Kanheri Math | काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढला
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ ( KANHERI MATH ) ५० हून अधिक देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे. मात्र नक्की कणेरी मठात चालत तरी काय? कणेरी मठाची नेमकी पार्श्वभूमी काय? वाचा आमचा विशेष लेख...
X
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात ( KANHERI MATH ) अचानकपणे ५० पेक्षा जास्त देशी गाईंचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या गाईंचा मृत्यू का आणि कशामुळे झाला? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याची चर्चा सध्या विविध पातळीवर होत आहे. पण कणेरी मठ चालवणारे काडसिद्धेश्वर स्वामी ( KADSIDDHESWAR SWAMI ) या प्रकरणामुळे नेमके चर्चेत आले. पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर कणेरी मठ ( KANHERI MATH ) आहे. तसे त्याचे खरं नाव ही सिद्धगिरी मठ असे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन केंद्रात या प्राचीन तीर्थस्थानाला सुद्धा महत्त्व प्राप्त झाले आहे.
जगदगुरु काडसिद्धेश्वर हेमांडपंथी शिल्पकलेचे भव्य शिवमंदिर येथे आहे. हा मठ सर्व जाती-धर्मासाठी खुला आहे. हा मठ खुला करणारे श्री मुप्पीन सिद्धेश्वर स्वामी हे चालते-बोलते वेदान्त होते. या मठाची सर्वाधिक मोठी भूसंपदा, अर्थसंपदा असलेल्या मठाची सूत्रे सध्या काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे आहे. या मठावर प्रामुख्याने लिंगायत समाजाचा प्रभाव असला तरी सर्व धर्मीय येथे दर्शन, पर्यटनासाठी येत असतात. १९७७ साली काडसिद्धेश्वर स्वामी ( KADSIDDHESWAR SWAMI ) यांनी सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनची स्थापना केली. त्यानंतर मठात शिक्षण, पर्यटन, कृषी, ग्रामीण संस्कृतीचे संग्रहालय, गोशाळा, सांस्कृतिक उपक्रम, रुग्णालय असे अनेक उपक्रम सुरु करण्यात आले. हे सर्व सुरु असताना काडसिद्धेश्वर स्वामींचे प्रस्थ सुद्धा वाढत गेले आणि मठाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
कणेरी मठात ( KANHERI MATH ) ४०० विविध प्रकारच्या देशी गाई आहेत. तसेच मठात सेंद्रीय शेतीचे महत्त्व विशद करणारा एक उपक्रम सुद्धा राबवला जातो. मठातील विविध प्रकारच्या गाईंपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण, गोमुत्र ( Milk, curd, ghee, dung, cow urine )यातून विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. मठातर्फे दरवर्षी गो परिक्रमा आयोजित केली जाते. गोमूत्र आणि शेणापासून खतांची निर्मिती केली जाते. गाईंच्या गोमूत्रापासून आरोग्य विषयक औषधी सुद्धा मठाच्या परिसरात तयार केल्या जातात. काडसिद्धेश्वर स्वामी मठाच्या माध्यमातून गाय संवर्धानाचे महत्त्व सांगत असतात. लोकोत्सव काळातच मठामध्ये ५० हून अधिक देशी गाईंचा मृत्यू झाल्याने वाद निर्माण झाला आहे.
लोकोत्सव महोत्सवासाठी मठाच्या आसपासच्या परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणात भाकरी, चपाती मागवण्यात आल्या होत्या. हे सर्व शिळे अन्न गाईंना खाण्यासाठी दिले असता, ते खाल्ल्याने ५० हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र मठाने याबाबत सारवासारव करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. मठातील ५० हून अधिका गाईंचा मृत्यू झाल्याने मठ आणि काडसिद्धेश्वर स्वामी ( KADSIDDHESWAR SWAMI ) यांची प्रतिमा डागाळली असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे.
कणेरी मठात ( KANHERI MATH ) विविध जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासोबत विविध पक्षांचे नेते सुद्धा मठात येतात. गेल्या १० वर्षापूर्वी मठाची कोणतीही राजकीय अशी प्रतिमा नव्हती. अलीकडच्या काळात मठामध्ये अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी आपला शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कणेरी मठ हा आगामी काळात राजकीय आखाडा बनला तर आश्चर्य वाटायला नको. काडसिद्धेश्वर स्वामी हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अशा शक्यतेचा काडसिद्धेश्वर स्वामींनी इन्कार केला आहे. तरी सुद्धा ही चर्चा आता थांबवण्याचे नाव घेत नाहीए. स्वामी आणि मठ यावरील पकड आता भाजप (BJP) अधिक घट्ट करण्याच्या तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKERAY ) यांच्या शिवसैनिकांनी गायींच्या मृत्यूप्रकरणी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी काडसिद्धेश्वर स्वामी ( KADSIDDHESWAR SWAMI ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाणार का? हा खरा प्रश्न आहे.