का झालं बीडमध्ये टरबूज आंदोलन?
बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लाऊन टरबूज आंदोलन करण्यात आले आहे. काय आहेत या आंदोलकांच्या मागण्या वाचा या बातमीमध्ये…
X
बीड जिल्ह्यात राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात यावी तसेच शासन तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी आमदारांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात यावे या मागण्यांसाठी चक्क टरबूज कापून आंदोलन करण्यात आले आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 मार्च पासुन राज्यात विविध संघटनांकडून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. हा संप मोडुन काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा परीरक्षण (मेस्मा) कायदा लागु करण्यासाठी "मेस्मा "कायद्याचे विधेयक आणल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला आहे.
सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ व बेमुदत संपाला पाठींबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टरबूज आंदोलन करण्यात आले.
टरबूज आंदोलनच का ?
या आंदोलनात लावण्यात आलेल्या बॅनरवर टरबूजाच्या फोटोसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो का लावला आहे. असा प्रश्न पत्रकारांनी आंदोलकांना विचारला असता टरबुज हे आरोग्याला हितकारक आहे त्याच्यामुळे डोके शांत राहते. या प्रमाणेच सरकारने शांत डोक्याने विचार करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.
काय आहेत आंदोलनातील मागण्या…
शासन तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी आमदारांची पेन्शन बंद करण्यात यावी.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी देणारी 1982 व 1984 ची जुनी निवृत्तीवेतन योजना (ओपीएस) पुर्ववत लागु करण्यात यावी.
सरकारच्या दडपशाही विरोधात लक्ष्यवेधी टरबूज आंदोलन..