महिला आघाडीची मोर्चेबांधणी कशासाठी?
X
महिला आयोगाला वारंवार मागणी करून ही अध्यक्ष न देणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात वेगळा कक्ष स्थापन करायची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांनी भेट गेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ, कंगना राणावत प्रकरणात केंद्रीय महिला आयोगाने दिलेली नोटीस या पार्श्वभूमीवरही महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नेमणुकीचा निर्णय का घेतला जात नाही असा सवाल विचारला जातो आहे. गेल्या आठ महिन्यांत अनेकवेळा याबाबत विचारणा केल्यानंतरही अद्याप राज्य महिला आयोगाचं पद रिक्तच ठेवण्यात आलं आहे. सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महिला व बालकल्याण विभाग काँग्रेसकडे आहे, मात्र या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मंडळांवर शिवसेनेचाही डोळा आहे. त्याचमुळे या आठवड्यात आधी आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आता मुख्यमंत्र्यांची ही भेट घेतली आहे.
शिवसेना महिला आघाडी अचानक अवतरली
कंगना राणावत प्रकरणाच्यावेळी शिवसेनेची महिला आघाडी अचानक गायब झालेली दिसली. शिवसेनेचा किल्ला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी लढवला. आक्रमक समजली जाणारी शिवसेनेची महिला आघाडी अचानक गप्प का झाली असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांनाही पडला होता. आता अचानक शिवसेनेच्या वारंवार सत्तेत राहणाऱ्या जुन्याच नेत्या पुन्हा अचानक सक्रीय झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.