Home > News Update > हल्ली कुठे होतो जातीयवाद?

हल्ली कुठे होतो जातीयवाद?

हल्ली कुठे होतो जातीयवाद?
X

आताच्या काळात कुठला आलाय जातीयवाद? पूर्वीची परिस्थिती बदलली. आता कशाला हव आरक्षण अशी अनेक वाक्ये आपल्या कानावर पडत असतील. पण खरच जातीयवादाचे झालेले दुरगामी परिणाम संपलेत का? वाचा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. हातेकर यांनी मांडलेला विचार करायला लावणारा अनुभव…

“हल्ली कुठे होतो जातीयवाद?” बऱ्याच वेळा विचारतात. जातीयवाद “ करायला” लागत नाही. तो होतो. मी ज्या कुटुंबात जन्मलो त्या कुटुंबात सगळेच शिकलेले होते. पैसा फार नसला तरी अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक भांडवल होते. त्या मुळे आयुष्य तुलनेने सोपे गेले. माझा एक कातकरी मित्र आहे. चित्रकार आहे. प्रचंड मेहनतीआणि हुशार. चित्रकलेचे शिक्षण घेण्याची लहानपणी प्रचंड इच्छा पण परिस्थिती पूर्ण विपरित. आज काम मिळेल तेंव्हा भिंतीवर जाहिराती रंगवतो. आर्थिक परिस्थिती बिकट. बहुतेक कातकरी मुले शाळा मधूनच सोडतात . तशी त्याच्या मुलांनी सुद्धा सोडली आहे. कातकरी मासेमारी , खेकडे पकडणे , वीट भट्टी वगैरे करतात. ह्याबाबत कौशल्य असले तरी आधुनिक व्यवस्थेत हया कौशल्याना बाजारमूल्य कमी.

मला जन्मतःच जे सांस्कृतिक भांडवल मिळाले ते मला पुढे घेऊनगेले. मित्राला जे सांस्कृतिक संचित जन्माने मिळाले ते आजच्या व्यवस्थेत त्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. सचिन तेंडुलकरची गुणवत्ता आणि मेहनत वादातीत आहेत. पण नुसत्या गुणवत्तेने आणि मेहनतीने काम भागत नाही. सचिन ला रुळावर ठेवायला , यशस्वी करायला एक पूर्ण व्यवस्था राबत होती. विनोदची पण गुणवत्ता होती की. पण त्याला सुद्धा अशी रुळावरठेवणारी व्यवस्था मिळाली असती तर? प्रश्न केवळ आर्थिक नाही. इतिहास, संस्कृती, वर्चस्व वगैरे समाजशास्त्रीय संदर्भ आहेत.

थोडक्यात, जीवनाच्या शर्यतीत माझी स्टार्टींग रेषा माझ्या कातकरी मित्राच्या स्टार्टींग रेषेच्या खूप पुढे होती. मी सुद्धा शर्यतीत जीव तोडुन धावलो. मित्रही धावला. पण सुरवातीचे अंतर इतके होते की मी पुढेच राहतो.

काही लोकसमूहांची स्टार्टींग रेष इतरांच्या खूप मागे असते. आपल्या मागे पडलेल्या लोकांकडे पाहताना ह्याचे भान असलेच पाहिजे. हे भान विसरणे आणि स्वतःच्या “यशाचे” सगळे श्रेय स्वतःला देणे हा जातीयवाद आहे. जातीचे वास्तव आणि स्वतःला मिळालेले अनफेयर अड्व्हांटेज डोळ्याआड करणे म्हणजे जातीयवाद करणे.

Updated : 5 Dec 2024 3:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top