Home > News Update > छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण कशासाठी ?

छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण कशासाठी ?

छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला अनंत काळासाठीचे प्रेरणास्थान आहेत ते महाराज मानवी होते म्हणून. त्यांचं यशापयश मानवी होतं म्हणून. एकदाचा का त्याला दैवी तडाखा दिला की मग शिवाजी महाराज नव्हे तर त्यांचं अवतारीपणच फक्त चर्चेला राहील आणि स्वतःच्या मनगटावरील विश्वास ढासळेल आणि हेच अशा देशद्रोही लोकांना हवं आहे. याविषयीचा संजय सोनवणे यांचा सविस्तर लेख

छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण कशासाठी ?
X

भारतात प्रत्यक्षात होऊन गेलेल्या ऐतिहासिक महामानवांचं दैवत्वीकरण करत त्यांना वैदिकत्व बहाल करून अपहरण करण्याची परंपरा राम-कृष्णापासूनची आहे. अगदी मुर्तीपूजेचे कट्टर विरोधक भगवान बौद्धही त्यांच्या या अवतारीकरणाच्या कचाट्यातून सुटले नाहीत. तेवढंच कमी होतं की काय आता त्यांनी फ्रंकोईस गोतिये नामक हिंदू बनलेल्या फ्रेंचाला पुढे करत शिवाजी महाराजांचं दैवत्वीकरण सुरू केलंय. या दैवत्वीकरणाचा पहिला टप्पा म्हणून शिवाजी महाराजांचं मंदिर पुण्यात उभारण्यात आलंय. वैदिक यज्ञ सोहळ्याचं पंडित रविशंकर यांच्या हस्ते १४ जानेवारी २०१२ रोजी नितीन गडकरी आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटनही झालंय. थोडक्यात शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाचा पहिला टप्पा पार पडलाय.

सर्वात प्रथम या उपक्रमाची बातमी पुण्यातील एका अग्रगण्य दैनिकात ४ नोव्हेंबर २०११ रोजी ‘फ्रेंच अभ्यासक उभारतोय शिवसृष्टी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली होती. याच बातमीत दुसऱ्या परिच्छेदात म्हटलं होतं की ‘लोहगाव इथे पाच एकरात शिवाजी महाराजांचं मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती देणारं संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केलीय. त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पूर्ण होत आहे…’ याच बातमीत पुढे म्हटलं आहे की या संग्रहालयात वेदांचं महत्त्व सांगणारी विविध शिल्पं, चित्रं आणि दुर्मीळ साहित्य या माध्यमातून संपूर्ण भारतीय संस्कृती दाखवली जाणार आहे.’ यामुळे अस्वस्थ होऊन मी अन्य अग्रणी दैनिकात ‘शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणारा हा गोतिये कोण?’ असा लेख लिहिला होता. त्यावर गोतिये आणि माझ्यात जाहीर वाद-विवादही झाला. गोतियेंनी आपल्या वेबसाईटवरून ‘शिवाजी मंदिर’ हा शब्द वगळला आणि ‘भवानी मंदिर’ आणि ‘भारती मंदिर’ अशा संज्ञा वापरायला सुरुवात केली. पण या वादादरम्यान त्यांनी लेखात केलेली लबाडी अशी होती की, ते म्हणतात, ‘हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नावाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते…’ आणि पुढे हेच सद्गृहस्थ म्हणाले होते ‘मला खात्री आहे की शिवाजी महाराज हे हिंदू होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील…’ आता मला या सद्गृहस्थाला प्रश्न विचारायचाय की जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदू कसे असू शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

मला इथे दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणून पुरातन काळापासून ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढंही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरं असं की ऋग्वेदाला मुर्तीपूजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचं मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असं सांगतांनाच ते ‘हिंदू’ होते हे सांगण्यामागील कारण काय आहे? आणि मग त्यांचं मंदिर उभारण्याचं नेमकं कारण काय? शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मनगटात बळ दिलं ते काढून घेण्याचा तर हा डाव नाही ना?

पण एवढं होऊनही मंदिराचं नियोजित कार्य थांबलं नाही. महाराष्ट्रातील एकाही शिवप्रेमी म्हणवणाऱ्या संघटनांनी या दैवतीकरणाचा निषेध केला नाही. अगदी शिवाजी महाराजांचं पेटन्ट घेतल्याप्रमाणे वावरणाऱ्या मराठा सेवा संघानेही नाही. उलट १४ जानेवारी २०१२च्या उद्घाटन समारंभाला मराठा सेवा संघाचे आश्रयदाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांच्या सौभाग्यवतीदेखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या. अजितदादाही येणार असं कार्यक्रमपत्रिकेत होतं पण ते येऊ शकले नाहीत. शिवप्रेमाचा आव आणणाऱ्या संघटना शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाला विरोध करायला का धजावल्या नाहीत त्याचं उत्तर या ‘अजित’ आत्मविश्वासात आहे.

