Home > News Update > भारतात निवडणूका का पुढं ढकलल्या जात नाही?

भारतात निवडणूका का पुढं ढकलल्या जात नाही?

भारतात निवडणूका का पुढं ढकलल्या जात नाही?
X

जगभरात कोरोनामुळे अनेक देशात निवडणूका पुढं ढकलल्या जात आहेत. अशा परिस्थिती जगातील सर्वात मोठ्य़ा लोकशाही देशात लोकांच्या जीवापेक्षा निवडणूका महत्त्वाच्या झाल्या आहेत का?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं उत्तर प्रदेश निवडणूका पुढं ढकलण्याचा विचार करा असा सल्ला दिला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूका होतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवापेक्षा भारतात निवडणूका महत्त्वाच्या आहेत का? असा सवाल उपस्थित होतो.

बसपा प्रमुख मायावती यांनी निवडणूक आयोगाला निवडणूका वेळेवर घेण्याची मागणी केली आहे. तर छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना 5 राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपचा पराभव होत असल्याने भाजप निवडणूका टाळत असल्याचा आरोप केला आहे. एकंदरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना होणारी गर्दी असो की, या नेत्यांची वक्तव्य, या नेत्यांना कुठेही जनतेच्या जीवाची काळजी आहे. असं दिसून येत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील भयावय वेदना...

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सुरु असताना पंतधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षाच्या सभांना मोठी गर्दी होत होती. या गर्दीमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. ही बाब लक्षात घेता उत्तर प्रदेशमधील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहता ही मोठ्या धोक्याची घंटा आहे. मात्र, देशातील राजकीय पक्षांना न्यायालयाने दिलेला इशारा आणि इथल्या जनतेच्या जीवापेक्षा राजकारण महत्त्वाचं असल्याचं दुसऱ्या लाटेच्या आकड्यावरुन दिसून येतं.

मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान देशात झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूकीदरम्यान आणि उत्तर प्रदेशमधील पंचायत समितीच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला होता. हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

निवडणूका सुरू झाल्याच्या दोन आठवड्यांतच या राज्यांतील कोरोना रुग्णांची संख्या 500 टक्क्यांहून वाढली होती. 1 ते 14 एप्रिल दरम्यान, आसाममध्ये 532%, पश्चिम बंगालमध्ये 420%, पुद्दुचेरीमध्ये 165%, तामिळनाडूमध्ये 159%, आणि केरळमध्ये 103% एवढ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तसंच 5 राज्यांतील मृतांची संख्या सरासरी 45 टक्क्यांनी वाढली होती. ही सर्व माहिती देशातील सर्व सरकारकडे उपलब्ध असताना लोकांच्या जीवाशी खेळून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात निवडणूका घेतल्या जात आहेत.

घटनेने प्रत्येक नागरिकाला कलम 21 नुसार जीविताचा हक्क दिला आहे. मात्र, कोरोना काळात घेतल्या गेलेल्या या निवडणुकांमधील गर्दीमुळे नागरिकांचा हा हक्क हिरावला जात नाही का?

जगभरात काय स्थिती आहे?

इंस्टीट्यूट फॉर डेमोक्रेसी एंड इलेक्टोरल एसिस्टेंट' (IDEA) ने कोरोनाने जगभरातील निवडणूकांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास केला आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारी 2020 ते 21 नोव्हेंबर 2021 या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार जगात कोणकोणत्या देशात निवडणूका पुढं ढकलल्या याची माहिती पुढील प्रमाणे...

जगभरातील 79 देशांनी कोरोनामुळे मुख्य़ निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

कोरोना असूनही 146 देशांमध्ये निवडणूका झाल्या आहेत. यापैकी 124 देशांमध्ये मुख्य निवडणूका घेण्यात आल्या आहे. तर 57 देशांमध्ये मुख्य निवडणूका (राष्ट्रीय स्तरावरील) आणि प्रादेशिक निवडणुका यांचा समावेश आहे.

निवडणूक पुढं ढकललेल्या देशांमध्ये रशीया, बोलिविया, ईरान, सीरिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सोमालिया, ब्राझील, चिली या देशांचा समावेश आहे.

भारतात निवडणूका पुढं ढकलल्या जात नाहीत का?

भारतात निवडणूका आत्तापर्यंत अनेकवेळा झाल्या आहेत.

1991 मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील टप्प्यातील मतदान सुमारे महिनाभर पुढे ढकलले होते. पाटणा लोकसभेत बूथ कॅप्चरिंगमुळे 1991 मध्येच आयोगाने निवडणूक रद्द केली होती. 1995 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान बूथ कॅप्चरिंग उघडकीस आल्यानंतर 4 वेळा निवडणूकीची तारीख बदलली होती. नंतर निमलष्करी दलांच्या देखरेखीखाली अनेक टप्प्यांत निवडणुका पार पडल्या होत्या.

त्यामुळं भारतात निवडणूका पुढं ढकलल्या जाऊ शकतात. मात्र, देशातील राज्यकर्त्यांना निवडणूक आयोगाला आपल्या देशातील लोकांचे प्राण निवडणूकांपेक्षा महत्त्वाचे आहेत. असं वाटायला हवं.

Updated : 31 Dec 2021 4:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top