कोण आहेत नवनीत राणा?
खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र कोर्टाने रद्द केले आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया
X
नवनीत कौर राणा....राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात हे नाव चर्चेत आले. पण या नावाची खरी चर्चा झाली ती 2014मध्ये...राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्येच नाराजी होती. त्यामुळे राणा यांच्या राष्ट्रवादी एन्ट्रीने अमरावतीमध्ये पक्षातच उभी पडल्याचे बोलले जाते. पण या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र या पराभवानंतर नवनीत राणा ह्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही व्यासपीठावर दिसल्या नाहीत.
नवनीत राणा यांनी लग्नाआधी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अमरातवीचे आमदार रवी राणा यांच्यासोबत त्यांनी 2011मध्ये विवाह केला. रवी राणा यांनी आयोजित केलेल्या भव्य सामूदायिक लग्नसोहळ्यात या दोघांनी लग्न केले. त्यानंतर राजकारणात अपक्ष असले तरी रवी राणा यांच्या कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीक असल्याचे दिसले. 2014च्या पराभवानंतर नवनीत राणा यांनी पदवीधर मतमदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा ह्या अपक्ष उभ्या राहिल्या, पण त्यांना भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यामुळे या निवडणुकीत नवनीत राणा विजयी झाल्या.
नवनीत राणा खासदार झाल्या असल्या तरी विविध कारणांनी त्या सतत वादात राहिल्या. अमरावतीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन करण्यास या राणा दाम्पत्याने विरोध केला होता. पण लॉकडाऊन केल्यामुळे अमरावतीमधील रुग्णसंख्या आटोक्यात आली. त्यानंतर या दाम्पत्याने दीपाली चव्हाण प्रकरणी मेळघाटात आंदोलन केले. पण या आंदोलनात होळीमध्ये आरोपींचे फोटो वापरत त्यांना चपलांचा हार घातल्याने राणा दाम्पत्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला. त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले होते.
आमदारा रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे राजकारण सातत्याने कोणत्या ना कोणत्या मोठ्या पक्षाशी हातमिळवणी करुन सुरू असते अशी टीका सातत्याने केली जाते. पण आता नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्रच कोर्टाने अवैध ठरवले आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी तर धोक्यात आलीच आहे पण मतदारांचा विश्वासघात केल्याने यापुढच्या निवडणुकांमध्ये राणा यांना मतदार साथ देणार का हा देखील प्रश्न आहे.
ब्युरो रिपोर्ट, मॅक्स महाराष्ट्र