राष्ट्रवादीत पॉवर कुणाची आज फैसला ?
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी बंड केल्यानंतर आज दोन्हीकडील नेत्यांनी समर्थकांची बैठक आयोजित केलीय. या बैठकीत आमदार, खासदार आणि पक्षसंघटनेतील नेते-कार्यकर्ते कुठल्या बैठकीला उपस्थित राहणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाची पॉवर आहे, हे सिद्ध होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकूण ५३ आमदार आहेत. त्यापैकी ४० आमदारांचं समर्थन आपल्याला असल्याचं अजित पवार गटाचे नेते सांगत आहेत. या ४० पैकी ९ जणांनी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही आमदार, खासदार हे आपल्यासोबत असून आणखी आमदार-खासदार पक्षात परत येतील, असा विश्वास शरद पवार यांना आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे नेमकं किती आमदार-खासदारांचं पाठबळ आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळंच शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यातूनच राष्ट्रवादीतील आमदार-खासदार, कार्यकर्ते-नेते यांचं कुठल्या पवारांना पाठबळ आहे, हे स्पष्ट होणार असल्यानं या बैठकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी १ वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत आमदार-खासदारांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. तर दुसरीकडे अजित पवार यांनी सकाळी ११ वाजता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळं अजित पवारांच्या या मेळाव्याला किती आमदार-खासदार, कार्यकर्ते-नेते हजेरी लावणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाकडून बैठक आणि मेळाव्याला उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप काढण्यात आलाय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अडचण झालीय. अजित पवार गटाचे प्रतोद, मंत्री अनिल पाटील यांनी आमदारांसाठी व्हीप काढलाय, त्यात आमदारांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते म्हणून जयंत पाटील यांनीही आमदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावलीय. त्यामुळं आता आमदार कुणाच्या बैठकीला जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.