Home > News Update > सेना - भाजपाच्या मालवणी गजाली...

सेना - भाजपाच्या मालवणी गजाली...

राणेंच्या भाजप प्रवेशाने शिवसेना भाजपपासून कशी दूर गेली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये पडद्यामागे नक्की काय घडत होते? अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा का पडला होता? वाचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमं सल्लागार राहिलेल्या रविकिरण देशमुख यांनी सांगितलेल्या पडद्यामागच्या घडामोडी...

सेना - भाजपाच्या मालवणी गजाली...
X

शिवसेनेला आपण मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला नव्हता आणि बंद दाराआड आपण काही करत नाही; जे काही करतो ते उघडपणे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी मालवणात गरजले. त्यांनी हे स्पष्ट विधान भाजपाची सत्ता गेल्यानंतर प्रथमच तब्बल १४ महिने १४ दिवसांनंतर केले आणि ते ही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपाचे खासदार असलेले नारायण राणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात!

म्हटलं तर याला फार मोठा राजकीय संदर्भ आहे. पण त्यापूर्वी एक लक्षात घेतले पाहिजे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते सुरू केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना देत असताना राणे म्हणाले होते की, शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रात सत्तापालट होवो. सत्तापालट होईल की नाही माहिती नाही पण हे वेळोवेळी दिसून आले आहे की, राणे यांना बातम्यांत रहायला आवडते. अलीकडे ते जरा कमी झाले आहे. ती कसर त्यांचे माजी खासदार चिरंजीव निलेश आणि विद्यमान आमदार नितेश हे भरून काढत असतात.

पाहुण्यांना मासे खिलवण्याची राणे यांना फार आवड आहे. विरोधी पक्षनेते असताना ते विधान भवनातील आपल्या दालनात मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करून मासे खाऊ घालत असत. पण शहा हे अर्थातच शाकाहारी असणार त्यामुळे त्यांना काळ्या वाटाण्याची आमटी, घावणे, शिरवाळं म्हणजे नारळाच्या दुधात शेवया आदी मालवणी स्पेशल खिलवलं असणार. त्याचा प्रभाव जबरदस्तच झाला असे म्हणावे लागेल. कारण सत्ता येणारच आहे असे गृहित धरून पुढची संपूर्ण तयारी करणाऱ्या भाजपाला सेनेने जबर झटका दिल्यानंतरही जो खुलासा किंवा उलगडा आजवर झाला नव्हता तो शहा यांच्याकडून आता झाला आहे.

शहा यांनी या खुलाशाला एवढा वेळ का लावला असावा? हा प्रश्न तर देवेंद्र फडणवीस यांनाही पडला असेलच. कारण, काही झाले तरी सेनेची सत्ता येऊ द्यायची नाही या जिद्दीने त्यांनी भल्या पहाटे शपथविधीची योजना केली. पण तो प्रयोग फसल्यामुळे त्यांना जी टीका सहन करावी लागली आहे आणि प्रतिमेचे जे काही बारा वाजले आहेत ते निस्तरता निस्तरता आणखी खूप दिवस निघून जातील. पक्षाच्या वरिष्ठांकडून ज्या खुलाशाची त्यांना त्या वेळी आवश्यकता होती. तो आत्ता आला. आणि तो ही आला थेट मालवणातील कार्यक्रमात.

भाजपा आणि शिवसेना यांचे संबंध कमालीचे दुरावण्यात मालवणाचा मोठा संबंध आहे व तो थेट नारायण राणे यांच्याशी आहे. शिवसेना दोन गोष्टी कधीच सहन करत नाही. एक म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील सत्तेला आव्हान आणि शिवसेनेपासून दुरावताना व नंतर सेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडलेले नारायण राणे व त्यांच्या मुलांकडून होणारी शेरेबाजी. भाजपाने या दोन्ही गोष्टी केल्या आणि ज्या दिवशी राणे यांना पक्षात स्वीकारले त्यादिवशी युतीचा अघोषित काडीमोड झाला होता.

त्याआधी २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि सेना स्वतंत्र लढले. ८० च्या दशकाच्या शेवटी-शेवटी एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष याआधीही महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढले होते. १९९२ मध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या सहीचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून झाली होती.

त्याची कारणमिमांसाही व्यवस्थित दिलेली होती. ज्या योगे शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यात कटूता आणि संघर्ष निर्माण होणार नाही. तसेच झाले खरे पण सत्ता काँग्रेस-रिपाई आघाडीकडे गेली होती. पण जी उंची त्या तात्पुरत्या काडीमोडाला होती त्याची सर २०१७ च्या निवडणुकीत आली नाही. याचे कारण इतिहासात डोकावण्याला व तिथून काही शिकण्याला भाजपाचे सध्याचे नेतृत्व महत्त्व देत नाही.

