरीरात चुंबकत्व असते तर सूची हलली असती. त्यामुळे त्याच्यात चुंबकत्व नाही असे संशोधकांनी जाहीर केले.
अशा अनेक मॅग्नेट मॅनची जगभरात कशी चिकित्सा केली आहे हे सोदाहरण सांगताना प्रा.आर्डे पुढे म्हणाले की, अमेरिकेतील स्केप्टिकल मासिकाचे संपादक बेंजामिन रॅडफोर्ड याने या मुलाची चिकित्सा केली. या मुलाला काचेच्या लाकडासारख्या वस्तूही चिकटत होत्या. चुंबकाला अशा वस्तू चिकटत नाहीत याचा अर्थ या मुलामध्ये चुंबकीय शक्ती नाही. अशा अनेक मॅग्नेट मॅनचा पोलखोल बेंजामिन आणि अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केला आहे.
मलेशियातील ल्यू थो लिन हा गृहस्थ आपल्या अंगावर अनेक किलो वजनांच्या धातूच्या वस्तू शरीरावर तोलून धरी. एवढेच नव्हे पोटाजवळ लोखंडी पट्टी प्रेस करून तिला साखळी बांधून तो कारही ओढून दाखवी. या गृहस्थाची चिकित्सा मलेशियातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील वैज्ञानिकांनी केली. त्यामध्ये या गृहस्थामध्ये चुंबकशक्ती नसल्याचेच दिसून आले.
अशा प्रयोगामागे नेमके काय शास्त्रीय तत्व असते हे विषद करताना प्रा.आर्डे म्हणाले की, चुंबकशक्तीने वस्तू तोलून धरल्या जात नसतील, तर अशा वस्तू शरीराला चिकटण्याचे कारण काय? याचे कारण आहे, आपल्या घामातील सिबम नावाचे एक द्रव्य. द्रव्याचे रेणू आणि जी वस्तू तोलून धरायची तिच्या पृष्ठभागावरचे रेणू विषमाकर्षण बलामुळे एकमेकांत गुंततात आणि त्यातून एक प्रकारचा चिकटपणा निर्माण होतो. या चिकटपणातून निर्माण झालेले घर्षण गुरुत्वाकर्षणाला बॅलन्स करते आणि तो पदार्थ तोलला जातो,चिकटला जातो.
घर्षणामुळे आणि घामातील चिकट द्रव्यामुळे हे घडते. हे सिद्ध करण्यासाठी प्रख्यात अमेरिकन जादूगार जेम्स रँडीने एक प्रयोग केला. चुंबक मॅन असण्याचा दावा करणार्या एका गृहस्थाच्या छातीवर त्याने टाल्कम पावडर चोळली. या पावडरीमुळे घामट द्रव्याचा परिणाम नाहीसा झाला आणि वस्तू तोलली गेली नाही.
जगभर अशा अनेक मॅग्नेट मॅन रहस्य विचारवंतांनी शोधून काढून वस्तू तोलून धरणे याचा मॅग्नेटिक शक्तीशी काहीही संबंध नाही, हे सिद्ध केले आहे. ज्याचे शरीर गुळगुळीत आहे, ज्याच्या अंगावर केस नाहीत व त्वचा रबरासारखी इलॅस्टिक आहे, अशी कोणतीही व्यक्ती धातूच्या वस्तू आपल्या अंगावर तोलून धरू शकतात.
अशा चमत्कारामागचा दुष्परिणाम सांगताना प्रा.आर्डे म्हणाले की, कोरोना वरील लसीमुळे शरीरात चुंबकत्व येते याला काहीही शास्त्रीय आधार नाही, उलट अशा अफवेमुळे लसीकरण मोहिमेला खिळ बसेल, लोकांच्या मनात अशा अफवेमुळे लसीबाबत गैरसमज पसरतील, त्यामुळे शासनाने असे फसवे दावे करणार्यावर साथ प्रतिबंध कायदा व जादूटोणा विरोधी कायदयाचा वापर करून गुन्हे नोंद करावेत.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात, गीत गायन त्रिशला शहा, प्रास्ताविक आशा धनाले,चमत्कार सादरीकरण संजय गलगले,सुहास यरोडकर, आभार डॉ. सविता अक्कोळे यांनी मांडले. तर कार्यक्रमाचे संयोजन डॉ.संजय निटवे, गीता ठकार,शशिकांत सुतार, चंद्रकांत वंजाळे, सुहास पवार,अमोल पाटील, धनश्री साळुंखे यांनी केले.