Home > News Update > Elon Musk यांनी ट्विटरचे संचालकपद का नाकारलं?

Elon Musk यांनी ट्विटरचे संचालकपद का नाकारलं?

जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटरमधील सर्वाधिक शेअर्स खरेदी केल्यानंतरही ट्विटरचे संचालकपद नाकारले आहे. यामागे त्यांची काही खेळी आहे का?

Elon Musk यांनी ट्विटरचे संचालकपद का नाकारलं?
X

जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जाणारे एलॉन मस्क कायम आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतात...याच मस्क यांनी ट्विटरचे ९ टक्के शेअर्स खरेदी केले आणि ते ट्विटरचे सगळ्यात मोठे समभागधारक बनले...यानंतर मात्र एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या भूमिकांबाबत थेट भाष्य करण्यास सुरूवात केली. यामध्ये त्यांनी ट्विटर आपल्या वापरकर्त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत आहे का, असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारला आणि पहिला धक्का दिला.

यानंतर मस्क यांनी ट्विटरचे हेडक्वार्टर कुणीही वापरत नसल्याने ते बेघर लोकांना आश्रय देण्यासाठी दिले पाहिजे, अशीही भूमिका जाहीरपणे त्यांनी मांडली. त्यानंतर एरवी मस्क यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे अमेझानचे मालक जेफ बेझोस यांनीही मस्कच्या यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे मस्क हे ट्विटरच्या संचालक मंडळात येताच आता अनेक बदल होणार अशी चर्चा सुरू झाली.

एकीकडे मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल करत असल्याचे संकेत दिले...पण काही तासात एलॉन मस्क हे ट्विटरच्या संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याची घोषणा ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी केली. यासंदर्भात त्यांनी एक निवेदनच प्रसिद्ध केले. सगळ्यात मोठे शेअर होल्डर या नात्याने त्यांना ट्विटरने संचालक मंडळात येण्याचे आवाहन केले होते, पण मस्क यांनी नकार दिला आहे, पण मस्क हे कंपनीच्या भल्यासाठी कायम सोबत असतील अशी अपेक्षाही अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

मस्क यांनी ट्विटरचे शेअर्स खरेदी केल्यानंतर काही तासातच एक ट्विट केले, त्यात ट्विटरची पुढील बोर्ड मिटींग कशी असेल अशा आशयाचा फोटो होतो....त्यानंतर त्यांनी राजकारणासह विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी ट्विटरचा वापर करत नाहीत, ट्विटर मरणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे ट्विटरमध्ये आता अनेक बदल केले जातील, अशी चर्चा सुरू झाली. पण आता मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात येण्यास नकार दिला आहे, त्यांनी नकार देण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण काही जणांनी अंदाज व्यक्त केले आहेत, ट्विटरचे आणखी शेअर्स खरेदी करण्यासाठी मस्क यांची ही खेळी आहे का, ट्विटर कंपनी पूर्णपणे खरेदी करण्याची मस्क यांची योजना आहे, का असे अनेक प्रश्न आता चर्चिले जात आहेत. पण यानिमित्ताने श्रीमंतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेली माध्यमं खरेदी करावी की करु नये असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Updated : 12 April 2022 1:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top