उठल्या बसल्या ब्राह्मणांना (म्हणजेच वैदिक धर्मियांना) शिव्या घालण्यात धन्यता मानणाऱ्यांनी हे शिवाजी महाराजांचं अवमूल्यन करणारं शिल्पच मुळात कसं मान्य केलं हा प्रश्न उपस्थित राहतो. या मंदिरातील जोडमुर्तीत (आता त्यांनी शिवाजी मंदिर न म्हणता भवानी मंदिर म्हणायला सुरुवात केली असली तरी मुर्तीत बदल केलेला नाही.) भवानी शिवाजी महाराजांना तलवार देत आहे असं दर्शवलंय. या प्रतिमेत शिवाजी महाराज दीन-लीनपणे भवानी मातेकडून तलवार स्वीकारत आहेत. या शिल्पातून जाणारा विचित्र संदेश म्हणजे शिवाजी महाराजांचं सर्व कर्तृत्व हे दैवी आशीर्वादाने घडलेलं आहे. त्यात मानवी प्रयत्न आणि प्रतिभेला काही स्थानच नाही. त्यात ‘शिवाजी महाराज हे विभूती आहेत,’ असं विधान गोतिये यांनी माझ्या लेखाचा प्रतिवाद करताना म्हटलं होतं. म्हणजेच शिवाजी महाराज अवतार आहेत असंच गोतिये यांना आडून सुचवायचं होतं. त्यांनी त्यानुसार भवानी आणि शिवाजी महाराजांना एकत्र गुंफून शिवाजी महाराजांचं दैवतीकरण साधण्याचा अश्लाघ्य असा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबाबत कोणीही शिवप्रेमी संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध करायला पुढे येऊ नये याचं नवल वाटतं. वाघ्या पुतळ्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान होतो म्हणून रातोरात ते शिल्प हटवणाऱ्यांना या गोतियेकृत शिल्पामुळे शिवाजी महाराजांचे खरं अवमूल्यन होतं आहे याचं भान येऊ नये हे आश्चर्यच नव्हे काय?

शिवाजी-भवानी मुर्त्यांत त्यांच्यासमोर वैदिक यज्ञ करून ‘प्राण-प्रतिष्ठा’ केली गेली. निखळ शिल्प असतं तर एक वेळ ‘दंतकथेचं शिल्पीकरण’ असं म्हणता आलं असतं. पण इथे मुर्ती बनवून त्यात वैदिक प्राणप्रतिष्ठा करून शिवाजी महाराजांना एक नवा देव बनवला गेला आहे याचं भान कोणाला आहे? गोतिये हे फ्रेंच पत्रकार. भारतात आले. पाँडेचेरीच्या आश्रमात राहिले. पुढे वैदिक झाले. रा. स्व. संघाचं ते कार्य करतात. मंदिराच्या उद्घाटनाला नितीन गडकरी आले होते. बाकी वैदिकवृंद उपस्थित होताच. म्हणजे हे रा. स्व. संघाचं कारस्थान आहे हे लक्षात यायला वेळ लागू नये. पण त्यापेक्षा धोकादायक बाब म्हणजे ब्राह्मण-शिवी-मोहीम राबवणारे आतून याच रा.स्व.संघाशी संबंधित आहेत ही होय!

याच मंदिराचा पुढील टप्पा म्हणजे आता लोहगाव येथील पाच एकराच्या या मंदिराच्या जागेत वैदिक संग्रहालय उभं करण्यात येत आहे. वेदांची महती, पुरातनता या संग्रहालयाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे असा गोतिये यांचा दावा आहे. हे वृत्त याच महिन्यात पुण्यातील एका अग्रगण्य वृत्तपत्राने प्रसिद्ध केलंय.

यातून निर्माण होणारा पुढचा प्रश्न म्हणजे हे शिवाजी महाराजांचं नुसतं दैवतीकरण नाही तर वैदिकीकरण होत नाही काय? ज्या देशात ९५ टक्के लोकांना कोणी वेदांजवळ फिरकूही दिलं नाही,

ज्यांचा वैदिक धर्म आणि संस्कृतीशी संबंधही नाही, आचरणातही नाही, त्या हिंदू समाजात जन्माला आलेल्या महामानवाचं हे वैदिक अपहरण नव्हे काय? राम-कृष्णांचं वैदिक अपहरण प्राचीन काळात कसं योजनाबद्धरित्या केलं गेलं असेल याचं हे जिवंत उदाहरण आहे. राम-कृष्ण भाविक समाजाच्या देव्हाऱ्यात वैदिक पुटे घेऊन गुपचूप बसले तसंच शिवाजी महाराजांचं व्हावं असा कुटील डाव या सर्व प्रकारामागे आहे असं म्हणावं लागतं. वैदिक संस्कृती म्हणजे सर्व भारतीयांची संस्कृती नाही याचंही भान सर्वांना असायला हवं!

महामानवांचं दैवतीकरण करणं, तसं ते होऊ देणं यातून आपण भावी पिढ्यांनाही दैववादी बनवण्याचा महाभयंकर धोका पत्करत असतो याचं भान असायला हवं. आधीच दैववादी विचारसरणीमुळे दारिद्र्य आणि अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय समाजाला बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी प्राणपणाने कष्ट घेतले. त्यांच्या विचारसरणीमुळे महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो. खुद्द शिवाजी महाराज यत्किंचितही दैववादी नव्हते. त्यांचा आपल्या मनगटावर आणि बुद्धीवर विश्वास होता. त्याच महाराष्ट्रात खुद्द शिवाजी महाराजांचंच मंदिर उभं व्हावं ही भीषण शोकांतिका घडते आहे. याचे दुःष्परिणाम भावी पिढ्यांवर कालौघात काय होणार आहेत याचं भान आपल्याला नसावं ही लाजिरवाणी बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला अनंत काळासाठीचे प्रेरणास्थान आहेत ते महाराज मानवी होते म्हणून. त्यांचं यशापयश मानवी होतं म्हणून. एकदाचा का त्याला दैवी तडाखा दिला की मग शिवाजी महाराज नव्हे तर त्यांचं अवतारीपणच फक्त चर्चेला राहील आणि स्वतःच्या मनगटावरील विश्वास ढासळेल आणि हेच अशा देशद्रोही लोकांना हवं आहे.

आपण असे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत!


- संजय सोनवणे


Updated : 19 Feb 2024 3:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top