हे सर्व 'मी पुन्हा येईन'साठीचे नियोजन आहे, यशोमती ठाकूर यांचा टोला
X
मुंबई : बजेट अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. पण विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. राज्यातील विरोधी पक्षाला मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नसून, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या मागणीचे मला आश्चर्य वाटते आहे. उत्तरप्रदेशमध्ये गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने गाडी खाली चिरडून शेतकऱ्यांची हत्या केली, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही, असा प्रतिप्रश्न करीत राज्याच्या यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षावर आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विरोधी पक्षाकडून सुरू असलेल्या गोंधळाबाबत माध्यमांनी ॲड. ठाकूर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या बोलत होत्या.
राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरूवारपासून सुरूवात झाली. विधीमंडळ राज्यातील १२ कोटी जनतेच्या अपेक्षांचं प्रतिक आहे. हा लोकशाहीचा आशीर्वाद आहे. मात्र यावेळी मंत्री मंडळातील मंत्री प्रवेश करताना दिसले की, विधानमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षाकडून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी सुरू होती. या सर्व गोष्टींचे आपल्याला आश्चर्य वाटते आहे, असे ॲड. ठाकूर यांना सांगितले. त्या म्हणाल्या की, राज्यातील विरोधी पक्षाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाचे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांनी आपल्या वाहनाने लखीमपूर या ठिकाणच्या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना चिरडून त्यांची हत्या केली. मात्र त्यावेळी भाजप नेत्यांनी भाजपाचे गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा मागितला नाही. मध्यप्रदेशमध्ये आयएसआयच्या हस्तकांना संघ परिवाराचे लोक स्वत: मदत करताना सापडले, त्याबाबत मात्र भाजप उत्तर देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एवढंच नाही तर भाजपाने २० कोटी रुपयांची देगणी कुख्यात गुंड इक्बाल मिरचीकडून घेतली, त्यावेळी त्याचा संबंध कुणाशी होता, हे लोक पद्धतशीररित्या विसरले. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे.
महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम सातत्याने विरोधी पक्ष करीत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशात असा गोंधळ घालून उगाचच महाराष्ट्रांच नुकसान करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. कारण स्पष्ट आहे, ही मंडळी सत्तेत येण्यासाठी हपापलेली आहेत. हे सर्व 'मी पुन्हा येईन'साठीचे नियोजन आहे.