#PunjabRejectsModi का ट्रेन्ड होत आहे?
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबद्दल पंजाबमध्ये निष्काळजीपणा केला गेल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. पण हा आरोप पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे, तसेच याप्रकरणावरुन आता काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं आहे. मोदी यांच्या पंजाबमधील सभेला काही हजार लोक येण्याची अपेक्षा होती, पण खूप कमी आल्याने मोदींनी सभाच रद्द केली आणि खापर मात्र पंजाब सरकारवर फोडले असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे की, मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे सांगितले जात आहे, पण यामध्ये काँग्रेस सरकारची कोणतीही चूक नाहीये. तर मोदींच्या फिरोजपूर इथल्या सभेला अतिशय कमी लोक उपस्थित होते, त्यामुळे मोदींनी सभा रद्द केली. मोदी केवळ राजकीय ड्रामा करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. "पंजाबमध्ये भाजपने बुधवारी एक राजीकय नाट्य घडण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांचाच खरा चेहरा उघड झाला. भाजपला पंजाबने नाकारले आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्याऱ्या उ. प्रदेशातही भाजपला लोक नाकारत आहेत " अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.
दरम्यान ट्विटरवर गुरूवार सकाळपासून #PunjabRejectsModi असा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये सभेसाठी असलेल्या खुर्च्या रिकाम्या असल्याने मोदींनी सभा रद्द केली, असा आरोप केला जात आहे. यासंदर्भातले काही मीम्स देखील शेअर केले जात आहेत.