अशरुफ घनी कुठं आहेत? अखेर जगासमोर येऊन सांगितलं देश सोडण्याचं कारण?
X
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी कट्टरतावाद्यांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर गायब झालेले अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आता जगासमोर आले आहेत. अफगाणिस्तानमध्ये ओढवलेल्या परिस्थितीमुळे देश सोडून गेलेले माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून देश सोडून जाण्यामागचे कारण सांगितलं आहे. मात्र, बुधवारी रात्री यूएईने घनी आणि त्यांचा परिवार यूएई मध्ये आहे. त्यांनतरच घनी यांनी एक व्हिडिओ जारी करत या प्रकरणावर आपलं मौन तोडलं आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने या संदर्भात बोलताना घनी आणि त्यांच्या कुटुंबाला मानवीय अधिकारांद्वारे इथे येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
घनी यांनी काय म्हटलंय?
जर त्यांनी देश सोडला नसता तर परिस्तिथी आणखी बिकट झाली असती. तसेच त्यांचा निर्वासित राहण्याचा कोणताही इरादा नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. घरी परतण्यासाठी ते सतत चर्चा करत आहेत. तसेच ते तिथे नसल्याने रक्तपात आणि गोंधळ होत नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.
खरंच घनी पैसे घेऊन पळाले का?
दरम्यान, देश सोडण्यापूर्वी त्यांनी स्वतःसोबत भरपूर पैसे नेल्याचा आरोपही त्यांनी नाकारला आहे. त्यांच्या मते, यूएईचे अधिकारी याची पुष्टी करू शकतात. पुढे ते म्हणतात की, त्यांच्याकडे त्यांचे बूट बदलण्याचाही वेळ नव्हता. सोबतच, अफगाणिस्तानमधील तालिबानचे प्रमुख नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यातील चर्चेला घनी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच तालिबानविरुद्ध युद्ध लढल्याबद्दल त्यांनी अफगाण सुरक्षा दलांचे आभार देखील मानले आहेत.
अशरफ घनी म्हणतात - तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये झालेल्या चर्चेचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि हे त्यांचे अपयश आहे.