२०१७ मध्ये सेनेने सत्ता राखली पण ती राखताना भाजपाने केलेले घाव जपून ठेवले. भाजपाची पहारेकऱ्याची भूमिका नीट जोखली. त्याचा पहिला परिणाम असा झाला की, निकालानंतर झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्तेचा लंबंक दोलायमान झाला होता.

अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यापासून ते विभागवार मागण्या मंजूर करून घेई पर्यंत सरकारमध्ये घमासान होते. विधिमंडळाच्या नियमानुसार आर्थिक बाबीवरील मतदानात सरकारचा पराभव झाला तर राजीनामा द्यावा लागतो. भाजपाच्या कसोटीचा क्षण होता. पण हे ओळखून काही पावले टाकली गेली होती. मग आपण सभागृहात विरोधात मतदान करूनही अर्थसंकल्प आणि बाकीचे प्रस्ताव मंजूर होणार आहेत. तर टोकाचा विरोध कशाला हा विचार करून सेनेने शस्त्रे म्यान करून सत्तेत राहणे पंसत केले होते. भाजपाची ही तयारी नेमकी काय होती याचा उलगडा पुढे पहाटेच्या शपथविधीच्या वेळी दिसून येतो. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडद्याआड घडलेल्या अनेक नाट्यमय गोष्टींची वाच्यता दोन्ही पक्षांकडून झाली नाही हे ही तितकेच खरे.

यानंतर सेनेसाठी निर्वाणीचा क्षण आला तो नारायण राणे व त्यांचे सुपुत्र यांचे भाजपाशी जुळवून घेण्याचे ठरविल्यानंतर. भाजपानेही सेनेला प्रचंड डिवचले. २०१४ ते २०१९ या काळात कोकणात पनवेलनंतर गोव्याच्या हद्दीपर्यंत भाजपाचा आमदारच नव्हता. सेना दिवसेंदिवस दूर जातेय आणि आपल्याला जुळवाजुळव करावी लागणारच आहे. तेव्हा राणे यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही असे मनोमन ठरवून भाजपाने अत्यंत धाडसी निर्णय घेतला.

राणे आणि भाजपा यांचे सूर जुळले तेव्हा सेनेचा अंतिम निर्णय झाला असणार हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नव्हती. लोकांना त्याचे दृष्य स्वरूप काहीसे उद्धव ठाकरे यांच्या '२५ वर्षे युतीत सडली' यासारख्या विधानातून आणि विधानसभा निवडणुकीत "हिच ती वेळ" या सेनेच्या होर्डींग्जमधून दिसले.

पण भाजपाने मात्र सेनेसोबत शक्यतो जुळवून घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या. त्याचे कारण होते २०१९ मधील लोकसभा निवडणुका आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घडामोडी. भाजपाला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशात एकामेकांचे कट्टर विरोधक असलेले समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि इतर पक्ष एकत्र येत आहेत म्हटल्यावर या पक्षाचा विचार बदलला. तिथे एकत्रित विरोधकांमुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या तर तो खड्डा कुठे भरून काढायचा याचा विचार सुरू झाला आणि समोर ४८ जागा असलेला महाराष्ट्र आला. काहीही करून सेनेला सोबत ठेवायचे, चौकीदार चोर है किंवा २५ वर्षे सडली यासारखी टीका सहन करायची, जागावाटपात विरोध करायचा नाही, असे ठरले.

त्यामुळेच पालघरची जागा पदराला खार लावून महतप्रयासाने जिंकलेली असतानाही भाजपाने ती जिंकलेल्या उमेदवारासकट शिवसेनेच्या पदरात घातली. असे निर्णय घेण्याला प्रचंड धाडस तर लागतेच शिवाय याची गणना दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण म्हणून होते. लोकसभेची गणिते जुळविताना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात शेवटी झालेल्या चर्चेत राज्यातले नेते हजर नव्हते. काही मिनिटे झालेल्या या चर्चेत नेमके काय झाले हे या दोघांनाच माहिती होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठीच्या युतीची घोषणा करताना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर चित्रफितीतच पाहणे आवश्यक आहे. कारण त्यांचा चेहरा बरेच काही सांगून जातो.

असो. नोव्हेंबर २०१९ मधील नाट्यमय घडामोडींना अमित शहा यांच्याकडून पुन्हा उजाळा मिळाला आहे. त्यांनी केलेल्या विधानांना सेनेकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत या खासदारद्वयांकडून उत्तर दिले गेले असले तरी उद्धव ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता वाढली आहे. कारण भाजपातले इतर नेते जेव्हा म्हणत की मुख्यमंत्रीपदाबाबत काही शब्द दिला नव्हता किंवा चर्चा झाली नव्हती, तेव्हा हा मला खोटे ठरविण्याचा प्रयत्न आहे, अशी ठाकरे यांची भावना झाली होती.

खऱ्या-खोट्याचा उलगडा अद्याप बाकी आहे!

Updated : 10 Feb 2021 10:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top