एवढी मोठी न्यूज फेक न्यूज कशी असू शकते?
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईच्या वृत्तावर लष्कराने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
X
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ले करत ते उध्वस्त करुन लावले अशा स्वरुपाच्या ब्रेकिंग न्यूज गुरूवारी संध्याकाळी काही प्रसारमाध्यमांवर झळकल्या. भारतानं पुन्हा एकदा पाकला धडा शिकवला असे सांगितले गेले. पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते. पण काही वेळातच लष्करातर्फे हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले गेले. यावरच ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक सवाल विचारला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया....
"काही वेळापूर्वी बहुतेक चॅनेल्सवरून भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी स्थळांवर पुन्हा एकदा strike करून अतिरेक्यांची ठिकाणं उध्वस्त केल्याची बातमी दाखविली जात होती. पीटीआयच्या हवाल्यानं ही बातमी दिली गेली होती.. ही फेक न्यूज असल्याचं भारतीय लष्कराने आता जाहीर केलं आहे.. पीटीआय सारखी विश्वासार्ह वृत्तसंस्था एवढी मोठी फेक न्यूज कशी देऊ शकते? की सरकारच काही दडपविणयाचा प्रयत्न करीत आहे.. प्रश्न विश्वास कोणावर आणि कसा ठेवायचा हा आहे.."